मराठा समाजाचे एक पाऊल पुढे !!!

Update: 2017-01-31 10:58 GMT

गुजरातेत हार्दिक पटेल परत आल्यानंतर त्याने पटेल आरक्षणासाठी पुन्हा एकदा एल्गार पुकारला. पटेलांच्या आक्रमक शैलीतच पुढील आंदोलनाची हाक त्याने दिली. त्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाचे मंगळवारचे चक्का जाम आंदोलन हे पुन्हा एकदा अतिशय सुनियोजित आणि शांततेत पार पडलेले आंदोलन मानावे लागेल. कोपर्डी अत्याचार प्रकरणातील नराधमांना फाशी मिळावी, ‘ऍट्रॉसिटी कायद्या’चा गैरवापर रोखावा, तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासह विविध मागण्यांसाठी करण्यात आलेले हे आंदोलन वास्तविक संवेदनशील मागण्यांसाठी असतानाही आंदोलन शांततेत पार पडले, हे मराठा समाजाचे आपल्या उद्दीष्टाच्या दिशेने पडलेले आणखी एक यशस्वी पाऊल आहे असे म्हणावे लागेल.

"प्रत्येक मराठ्याचे एकच काम... 31 जानेवारीला चक्का जाम..!' अशी घोषणा करीत राज्यभर हे आंदोलन करण्यात आले. मराठा समाजाच्या मागण्यांच्या बाबतीत राज्य सरकारने अजून कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही. सरकारला पुन्हा जाग आणण्यासाठी आणि आठवण करून देण्यासाठी हे आंदोलन असल्याचे संयोजक सांगतात.

चक्‍काजाम आंदोलनात लोकप्रतिनिधी व जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या इच्छुकांनीही सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्या-त्या ठिकाणच्या मराठ्यांनी आंदोलनाच्या वेळी आपल्या परिसरातील लोकप्रतिनिधी व इच्छुक उमेदवारांच्या उपस्थितीवर लक्ष ठेवावे. आंदोलनाला अनुपस्थित राहणाऱ्याला मराठा समाजाने निवडणुकीत धडा शिकवायचा, असेही ठरवले होते.

आंदोलनाचीही आचारसंहिता

आंदोलनासाठी आयोजकांनी तयार केलेल्या आचारसंहितेचे ब-यापैकी पालन करण्यात आले. शिस्तबद्ध आंदोलन करणे, कोणीही गालबोट लावू देऊ नका, गालबोट लावणाऱ्या संशयिताची माहिती पोलिसांना द्या, वाहनांवर दगडफेक करू नका, वाहनांची हवा सोडू नका, रस्त्यावर टायर पेटवू नका, अग्निशमन दल, रुग्णवाहिकांना रस्ता मोकळा करून द्या, पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन सातत्याने करण्यात येत होते.

राज्यभर विविध ठिकाणी झालेल्या चक्काजाम आंदोलनामुळे पुणे-बेंगळूरू द्रुतगती महामार्गावर वाहनांची खूप मोठी कोंडी झाली होती. मुंबईतील डोंबिवली, कामोठे-कळंबोली, मुलुंड चेकनाका, दहिसर येथे आंदोलनं झाली. डोंबिवली व ठाणे येथे चक्काजाम आंदोलनाचा वाहतुकीवर परिणाम झाला. पिंपरी चिंचवड येथील भूमकर चौक येथे मुंबई-पुणे महामार्गावर १० मिनिटे चक्काजाम करण्यात आला. शेवटी पोलिसांनीच आंदोलकांना बाजूला करत महामार्ग मोकळा केला. दरम्यान, औरंगाबाद येथे चक्काजाम आंदोलनाला हिंसक वळण लागले. शहरातील आकाशवाणी, वाळूज येथे पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला. प्रारंभी पोलिसांनी आंदोलकांना चक्काजाम करण्यास विरोध केला. आंदोलकांनी नकार देताच त्यांच्यावर लाठीमार करण्यात आला. शहरातील न्यायालयाजवळ आंदोलकांनी एका वाहनाची काच फोडली. चिडलेल्या आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेकही केल्याचे सांगण्यात आले. अनेक ठिकाणी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. राज्यात सर्वच ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. सोलापूर, जळगाव, अहमदनगर, पुणे, बीड, कोल्हापूर, सांगली आदी ठिकाणी ग्रामीण भागातही चक्काजाम आंदोलन करण्यात आले. काही वेळच झालेल्या या आंदोलनाचा वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. अनेक ठिकाणी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

मुंबईतही दोन आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले, काही किरकोळ घटना वगळता राज्यभरातील चक्काजाम आंदोलन प्रचंड प्रतिसादात आणि शांततेत पार पाडून मराठा समाजाने मुंबईतील महामोर्चाची नांदी घडवून आणली आहे. त्यामुळे मुंबईतील महामोर्चा सरकारची झोप उडवल्याशिवाय रहाणार नाही, अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे.

सुरेश ठमके

Similar News