मी मरणाला घाबरत नाही !

Update: 2017-05-17 09:44 GMT

आपल्या सप्तखंजेरीनं महाराष्ट्रभर प्रबोधन करणाऱ्या सत्यपाल महाराजांवर शुक्रवार (दि.१२) रोजी मुंबईत हल्ला झाला. बुद्ध जयंतीनिमित्त मुंबईतील नायगाव (दादर) याठिकाणी ते कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी एका माथेफिरु तरुणाने चाकुने त्यांच्या पोटावर वार केले. या हल्ल्यात महाराज जखमी झाले असले तरी, गावी असलेल्या त्यांच्या वृद्ध मातोश्रींना हा प्रकार कळाल्यास त्यांना यामुळे धक्का बसेल म्हणून आपण माध्यमांशी याबाबत काहीही बोललो नसल्याचं सत्यपाल महाराजांनी सांगितलं.

समाजातील अंधश्रद्धा दूर होण्यासाठी आपण समाज प्रबोधन करतो. त्यामुळे माझ्यावर हल्ला झाला. परंतू अशा हल्ल्याने आपण विचलीत होणार नाही. मी मरणाला घाबरत नाही. शेवटच्या श्वासापर्यंत आपण महाराष्ट्रात प्रबोधन करुन समाजात जनजागृती करणार असल्याचं सत्यपाल महाराजांनी मॅक्स महाराष्ट्रला सांगितलं.

काय झालं नेमकं :

कार्यक्रम संपल्यानंतर महाराजांसोबत फोटो काढण्यासाठी व्यासपीठावर गर्दी झाली. या गर्दीत तोंडाला रुमाल बांधून एक युवक त्यांच्याजवळ पोहोचला. त्याने महाराजांच्या खांद्यावर हात ठेवत असल्याचे दाखवित चाकूने त्यांच्या पोटावर वार केले. सत्यपाल महाराजांनी तातडीने स्वत:ला सावरुन हल्ला चुकविण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान चाकूची मुठ तुटल्याने सत्यपाल महाराज बचावले. यात त्यांच्या पोटाला दुखापत झाली. त्यांनतर सत्यपाल महाराजांवर केईएम रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यांना मंगळवारी रुग्णालयातून सोडण्यात आले. भोईवाडा पोलिसांनी हल्लेखोर कुणाल किशोर जाधव यास अटक केली असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Similar News