अनलॉक फक्त श्रीमंतांसाठी गरिबांसाठी नाहीच : नाका कामगार

Update: 2020-09-26 05:25 GMT

गेल्या काही महिन्यांपासून राज्यात लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात येत आहे. पण खरंच त्याचा सकारत्मक परिणाम सर्वसामान्य लोकांवर दिसतो का खरा प्रश आहे? भारताची अर्थव्यवस्था संघटित आणि असंघटित अशा दोन मुख्य भागात विभागली गेली आहे . त्यातही असंघटित क्षेत्राचे देशाच्या अर्थव्यस्थेत खूप मोठे योगदान आहे. पण त्यांना त्याचा हवा तसा लाभ मिळत नाही हे वास्तव आहे. असंघटित कामगार हे या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. पण लॉकडाऊनमुळे या असंघटित क्षेत्राचा कणाच मोडला गेला आहे.

प्रत्येक शहरात दिसणारे नाका कामगार हे लॉकडाऊनमुळे भरडले गेले आहेत. मुंबईत तर या नाका कामगारांची संख्या मोठी आहे. मुंबईत रोज असे अनेक असंघटित कामगार मुंबईच्या वेगवेगळ्या नाक्यावर बसतात. त्यात मिस्त्री, सुतार, प्लबंर,गवंडी असे अनेक काम करणारे कामगार इथं काम मिळेल या आशेने येतात. पण या लॉक डाऊनच्या काळात देशाची आर्थिक स्थिती विस्कळीत झाली असताना या सर्व मजूर आणि कामगारांना खूप त्रास सहन करावा लागला आहे. यातील काही मजूर हे लॉक डाऊनच्या काळात गावी निघून गेले. पण लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळत गेली तसे हे कामगार आता परतू लागले आहेत. पण अजूनही त्यांना रोजगार मिळत नाहीये. चेंबूर नका,घाटकोपर राजावाडी,विक्रोळी पार्कसाईट, मानखुर्द,वाशी नाका,कुर्ला सिग्नल येथील नाक्यांवर पुन्हा एकदा नाका कामगार काम शोधण्यासाठी येऊ लागले आहेत.

यल्लप्पा ढोगंळे हे देखील नाका कामगार आहेत. ते प्लबिंगचे काम करतात. पण सध्या काम मिळत नसल्याने खूप कष्टाने घर चालवायला लागत असल्याचे त्यांनी सांगितले. काम मिळालं तरी आठवड्यातून एकदा एकदम इमर्जन्सी असेल तरच कामाला बोलावलं जातं. तसंच घरगुती कामांसाठी लोक अजूनही बोलाव नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे सरकार जे अनलॉक करत आहे ते गरीब लोकांसाठी नाही तर श्रीमंत लोकांसाठी आहे, अशी तक्रारही ते करतात.

Full View

Similar News