रोहीत पवार भडकतात तेव्हा..!

Update: 2020-04-16 00:55 GMT

“कोणी राजकीय पोळी भाजून घेणार असेल तर आम्ही जशास तसं उत्तर देऊ” रोहित पवार हे नाव आलं की शरद पवार आठवतात. पवार घराण्यातील वारसा रोहित पवार चालवतील असा अंदाज वर्तवला जात आहे. कोरोनाच्या संकटावर रोहित पवार यांची मुलाखत मॅक्स महाराष्ट्रचे कार्यकारी संपादक विलास आठवले यांनी घेतली.

प्रत्येक प्रश्नाला रोहित पवार यांनी उत्तरे दिली. “विरोधक सहकार्य करायचं सोडून राजकारण करत आहेत त्यांना राजकीय पोळी भाजून घ्यायची असेल तर आम्ही जशास तसे उत्तर देण्यास तयार आहोत” असेते म्हणाले. रोहित पवार यांनी एका प्रश्नासंदर्भात उत्तर देताना सांगितलं की, “ रेशन धान्य वाटपाबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या शिष्टमंडळासह राज्यपालांची भेट घेतली होती, याबाबतच्या प्रश्नाला उत्तर देतांना रोहित पवार यांनी सांगितले की, फडणवीस यांनी एक दिवस आधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून केंद्र सरकारने पाठवलेल्या धान्याचं वाटप करावं, अशी मागणी केली आणि दुसऱ्या दिवशी राज्यपालांची भेट घेतली.

यातूनच त्यांचा उद्देश स्पष्ट होतो, एका दिवसात रेशनिंग धान्याचं वाटप होत नाही,” असं उत्तर त्यांनी दिले. महत्त्वाचं म्हणजे केंद्र सरकारने फक्त अंत्योदय या योजनेअंतर्गत तांदूळ दिला आहे, त्यामुळे भाजपचा दावा फोल असल्याची टीका त्यांनी केली. केशरी रेशन कार्ड असलेल्यांनाही आता महाविकास आघाडी सरकार धान्य पुरवत आहे. पण हे वाटप करण्यासाठी थोडासा वेळ लागतो. कोरोनाच्या भीतीने ड्रायव्हर आणि वाहनमालक पुढे येत नाहीत त्यांना समजवण्यासाठीही थोडासा वेळ लागतोय, असे स्पष्टीकरण रोहित पवार यांनी देऊन धान्य वाटप सुरू झाले असल्याचा सांगितलं.

“विरोधकांना सहकार्य करायचे असेल तर राज्य सरकारचे 16 हजार कोटी रुपये केंद्राकडे अडकलेले आहेत ते आणण्यासाठी प्रयत्न करा,” असा सल्लाही त्यांनी विरोधकांना दिला. “भाजपचे आमदार राज्याला मदत करायची सोडून पंतप्रधान लिहून मदत करताहेत . आपण भारतीय आहोत पण त्याचबरोबर राज्यही अडचणीत आहे आणि राज्याला ही मदत केली पाहिजे अशी भूमिका भाजपा का घेत नाही,” असा सवालही रोहित पवार यांनी आपल्या मुलाखतीत केला आहे. पण विरोधकांमधील पंकजा मुंडे या मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामाचे कौतुक करतात, हेही रोहित पवार यांनी निदर्शनास आणून दिले.

राष्ट्रवादी काँग्रेस काय करतोय, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते काय करत आहेत हे विचारण्यापेक्षा किंवा या खोलात जाण्यापेक्षा तुम्ही काय करत आहात याचं आत्मपरीक्षण करावं असा टोलाही त्यांनी लगावला आहे. वाधवन प्रकरणात अमिताभ गुप्ता यांनी वाधवन हे आपले वैयक्तिक मित्र असल्याचं स्पष्ट केलं आहे आणि त्यांच्यावर राज्य सरकारने कारवाई केली आहे. एका अधिकाऱ्याने चूक केली म्हणून सर्वच चुकीचे आहेत, अशी भूमिका योग्य नसल्याचे ते म्हणाले.

कोरोनाशी सामना करणाऱ्या डॉक्टर आणि नर्सेस यांना साहित्य पुरवले जात नाही या विरोधकांच्या आरोपांवर त्यांनी स्पष्टीकरण दिलं. राज्य सरकार यासर्व समस्यांवर मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहे. अनेक ठिकाणी समिती नेमून जिल्हाधिकाऱ्यांवर जबाबदारी दिली आहे आणि ते आपल्या परीने काम करत आहेत असा दावाही त्यांनी केला. मॅक्स महाराष्ट्र चे कार्यकारी संपादक विलास आठवले यांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपला शांतपणा सोडला नाही आणि संयमाने पण तिखटपणे विरोधकांना उत्तरे दिली. रोहित पवार यांचीही स्पोटक मुलाखत आपण मॅक्स महाराष्ट्रवर पाहू शकता.

Full View

Similar News