राम रहीमला किमान ७ वर्षांची शिक्षा?

Update: 2017-08-28 06:36 GMT

रोहतक : बलात्कारप्रकणी दोषी ठरलेल्या बाबा राम रहीमला आज शिक्षा सुनावली जाणार आहे. हरियाणातील रोहतकमध्ये तुरुंगात दुपारी पावणे तीनच्या सुमारास शिक्षा सुनावली जाईल. या पार्श्वभूमीवर हरियाणा आणि पंजाबमध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राम रहीम ज्या कलमांतर्गत दोषी ठरला आहे त्यानुसार त्याला किमान ७ वर्षांची शिक्षा होण्याची शक्यता आहे.

सीबीआयच्या विशेष न्यायालयाने गुरमित राम रहीमला गेल्या आठवड्यात बलात्काराच्या प्रकरणात दोषी ठरवले होते. १५ वर्षांपूर्वी दोन महिला अनुयायांवरील बलात्काराप्रकरणी बाबा राम रहिम यांना दोषी ठरवण्यात आले होते. न्यायालयाच्या निकालानंतर हरियाणासह पंजाबमध्ये हिंसाचार झाला होता. यात सुमारे ३८ जणांचा मृत्यू झाला होता. हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर राम रहीमला न्यायालयात न नेण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश जयदीप सिंह हे रोहतकमधील सुनरिया कारागृहात जाऊन शिक्षा जाहीर करतील.

न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर राज्यात पुन्हा हिंसाचार उफाळू नये यासाठी हरियाणा, पंजाबमध्ये बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. रोहतकमध्ये निमलष्करी दलाची तुकडी तैनात करण्यात आली असून डेरा सच्चा सौदाची सर्व केंद्रे पूर्णपणे बंद करण्यात आली आहेत.

Similar News