राज्यात वर्षभरात २१ वाघांचा मृत्यू

Update: 2017-11-22 10:54 GMT

तीन वर्षात ४४ वाघांचा मृत्यू

महाराष्ट्रात गेल्या तीन वर्षांमध्ये तब्बल ४४ वाघांचा मृत्यू झाल्याचे धक्कादायक वास्वव समोर आलय. यात दोन वाघांमधील संघर्ष, नैसर्गिक मृत्यू या बरोबरच शिकार, विषप्रयोग, विजेचा शॉक यामुळे राज्यात वाघांचे मृत्यू झालेले आहेत. ‘वाघ वाचवा’ मोहिमेवर कोट्यवधी रुपये खर्च केले जात अाहेत. मात्र शिकार, विषप्रयोग, शॉक लागून मृत्यू होण्याच्या घटनेने वाघांचे होणारे मृत्यू, यामुळे ‘वाघ वाचवा’मोहिमाचा फज्जा उडालाय, असंच खेदाने म्हणावं लागले. वाघांच्या वाढत्या मृत्यूमुळे विशेषतः त्यांच्या अनैसर्गिक मृत्यूंमुळे वनविभागाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पवनी वनक्षेत्रात सोमवारी एका शेतकऱ्याने केलेल्या वीषप्रयोगामुळे दोन वाघांचा मृत्यू झालाय.वाघाच्या हल्ल्यात मृत झालेल्या गाईच्या मोबदल्यासाठी आनंद मडावी या शेतकऱ्याची,पवनी वनक्षेत्राच्या वनपालांनी एक हजाराच्या लाचेसाठीअडवणूक चालवली होती. त्यामुळे संतापलेल्या या शेतकऱ्याने मृत गाईवर विष टाकले. या विषारी मृत गाईंचे भक्षण केल्याने या दोन वाघांचा मृत्यू झाल्याची बाब उघड झालीय. या प्रकरणी लाच मागणारा वनपाल एस. टी. उइके याला तडकाफडकी निलंबीत करण्यात आलंय. पण एक हजार रुपयांसाठी दोन वाघांचा हकनाक बळी गेलाय. हे कधीही भरून येणारे नुकसान आहे. नागपूर शेजारच्या जंगलांमध्ये सर्वाधिक वाघ आहेत. त्यामुळे नागपूर टायगर कॅपीटलंही म्हणून ओळखली जाते. पण राज्यात गेल्या ११ महिन्यात २१ वाघांच्या मृत्यूने ‘वाघ वाचवा’ मोहिमेलाच धक्का बसलाय.

वन विभागाचं दुर्लक्ष कारणीभूत

एक त्रृतीयांश वाघ एकट्या महाराष्ट्रात आढळतात. "वाघ वाचवा' यामोहिमेसाठी कोट्यावधी रूपये खर्च केले जातात. त्यामुळं वाघांचं संरक्षण आणि संवर्धन व्हावं, अशी अपेक्षा असते. मात्र तसं न होता उलट देशातसर्वाधिक वाघांचा मृत्यू महाराष्ट्रात होतोय. यावर्षी अकरा महिन्यात २१ वाघांचा मृत्यु झालाय. तर तीन वर्षात मृत्युचा हा आकडा ४४ एवढा आहे. विद्युत प्रवाहामुळं गेल्या ११ महिन्यांत ६ वाघांचा मृत्यू झाला. त्यातील सर्वाधिक घटना नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात घडल्यात. यंदा मृत्यू झालेल्या वाघांच्या संख्येत ६ बछड्यांचा समावेश आहे. वाघांच्या अवशेषांना परदेशी बाजारात मोठी किंमत मिळत असल्यानॆ स्थानिकांच्या मदतीनं जाळं पसरवून वाघांची शिकार केली जाते. यासाठी अनेक पर्याय वापरले जातात. नैसर्गिक पाणवठ्यांवर तृणभक्षक प्राण्यांची शिकार करण्यासाठी पाण्यात कीटकनाशक मिसळवून वाघांची शिकार केली जाते. नैसर्गिकरीत्या अकरा, वीज प्रवाहामुळं सहा आणि दोन वाघांच्या संघर्षात ४ वाघांचा मृत्यू झाल्याचं उघड झालंय. गेल्यावर्षी १४ वाघांचा मृत्यू विविध कारणांमुळं झाला होता. यंदा त्यात ३३ टक्‍क्‍यांनी वाढ झालीय. त्यामुळं वन कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झालंय.

Similar News