नायर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे राजेशचा मृत्यू

Update: 2018-01-28 11:41 GMT

मुंबईतील नायर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. या तरुणाचे नाव राजेश मारू असून आपल्या बहिणीच्या सासूला रुग्णालयात भेटण्यास आला असता, एमआरआय रुममध्ये झालेल्या अपघातात राजेशचा मृत्यू झाला. या प्रकरणी रुग्णालयातील तिघांवर निलंबनाच्या कारवाईसह गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये डॉक्टर, वॉर्डबॉय आणि महिला कर्मचाऱ्याचा समावेश आहे.

काय घडलं एमआरआय रुममध्ये?

राजेश मारू हा आपल्या बहिणीच्या सासूला बघायला नायर हॉस्पिटलमध्ये गेला होता. पेशंटचा एमआरआय करण्यास सांगितला गेला. त्यामुळे राजेश पेशंट आणि मेहुण्यासोबत एमआरआय रुमकडे निघाले. राजेश पुढे होता आणि राजेशच्या हातात ऑक्सिजन सिलेंडर होता. एमआरआय सेंटरमध्ये कोणतीही धातूची वस्तू घेऊन जाण्यास परवानगी नसते. 'मशिन अजून बंद आहे तुम्ही आत जाऊ शकता', असं वॉर्डबॉयने सांगितलं. पण जेव्हा राजेश आत गेला तेव्हा मशिन सुरू होत्या. मशिनने सिलेंडर सोबत राजेशलाही खेचून घेतलं. त्याला त्वरीत बाहेर काढण्यात आलं, मात्र उपचारा दरम्यान राजेशचा मृत्यू झाला.

मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची दखल घेतली असून मृत तरुणाच्या कुटुंबियांना तात्काळ ५ लाखांची मदत जाहीर केली आहे. डॉ. सिद्धांत शहा, वॉर्डबॉय विठ्ठल चव्हाण आणि महिला कर्मचारी सुनिता सुर्वे यांच्यावर निलंबनाच्या कारवाईसह कलम ३०४ (हलगर्जीपणामुळे मृत्यूला कारणीभूत) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

Similar News