नांदेड- वाघाळा महानगरपालिकेसाठी आज मतदान

Update: 2017-10-10 18:51 GMT

मुंबई, दि. 10: नांदेड- वाघाळा महानगपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज मतदान होत असून 81 जागांसाठी 578 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. प्रभाग क्रमांक 2 मध्ये प्रायोगिक तत्वावर व्हीव्हीपॅटचा (व्होटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट ट्रेल) वापर केला जाणार आहे.

महापालिकेच्या एकूण 20 प्रभागांतील 81 जागांसाठी मतदान होणार आहे. एकूण 891 उमेदवारांनी वैध नामनिर्देशनपत्रे दाखल केली होती. त्यातील 313 उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतल्याने प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात आता 578 उमेदवार आहेत. व्हीव्हीपॅटचा वापर होत असलेल्या प्रभाग क्रमांक 2 मध्ये 26 उमेदवार आहेत. 11 ऑक्टोबर 2017 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. 12 ऑक्टोबर 2017 रोजी मतमोजणी होणार आहे. एकूण 20 पैकी 19 प्रभाग चार सदस्यांचे आहेत. एक प्रभाग 5 सदस्यांचा आहे. एकूण 3 लाख 96 हजार 872 मतदार असून त्यांच्यासाठी 550 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रभाग क्र.2 वगळता अन्य सर्व प्रभागांतील एका मतदान केंद्रावर सरासरी 734 मतदार असतील. व्हीव्हीपॅटचा वापर होत असलेल्या प्रभाग क्र.2 मध्ये मतदारांची एकूण संख्या 20 हजार 307 इतकी आहे. त्यांच्यासाठी 37 मतदान केंद्रांची व्यवस्था केली आहे. या प्रभागात एका मतदान केंद्रावर सरासरी 550 मतदार असतील.

Similar News