गर्भसंस्कारातून हवं तसं बाळ?

Update: 2017-05-12 08:25 GMT

गर्भसंस्काराच्या माध्यमातून उंच, सुंदर, गोरंपान आणि हुशार बालक जन्माला घालण्याच्या वल्गना सध्या काही संस्थांकडून केल्या जात आहेत. आरोग्य भारती या संस्थेनं तर तसा दावाच केला आहे. त्याबाबत या क्षेत्रात कार्यरत असलेल्या डॉक्टरांना नेमकं काय वाटतं हे जाणून घेण्याचा केलेला हा प्रयत्न

या मंत्राचा उच्चार करा आणि हमखास गोरं बाळ मिळवा.

ही मुळी दुधात उगाळून नाकात टाका आणि मुलगा मिळवा

नऊ महीने ट्रिटमेंट घ्या आणि घरात आईनस्टाईन आणा

ही सिडी रोज ऐका तुमची प्रसुती वेदनारहीत होईल

या आणि अशा अनेक जाहिरातींनी सध्या अक्षरशः वीट आणला आहे. एस.टी. स्टँड, रेल्वे स्टेशन, टॅक्सी, रेडिओ, टीव्ही, रस्त्यावरचे फ्लेक्स, सगळीकडे अगदी उच्छाद मांडला आहे. हल्ली तर गुणी बाळ जन्माला येण्याची हमी वगैरे लोकं देऊ लागली आहेत. साहजिकच अशा जाहिरातींना बळी पडून लोकं पाण्यासारखा पैसा खर्च करतात. ‘रिझल्ट्स’ मात्र तसे मिळतात की नाही हा एक मोठा प्रश्नच आहे. आणि त्याहून मोठा प्रश्न म्हणजे हा नेमका अट्टाहास कशासाठी ?

आयुर्वेद सिद्धांतानुसार मानवी शरीर हे सात घटकद्रव्यांपासून बनलेलं आहे. ज्यांना धातू असं म्हटलं जातं. रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र हे सात धातू. से सात धातू गर्भावस्थाच्या साथ महिन्यांत क्रमानुसार तयार होतात. असं वर्णन आयुर्वेदिक ग्रंथात आढळतं. (एका महिन्यात एक धातू आणि त्या धातूशी निगडीत अवयव तयार होतो ) या क्रमाला अनुसरूनच मग गर्भिणीने कोणते पदार्थ खावेत, काय प्रकारचा व्यायाम करावा, दिनक्रम काय असावा याचे वर्णन आयुर्वेदात आढळते. या सर्व नियमांचं पालन केल्यास सर्व धातू उत्तमरित्या तयार होतात. बाळ सुदृढ होते व गर्भिणीला बाळंतपणात होणारे त्रास व आजार होत नाही असा माझा अनुभव आहे. प्रसुती होत असताना गर्भाशयाच्या आकुंचन पावणामुळे आणि बाळ बाहेर येताना स्नायूंवर येणाऱ्या ताणामुळे वेदना होतातच. परंतु या गर्भिणी परिचर्यचे पालन केले असल्यास इतर आजारांमुळे वा कल्शियम, लोह यांच्यासारख्या महत्वाच्या घटकांच्या कमतरतेमुळे होणाऱ्या वेदना मात्र अजिबात होत नाहीत. कारण मुळात असली कमतरता वा आजारच शक्यतो होत नाही. अनुवंशिक आजार असल्यास वा संसर्गजन्य आजार असल्यास होणाऱ्या वेदना मात्र गर्भिणी परिचर्येमुळे काही प्रमाणात कमी होऊ शकतात. मात्र अनुवंशिक आजार अचानक नाहीसा झाला तर तो बाळामध्ये अजिबात आला नाही असे चमत्कार मात्र अजिबात होत नाहीत.

त्याचप्रमाणे आपण कसे दिसतो तसेच उंची किती, वजन किती, केस कसे व किती, रंग कसा, डोळे कान, नाक यांची ठेवण कशी इत्याही अनेक गोष्टी आपल्या आईवडिलांकडून येणाऱ्या अनुवंशिकतेवर ठरतात व त्यात गर्भिणी परिचर्येमुळे कोणताही फरक पडत नाही. म्हणजे आईवडिल काळे आणि बाळ गोरं किंवा आईवडिल बुटके आणि मूल एकदम उंच असे कुठलेही जादूचे प्रयोग शक्य नसतात. या आणि अशा अनेक जाहिरातींनी सध्या अक्षरशः वीट आणलाय आणलाय. आयुर्वेदिक ग्रंथांमधील वर्णणाचा बरेच वेळा चुकीचा अर्थ लावला जातो. गर्भिणी परिचर्या केली ( ज्याला सध्या गर्भसंस्कार म्हटलं जातं) म्हणजे तुम्हाला हणखास गोरं , घाऱ्या डोळ्यांचं उंच, उत्तम बुद्धिमत्ता असलेलं (शक्यतो मुलगाच???) असं बाळ तयार करून देण्याचा रामबाण उपाय नव्हे. तर गर्भधारणा सहजरित्या व्हावी, झालेली गर्भधारणा गर्भ पूर्ण परिपक्व होईपर्यंत उत्तमरित्या टिकावी, प्रसुती सुलभ व्हावी आणि होणाऱ्या बाळाच्या शरीरात पहिल्यांदाच तयार होणारे सात धातू (ज्यांना बीज धातू असंही म्हटलं जातं.) हे उत्तम प्रतिचे तयार व्हावेत, जेणेकरून त्या बाळाची वाढ होताना तयार होणारे धातू हे उत्तम बीज असल्याने चांगल्या प्रतीचे निर्माण होतील व त्याच्या शरीरात कुठल्याही घटकाची कमतरता शक्यतो राहू नये यासाठीचा उपचार म्हणजे गर्भसंस्कार.

या लेखाचया सुरुवातील मी उल्लेख केल्याप्रमाणे अनेकजण सध्या केवळ मार्केटिंगचा एक फंडा म्हणून गर्भसंस्कारांचा चुकीचा अर्थ लावून जाहिरातबाजी करत आहेत. यापैकी अनेकजण केवळ पैसे मिलवण्याचा सोपा उपाय म्हणून गर्भसंस्कार या प्रकाराकडे बघतात. त्यातल्या काही जणांकडे तर आय़ुर्वदाचे उपचार करण्यासाठी लागणारी कायदेशीर आर्हता म्हणजे बी.ए.एम.एस ची डॉक्टरकीची पदवी देखील नाही. तरीसुद्धा अशा अनेका बाबा, बुवा, योगी, श्रीगुरू, महागुरुंकडे इच्छुक पालकांची रांग लागलेली असते. याचं कारण आपली सामाजिक मानसिकता. आपल्याकडे अजुनही सौंदर्याची उंच, घारे डोळे, सरळनाक, लांब केस आणि गोरा रंग अशी ठोकळेबाज व्याख्या केली जाते. परंतू पृथ्वीवरची सगळी माणसं अशी एकसारखी कशी असू शकतील. प्रांत, देश, वातावरण यानुसार त्या त्या भागातील माणसाच्या शरीरात अनेक बदल होत असतात. आपली उंची, वजन, शरीराची ठेवण, डोळे नाक, कानाची ठेवण, आणि रंग त्यानुसार ठरतो. ही सगळी माहिती आपल्या शरीरात पेशींमध्ये असणाऱ्या जीन्समध्ये साठवून ठेवली जाते व ती पुढील पिढीकडे सोपवण्याचे आणि त्या माहितीवर हूकूम पुढच्या पिढीचं शरीर घडवण्याचं काम हे जीन्स करत असतात. काही आजार असे असतात की ज्यांची माहितीपण या जीन्सवर साठवली जाते. आणि मग पुढच्या पिढीतही ते आजार होण्याची शक्यता असते. कुठल्याही औषधाने हे आजार होऊ नये म्हणून हे जीन्स दुरुस्थ करण्याची माहिती कुठल्याही आय़ुर्वद ग्रंथात आढळून येत नाही. यापैकी काही आजार हे शरीरातील काही घटकांच्या कमतरतेमुळे होणारे आजार असतात. गर्भसंस्कारामुळे शरीरातील बीजधातू उत्तम प्रतीचे तयार होत असल्याने असे आजार होण्याची शक्यता कमी प्रमाणात असते. पूर्णपणे शक्यता नाहीशी होत नाही.

मग हे गर्भसंस्कार करावेत की करू नये ?मला असं वाटतं की प्रत्येकाने गर्भधारणेपूर्वी शरीरशुद्धी व गर्भधारणेनं नंतर गर्भसंस्कार अवश्य करावेत. इतकेच नव्हे तर बाळ जन्माला आल्यानंतर बाळाच्या आऱोग्यासाठी सूतिका परिचर्या व बाळाची वाढ उत्तम व्हावी यासाठी मासानुमासिक वृद्धी क्रम यांचेही अवश्य पालन करावे. परंतु हे सगळेच बाळाचे आणि गर्भिणी व नंतर मातेचे आऱोग्य उत्तम रहावे म्हणून करावे. जाहिरातीतील भूलथापांना बळी पडून ऑर्डप्रमाणे मुल मिळवण्यासाठी करू नये. शिवाय हे सर्व उपचार करून घेण्यासाठी बी.ए.एम.एस सहीत प्राप्त आयुर्वेदीक वैद्यांची मदत घ्यावी व त्यांच्याकडून सर्व विषय समजून घ्यावा. भोंदू, बाबा, बुवा, श्रीगुरू वा गल्लाभरू वैद्यकीय व्यवसायिकांच्या जाहिरातबाजीला बळी पडू नये. आयुर्वेदिक ही एक जीवनशैली आहे, चमत्कार करून घरोघऱी आईनस्टाईन , राणा प्रताप, शिवाजी महाराज, राणी लक्ष्मीबाई वा अभिमन्यूची फौज निर्माण करायचं तंत्र नाही.

डॉ. रूची मानेगावकर

 

Similar News