डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातही 'संघ'दक्ष

Update: 2017-03-22 18:03 GMT

हैद्राबाद विद्यापीठात रोहित वेमुला या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्यानंतर दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातही मूत्थु कृष्णा या विद्यार्थ्यानेही आत्महत्या केली. या आत्महत्यांनी संपूर्ण देश ढवळून निघत असतानाच महाराष्ट्रातील विद्यापीठांमध्येही दलित चळवळीचं खच्चीकरण सुरु आहे. दलित चळवळीचं माहेरघर असलेल्या औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात दलित विद्यार्थी नेत्यांवर गुन्हे दाखल करून त्यांची मुस्कटदाबी करण्याचा आणि चळवळ संपवण्याचा डाव राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अभाविपने आखलाय. हेच भीषण सत्य उघड करणारा हा स्पेशल रिपोर्ट...

घनगर्द झाडं, सुसाट डांबरी रस्ता, झाडांची रस्त्यावर पडलेली पिवळीजर्द फुलं आणि फुलांच्या विखुरलेल्या मऊ पाकळ्यांवर पाय ठेऊन चालताना उर भरून येतो. कारण हा परिसर आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा. या विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव देण्यात यावं या एकाच मागणीसाठी दलित समाजाने तब्बल 17 वर्ष संघर्ष केला. ज्यात शेकडो हुतात्मे झाले तर लाखोंचे संसार रस्त्यावर आले. तेंव्हा कुठे या विद्यापीठात समता शांती आणि बंधुता प्रस्थापित झाली. पण आता याच समता शांती बंधुतेला तिलांजली देऊन विद्यापीठात संघ विचारांची पेरणी करण्याचा प्रयत्न सुरु आहे. हा प्रयत्न करत असताना दलित चळवळीची अत्यंत हिंसक पद्धतीने मुस्कटदाबी केली जातेय. ही मुस्कटदाबी फक्त संघटनात्मक पातळीवर नसून संस्थात्मक पातळीवरसुद्धा सुरु आहे. कारण मुस्कटदाबीच्या अनेक प्रकरणात बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचं प्रशासन उघडं पडलंय. त्यामुळे कुलगुरू बी. ए. चोपडे यांची भूमिकासुद्धा संशयाच्या भोवऱ्यात सापडलीय.

विद्यापीठाचा बदलत चाललेला अजेंडा आणि दलित विरोधी भूमिका सर्वात पहिल्यांदा उघडी पडली ती पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमात. विद्यापीठात दरवर्षी अनेक नेत्यांच्या जयंत्या आणि काही नेत्यांच्या पुण्यतीथ्या साजऱ्या केल्या जातात. याची रीतसर यादीच सरकार जाहीर करत असतं. त्या यादीत पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रमच नाहीय. पण तरीही विद्यापीठ हा कार्यक्रम साजरा करत होतं. याला विद्यापीठातील आंबेडकरी विद्यार्थी संघटनांनी आक्षेप घेत विरोध केला. हा विरोध सुरु असताना अभाविपच्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठात घुसून कुलगुरू कॉन्फरन्स रूमच्या काचा फोडत कुलगुरूंना भेटायला गेलेल्या दलित विद्यार्थ्यांना मारहाण केली. यात शहरातील एका विद्यालयात ज्युनियर प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेला आणि कुलगुरूंच्या अत्यंत जवळचा समजल्या जाणाऱ्या अभाविपच्या कार्यकर्त्याचा समावेश होता.

https://youtu.be/w4YaIU_w9o4

https://youtu.be/xghl-ty7Eh8

पण या प्रकाराची पोलीस स्टेशनला तक्रार देताना मात्र कुलगुरूंनी त्या कार्यकर्त्याचं नाव वगळून आणि इतर लोक अज्ञात असल्याची तक्रार दिली. पण दुसऱ्या दिवशी मात्र दलित संघटनांनी पोलिसांना या तोडफोड आणि मारहाणीचं चक्क फुटेज उपलब्ध करून दिलं. पण तरीही पोलिसांनी फक्त 149 ची नोटीस बजावुन या कार्यकर्त्यांना मोकाट सोडलं आणि कुलगुरूंच्या जवळचा असलेल्या त्या कार्यकर्त्याचं नाव मात्र यातूनही रितसर वगळण्यात आलं. त्यामुळे कुलगुरूंचे अभाविपसोबत किती मधुर संबंध निर्माण झालेत हे समोर येतंय.

दलित संघटना आणि आमचा कुठलाही वाद नाही, पण आमचा आणि कम्युनिष्टाचा वाद आहे. कम्युनिष्ठ संघटना या स्वतःच्या फायद्यासाठी दलितांचा वापर करत आहेत. आमचा व कम्युनिष्टांचा जेंव्हा जेंव्हा वाद होतो तेंव्हा तो दलित आणि अभाविप असा वाद आहे भासवलं जातं, त्यामुळे हा भ्रम निर्माण झालाय. तथापि आमचा आणि दलितांचा कुठलाही वाद नाही - स्वप्नील बेगडे, प्रदेश सहमंत्री अभाविप

एकीकडे मारहाण तोडफोड करणाऱ्या या कार्यकर्त्यांना निव्वळ 149 ची नोटीस देऊ सोडत असताना दुसरीकडे दलित कार्यकर्त्यांचं मात्र सातत्याने दमन सुरु आहे.

प्रकाश इंगळे आणि सचिन निकम हे विद्यापीठाचे विद्यार्थी. प्रकाश इंगळे हा प्रकाश आंबेडकरांच्या सम्यक विद्यार्थी चळवळीचा जिल्हाध्यक्ष आहे तर सचिन रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचा जिल्हाध्यक्ष आहे. त्यांची इथे ओळख करून देण्याचं प्रमुख कारण म्हणजे विद्यार्थी दशेतच चळवळीचं काम करताना यांच्यावर विद्यापीठाने मागच्या दीड वर्षात तब्बल तीन गुन्हे दाखल केलेत. तरीही प्रकाश लढण्याची उर्मी जिवंत ठेवून आहे. तर सचिन निकमचीही अवस्था वेगळी नाही. सचिन हा जर्नालिझम विभागाचा तिसऱ्या वर्षाचा विद्यार्थी आहे. या तीन वर्षांच्या काळात सचिनवरही विद्यापीठाने तब्बल तीन गुन्हे दाखल केलेत. सचिन सध्या अभ्यास करत करत कोर्टाच्या चकरा मारतोय.

https://youtu.be/AgJHqWQA0Lw

https://youtu.be/XAGwWGJ83tU

या दोघांचा गुन्हा काय? ना मारझोड ना तोडफोड. यांचा एकच गुन्हा आहे, तो म्हणजे मोर्चे काढणे, घोषणा देणे आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडणे. विद्यार्थी हिताचे प्रश्न मांडणाऱ्या आपल्याच विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न करणे हे एका महामानवाच्या नावाने चालणाऱ्या विद्यापीठाच्या प्रशासनाला शोभतं का? हैद्राबाद विद्यापीठातील रोहित वेमुला हा विद्यार्थी शेवटचे काही दिवस ज्या परिस्थितीतून गेला असेल त्याच स्थितीतून सध्या प्रकाश आणि सचिन जातायेत. फरक इतकाच की, आंबेडकर विद्यापीठाला मिळालेला संघर्षाच्या चळवळीचा वारसा यांना मरू देत नाही आणि विद्यापीठ प्रशासन मात्र यांचा पिच्छा सोडायला तयार नाही.

यापेक्षाही गंभीर परिस्थिती रत्नदीप कांबळे या विद्यार्थ्याच्या वाट्याला आलीय. कुलगुरूंचा संघधार्जिनपणा आणि संघाची वाढत चाललेली कपटनीती यावर रत्नदीपने सवाल उपस्थित केले. बस इतकंच. दुसऱ्या दिवशी अभाविपच्या 30 ते 40 कार्यकर्त्यांनी वसतिगृहात येऊन रत्नदीपला मारहाण केली. याबाबत अभाविपच्या कार्यकर्त्यांना विचारलं, तर 'तो वाद हा रत्नदीप आणि आमचे कार्यकर्ते यांच्यातला वैयक्तीक वाद होता, त्याच्याशी अभाविपचा काहीही संबंध नाही' असं हस्यास्पद उत्तर अभाविपकडून दिलं गेलंय. रत्नदीपला तू पोलिसांत तक्रार का दिली नाही, असं विचारलं तेंव्हा "जर मी तक्रार दिली तर, मला परिक्षेलाही बसू दिलं जाणार नाही" असं रत्नदीप सांगतोय. त्यामुळे विद्यापीठात किती हतबलता वाढत चाललीय हे लक्षात येतंय. ज्या विद्यापीठात कधीकाळी दलित चळवळीचा बोलबाला होता त्याच विद्यापीठात आज दलित विद्यार्थ्यांचा कोंडमारा सुरु आहे. दुसरीकडे भाजपच्या जोरावर अभाविप मात्र सुसाट सुटलीय. पण तरीही औरंगाबादेतल्या दलित चळवळी आणि पक्ष संघटनांना अजूनही डोळे उघडायला तयार नाहीत.

https://youtu.be/VAJJfF_qR24

रत्नदीपने उपस्थित केलेल्या मुद्द्यांना राष्ट्रवादी विद्यार्थी आघाडीचे कार्यकर्ते विजय वाव्हळ यांच्याकडूनही पुष्टी मिळते. यातून समोर आलेली नावं म्हणजे BCUD चे पूर्व अध्यक्ष सतीश पाटील. यांचं मूळ आडनाव देवळणकर आहे. पण त्यांनी सोयीसाठी पाटील हे नाव लावलं. दुसरं नाव आहे डॉ. प्रदीप लब्दे. हे विद्यापीठातील राजिस्टार आहेत. तिसरं नाव आहे सर्जेराव ठोंबरे यांचं. जे सध्या गोपीनाथ मुंडे ग्रामीण संशोधन संस्थेचे सर्वेसर्वा आहेत. त्याचबरोबर स्वतः कुलगुरुही संघाच्या अतीव प्रेमात असून UGC चे अध्यक्षपद किंव्हा तत्सम फायद्यासाठी ते भाजप किंव्हा संघाचा शब्दही ओलांडत नसल्याचा गंभीर आरोप विजय वाव्हूळ यांनी केलाय. विद्यापीठातल्या या संघ धार्जिण्या उच्चपदस्थांमुळेच दलित विद्यार्थ्यांचं दमण सुरु आहे. विद्यार्थ्यांनी नुसता मोर्चा काढला, घोषणा दिल्या तरी, तात्काळ त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातायेत. कुणी बोललं तर त्याला मारहाण केली जातीय. कुणी कोणत्या गोष्टीला विरोध केलाच तर लगेच हल्ले होतायत. यामुळेच औरंगाबाद विद्यापीठात दलित विद्यार्थी भीतीच्या सावटाखाली वावरतायेत.

आंबेडकरवादी विचारसरणीच्या दलित विद्यार्थ्यांना आणि विदयार्थी नेत्यांना सध्या टार्गेट केले जातंय. देशात आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजपच्या जोरावर गुंडागर्दी आणि खोट्या केसेस करून खच्चीकरण केले जात आहे. राज्यभरातील विद्यार्थी नेत्यांवर दाखल केलेल्या खोट्या केसेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ रद्द कराव्यात आणि अभाविपच्या गुंडागर्दीला चाप लावावा. अन्यथा महाराष्ट्रातील सर्व आंबेडकरी संघटना या विरोधात आंदोलन उभारून मुख्यमंत्र्यांना विद्यापीठात पुन्हा पाय ठेऊ देणार नाही. भाजप आणि विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणे तात्काळ थांबवावे. - सिद्धार्थ मोकळे, अध्यक्ष, आत्मभान संघटना

दुसरीकडे भाजपाच्या आश्रयाला गेलेल्या दलित संघटना आणि पक्षांमुळे या विद्यार्थ्यांना सपोर्ट करणारही कुणी राहिलेलं नाही. परिणामी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची परिस्थिती हैद्राबाद विद्यापीठ आणि जेएनयू विद्यापीठापेक्षाही गंभीर बनलेली आहे. सध्या तरी इथले दलित विद्यार्थी या संकटाचा सामना करतायेत. पण दलित चळवळींनी यात वेळीच लक्ष घातलं नाही तर इथेही रोहित वेमुला आणि मूत्थु कृष्णा घडतील.

दत्ता कानवटे, औरंगाबाद

Similar News