मृत्यूचा बदला घेण्यासाठी आता त्याचे ५० मित्र झालेत सज्ज…

Update: 2018-08-04 06:52 GMT

भारतीय लष्करातील जवान औरंगजेब याला काश्मीरमधून दहशतवाद्यांनी अपहरण करून नेले आणि त्यानंतर अत्यंत क्रूरपणे त्याला ठार केले. पुंछ जिल्ह्यातील रहिवासी औरंगजेब हा भारतीय जवान आपल्या देशासाठी शहीद झाला. १४ जूनला ४४ राष्ट्रीय रायफल्सचा जवान औरंगजेबला दहशतवाद्यांनी ठार केले. औरंगजेब ईद असल्याने घरी आला होता. मात्र दहशतवाद्यांनी त्त्याचवेळी त्याचे अपहरण केले आणि त्यानंतर त्याला ठार केले. यामुळे औरंगजेबच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला होता. औरंगजेबच्या वडिलांनी मी माझ्या मुलाच्या मृत्यूचा बदला घेईन असे जाहीर केले होते. तसेच त्याच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी आता त्याचे ५० मित्र सज्ज झाले आहेत. त्यांनी सौदी अरब या ठिकाणी असलेली चांगली नोकरी सोडून सेना आणि पोलिसात नोकरीसाठी अर्ज करण्याचे ठरवले आहे. औरंगजेबचे मित्र किरामत आणि मोहम्मद ताज यांनी यासंदर्भात सांगितले की, “ आम्ही ज्या दिवशी औरंगजेबच्या मृत्यूची बातमी पाहिली त्याच दिवशी नोकरी सोडून भारतीय सैन्यदलात किंवा पोलिसात भरती होण्याचा निर्णय घेतला. आम्हाला आमच्या जीवलग मित्राच्या मृत्यूचा सूड घ्यायचा आहे. औरंगजेबच्या मृत्यूचा सूड घेणे हाच आमचा उद्देश आहे असे त्यांनी स्पष्ट केले.

Similar News