समृद्ध गोंडी आदिवासी परंपरा

Update: 2020-07-28 09:27 GMT

आदिवासींनी जगातील निसर्गावर आधारीत मानवतावादी परंपरा मडक्यातील राखेत जुन्या दर्जेदार वाणाच्या बिया जतन कराव्यात. तशी जतन करून ठेवलीय. ही जीवन पद्धती समजून घेतली तर आपल्याला त्यांची निसर्गावर आधारित सामूहिक जीवन परंपरा समजेल.

शिकारीच्या त्यांच्या वेगवेगळ्या कला आहेत. प्राणी कुठे राहतो? तो बिळात आहे की नाही? त्याचा फास कसा लावायचा? याबाबतचं त्यांचं ज्ञान अफाट आहे. पूर्वी शिकार हे उदरनिर्वाहाचे साधन होते. एखाद्या बिळाच्या तळाशी असलेला प्राणी साप आहे की घोरपड आहे. हे वरूनच ओळखले जाते. उंदीर शेतातल्या बिळात राहून शेतातले धान फस्त करतो आणि लोक त्याची शिकार करतात. हे उंदीर आणि गावठी उंदीर वेगळे आहेत.

उंदीरमामा इतके हुशार की, त्यांच्या घरट्याच स्ट्रक्चर भूलभुलैया असतो. बिळात सरळ एका ठिकाणी गोळा केलेलं धान्याचं गोडाऊन असतं. दुसऱ्या ठिकाणी त्याची आरामाची जागा आणि आणि पुढच्या बाजूने मागून शत्रुची चाहूल लागल्यास सुरक्षेसाठी छतावर पोकळ करून केवळ पापुंद्रा शिल्लक असलेली पळताना अलगद रस्ता होईल अशी जागा... जाणीवपुर्वक ठेवलेली असते.

इतक्या मोठ्या स्थापत्य कौशल्याने बनवलेल्या उंदरापर्यंत आमचे लोक पोहोचतात. खोदत खोदत आरामाच्या ठिकाणी पोहचल्यावर त्याचे केस अंगावरील कीटक आढळल्यास शिकार असल्याचे फिक्स होते. कधी यात धूर सोडला जातो. व अलगद पकडले जाते. या सर्वांचा अभ्यास आदिवासी समुदायाने इतका सूक्ष्म केला आहे. की तो यात डॉक्टरेट आहे.

शिकार केली जात असली तरी यामध्ये वेगळेपण आहे. गोंडी समुदायात वेगवेगळ्या देवांमध्ये विभाजन आढळते. यातील प्रत्येकाचा एक प्राणी देव आहे. ज्याचा देव जो प्राणी आहे. त्या देवाचे लोक त्या प्राण्याची शिकार करत नाहीत. त्याला मारून खात नाहीत. शिकारीचे त्यांचे नियम आणि पद्धती आहेत. त्याचे काटेकोर पालन ते करतात. लग्नाच्या बाबतीतही या विषम देव असलेल्या लोकांमध्येच सोयरिक होते. आदिवासी संस्कृती ही कलाप्रिय आहे. त्यांना जे दिसत त्याचा प्रभाव त्यांच्या कलेवर पडतो.

हा लग्नातला मुंडा आहे. यावर पशू पक्षी कोरलेली असतात. गोंडी संस्कृतीच प्रतिक कोरलेली असते. पुर्वी यावर पारंपरीक शस्त्र कुऱ्हाड असायची. आता अनेक मुंड्यांवर बंदुकही दिसते.

माणुस मेल्यावर त्या ठिकाणी दगड उभा केला जातो. त्यावरही पशु पक्षी कोरलेले असतात. या दगडावर अलिकडे हेलिकॉप्टरच चित्र कोरलेलं दिसतं. जंगलातील गावात वैद्यकीय सुविधा नसताना अनेक आजारांवर झाडपाल्याची औषधे लोक देतात. मोडलेला हात बसवला जातो. त्यांची स्वतःची समृद्ध बोली भाषा आहे .

गोंडी संस्कृती मध्ये वेगवेगळे सन निसर्गावर अवलंबून आहेत. पंडूम हा महत्त्वाचा सण साजरा होता. पेरणी वेळी बिजा पंडूम साजरा केला जातो. या समुदायाने त्यांच्या सर्व गोष्टींना त्यांच्या संस्कृतीमध्ये सुंदर रीतीने गुंफलेले आहे. उत्सव प्रिय असलेल्या या संस्कृतीमध्ये माणसाच्या मृत्यू नंतर अंत्ययात्रेत ढोल वाजवला जातो.

विशेष म्हणजे इतर उत्सवात वाजवला जाणारा ढोल आणि यावेळी वाजवला जाणारा ढोल हा वेगळा असतो. माणूस मेल्यावर त्याला आनंदाने निरोप दिला जातो. आदिवासी त्यांच्या प्रत्येक कामात सामुदायिक जीवन जगतो. त्यांचे सर्व निर्णय सामुदायिक बैठकीत ठरतात. ही सामुदायिक जीवन आजही टिकून आहे. गावात ढोल वाजवला अथवा कोणत्याही खांब दगडाने वाजवला की पूर्ण गाव जमा होतो. याला मुनारी (दवंडी) दिली जाते.

आदिवासींच्या नात्यातील वंगण अजूनही कोरडे झालेले नाही. लोक एकमेकांचा आदर करतात. भरभरून बोलतात. पाहुणा आला तर सर्व घरांमध्ये आनंद होतो. कोंबडा कापला जातो. एका बाजूला वयाची सत्तरी पार केलेली पुढच्या हजारो वर्षाच्या राजकीय डावपेच आखणारी लोकं कुठ? आणि आता काय राहिलाय जीवनात म्हणून एकमेकांना जीव लावणारी लोकं कुठ ? असा प्रश्न पडतो.

Similar News