विजय रुपाणी पुन्हा गुजरातचे मुख्यमंत्री

Update: 2017-12-22 13:52 GMT

गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची माळ पुन्हा विजय रुपाणी यांच्या गळ्यात पडणार आहे. पक्षाच्या बैठकीत विचारमंथन झाल्यानंतर पुन्हा एकदा विजय रुपाणी यांची गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून, तर उपमुख्यमंत्री म्हणून नितीन पटेल यांची वर्णी लागली आहे. गांधीनगर येथील पक्षाच्या कार्यालयात याबाबत निर्णय झाला. गुजरातमध्ये नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाने ९९ जागा मिळवत सलग सहाव्यांदा वेळा विजय मिळवला आहे.

गेल्या निवडणुकीच्या ११६ जागांच्या तुलनेत यंदा भाजपाच्या जागा कमी झाल्याने गुजरातच्या मुख्यमंत्री पदी कोण विराजमान होणार? याबाबत उलटसुलट चर्चा होत होत्या, तसेच अमित शाह यांनी ठेवलेले १५० जागांचे लक्ष्यही फारच दूर राहिल्याने रुपाणींना बगल देऊन अन्य कुणाला संधी दिली जाते की काय? अशी अटकळ व्यक्त होत होती. परंतु आज झालेल्या पक्षाच्या बैठकीत केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी विजय रुपाणी यांच्या नावाची घोषणा करत चर्चांना विराम दिला.

सुरूवातीला या निवडणुकीत जनमतचाचण्यांनी भाजपाच्या बाजूने कल दिला होता. मात्र राहुल गांधींचा घणाघाती प्रचार आणि हार्दिक, जिग्नेश व अल्पेश यांच्या भूमिकेमुळे भाजपा विरोधात जनमत एकवटले आणि भाजपाच्या जागा कमी झाल्या. मात्र विरोधी पक्षाला सत्तेपर्यंत पोहोचता आले नाही.

Similar News