नालायकांची जमात

Update: 2017-08-30 10:29 GMT

२००५ साली जुलै महिन्यात मुंबई पाण्याखाली बुडाली आणि त्यामुळे काही जीव गेले आणि मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले, या घटनेला १२ वर्षं झालीत आणि त्या घटनेनंतर जन्माला आलेली पिढी अजून राजकारणात आणि प्रशासनात आलेली नाही.

याचा अर्थ असा की महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या राजकारण आणि प्रशासन दोन्ही वर्तुळांमध्ये वावरत असलेली मंडळी तीच आहे आणि ही अख्खी जमात नालायकांची जमात आहे. या १२ वर्षांतले सगळे मुख्यमंत्री, मुख्य सचिव, महापौर, महानगर पालिकेचे आयुक्त आणि हे राजकारण, प्रशासन चालवणारे सगळे राजकारणी हे स्वार्थी, भ्रष्ट आणि जनतेच्या हालअपेष्टांशी सोयरसुतक नसलेले आहेत, हा दुर्दैवी निष्कर्ष आहे.

१) या १२ वर्षांत, मुंबई, ठाणे परिसरात नालेसफाईचे काम प्रामाणिकपणे होत नाही

२) तुंबलेले पाणी समुद्रात टाकण्याची व्यवस्था निर्माण झालेली नाही

३) कचरा व्यवस्थापन आहे तिथेच आहे आणि

४) आपत्तीच्या काळात लोकांना धोक्याची सूचना देणारी पब्लिक अनाऊन्समेंटची यंत्रणा अद्याप निर्माण झालेली नाही, हे कशाचे लक्षण आहे?

थोडा जरी जास्त पाऊस आला की लोकलचे रूळ पाण्याखाली बुडून जातात, हे कळायला नव्याने अभ्यास करायची गरज आहे काय? इतकी वर्षे हे रूळ तुंबलेल्या पाण्याखाली जाणार नाही, यासाठी करायची उपाययोजना सत्ताधाऱ्यांच्या प्राधान्यक्रमांत येत नाही, हे भिकारचोट वृत्तीचे नव्हे तर कशाचे लक्षण आहे?

अजूनही मुंबई-ठाण्यातील कचरा पहाडांसारख्या ढिगांच्या रूपात ठिकठिकाणी पडलेला आहे आणि राजकारणी आणि अधिकारी कुठल्या ठेकेदाराकडून किती पैसे उकळता येतील, या विचारात मग्न आहेत, हे वास्तव जनतेला माहीत नसेल पण पत्रकारांना आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकाला ठाऊक आहे.

मुंबई आणि ठाण्यात निर्माण होणाऱ्या उंच इमारतींचा, कचरा, सांडपाणी कुठे आणि कसे हाताळता येईल याची एका पैशाची चिंता न करता बिल्डर्सकडून पैसे उकळणे आणि त्यांच्या प्रकल्पांमध्ये खुली किंवा छुपी भागीदारी मिळविणे, हा धंदा झाला आहे.

आणि, सगळ्यात संतापजनक बाब म्हणजे मायबाप जनतेची या राजकारण्यांवर असलेली आंधळी किंवा अगतिक श्रध्दा! आपल्या शेजारचा दरिद्री नगरसेवक कोणताही व्यवसाय न करता फॉर्च्युनर गाडीतून फिरायला लागला, हे मूर्ख जनतेला दिसत नाही?

ज्यांच्या चार पिढ्यांनी साधी नोकरी केली नाही, असे राजकारणी करोडपती, अरबपती झालेले दिसत नाही लोकांना?

आम्ही हालअपेष्टा सहन करू; शहराची वाट लावून घेऊ; प्रसंगी जीव देऊ पण याच लोकांच्या चरणी आपली आपली श्रद्धा आणि मतं अर्पण करू, असे वचन आम्ही स्वतःलाच दिलेले आहे.

Similar News