कन्हैय्याकुमार सह त्याच्या साथीदारांवरील आरोपपत्र न्यायालयाने फेटाळले

Update: 2019-01-19 12:08 GMT

नवी दिल्ली – जेएनयू विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैय्या कुमारसह त्याच्या सहकाऱ्यांविरोधातील आरोपपत्र दिल्लीतील कोर्टानं फेटाळलं आहे. आरोपपत्र दाखल करतांना दिल्ली सरकारची परवानगी का घेतली नाही असा प्रश्न उपस्थित करत न्यायालयाने दिल्ली पोलिसांची कानउघाडणी केली आहे.

फेब्रुवारी 2016 मध्ये कन्हैय्या कुमार, उमर खालिद, अनिरबान भट्टाचार्य आणि जम्मू काश्मीरचे विद्यार्थी मुनीब हुसैन, आकिब हुसैन, मुजीब हुसैन, उमर गुल, रईया रसूल, बशीर भट आणि बशारत यांनी जेएनयूत एक सभा आयोजित केली होती. या कार्यक्रमात कथितरित्या देशविरोधी भाषणे आणि घोषणा देण्यात आल्या. त्याच प्रकरणात दिल्ली पोलिसांनी कुमारसह इतर विद्यार्थ्यांच्या विरोधात 1200 पानांचा आरोपपत्र कोर्टात दाखल केले होते. मात्र दिल्ली उच्च न्यायालयाने ते आरोपपत्र मान्य करण्यास नकार दिला. जेएनयूत 2016 मध्ये कन्हैय्या कुमारने कथित देशद्रोही सभेचे आयोजन केले होते असा आरोप आहे.

दिल्ली पोलिसांना खडेबोल सुनावताना न्यायाधीशांनी म्हटले, "तुम्ही दिल्लीतील कायदा विभागाची परवानगी सुद्धा घेतली नाही. त्यांच्या परवानगीशिवाय तुम्ही आरोपपत्र दाखल केलेच कसे." यानंतर दिल्ली पोलिसांनी आपली चूक मान्य करत दिल्लीतल्या आप सरकारची परवानगी घेणार असल्याचे न्यायालयाला सांगितले. या परवानगीसाठी पोलिसांनी न्यायालयाकडून १० दिवसांची मुदत मागितली आहे.

Similar News