राम रहिम समर्थकांचे उत्तर भारतात थैमान

Update: 2017-08-25 10:10 GMT

डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा रामरहिम बलात्कार प्रकरणात दोषी ठरल्यानंतर बाबाच्या समर्थकांनी उत्तर भारतात हिंसाचाराला सुरूवात केली आहे. बाबाच्या पाठिराख्यांनी ठिकठिकाणी जाळपोळ, दगडफेक केली आहे. हरियाणातील बाबा समर्थकांच्या हिंसाचाराचे लोण दिल्लीतही पोहचले आहे. या हिंसाचारात 30 जणांचा मृत्यू झाला आहे तर 250 हून अधिक जण जखमी झाले आहेत.

मीडियावरही बाबा समर्थकांनी हल्ला केला आहे. पंचकुलामध्ये मीडियाच्या गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. काही मीडिया प्रतिनिधींना मारहाणही करण्यात आली आहे. हिंसाचार नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी बाबाच्या समर्थकांवर अश्रुधुराचा मारा केला जात आहे. मात्र तरीही परिस्थिती नियंत्रणात आलेली नाही. हरियाणाच्या पंचकुलात सुरू झालेला हिंसाचार पंजाब, राजस्थान आणि दिल्लीतही पसरला आहे.

हरियाणातील डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा रामरहिम दोन साध्वींवर बलात्कार प्रकरणी दोषी ठरला आहे. पंचकुला येथील सीबीआय कोर्टाने हा निकाल दिला आहे. कोर्टानं दोषी ठरवल्यानंतर हरियाणा पोलिसांनी बाबा रामरहिमला ताब्यात घेतले आहे.

बाबाला दोषी ठरवल्यानंतर आता या प्रकरणी शिक्षा 28 ऑगस्टला सुनावली जाणार आहे. रामरहिमला या प्रकरणात 7 वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. ज्या प्रकरणात बाबा दोषी सिद्ध झाला ते प्रकरण 15 वर्षांपूर्वीचे आहे.

एप्रिल 2002 मध्ये डेरा सच्चा सौदामधील एका साध्वीने पंजाब-हरियाणा हायकोर्टाला आणि तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना पत्र लिहून लैंगिक शोषणाबाबत बाबाविरूद्ध तक्रार केली होती. यानंतर हायकोर्टाने या पत्राची सत्यता पडताळून पाहण्यासाठी सिरसाच्या न्यायायाधिशांना डेरा सच्चा सौदामध्ये पाठवले होते. त्यानंतर डिसेंबर, 2002 मध्ये सीबीआयने बाबावर गुन्हा दाखल केला होता. अखेर 15 वर्षांनंतर या प्रकरणात निकाल लागून बाबा दोषी सिद्ध झाला आहे.

Similar News