गौरी लंकेश यांच्या हत्येत 'सनातन प्रभात'च्या माजी संपादकाचा सहभाग?

Update: 2018-11-24 18:04 GMT

ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्याप्रकरणात मोठा खुलासा समोर आला आहे. ५ सप्टेंबर २०१७ ला ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर तपासामध्ये अनेक खुलासे समोर आले होते. मात्र, आता या प्रकरणात 'सनातन प्रभात' या दैनिकाच्या एका माजी संपादकाचा समावेश असल्याचं समोर आलं आहे. या संपादकावर पैसे पुरवल्याचा उल्लेख विशेष तपास पथकाने न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात करण्यात आला आहे.

'सनातन प्रभात' या वृत्तपत्राच्या माजी संपादकाचा यामध्ये उल्लेख करण्यात आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. वैचारिक मतभेदांवरुनच लंकेश यांची हत्या करण्यात आली असल्याचा दावा 9,235 पानांच्या आरोपपत्रात करण्यात आला आहे. या आरोपपत्रात एकुण 18 आरोपींची नावं देण्यात आली आहेत.

सनातन संस्थेने मात्र, हे आरोप फेटाळून लावत या प्रकरणातील कोणताच आरोपी संस्थेचा सदस्य नसल्याचं म्हटलंय. एसआयटीने याआधी मे महिन्यात 650 पानांचे आरोपपत्र दाखल केलं होतं. त्यानंतर प्रकरणाचा तपास सुरु होता. आरोपपत्रात सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्र आणि गोव्यात पाच जणांनी लंकेश यांच्या हत्येचा कट रचला होता.

काय आहे प्रकरण?

ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांची कर्नाटकमधील बेंगळुरू इथं निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्यानंतर देशभरात खळबळ उडाली होती. बंगळुरुतील त्यांच्या राहत्या घराबाहेर त्यांच्यावर सात गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. 'गौरी लंकेश पत्रिके' या कन्नड साप्ताहिकाच्या त्या प्रमुख होत्या. बंगळुरुतील राजराजेश्वरी नगरमध्ये गौरी लंकेश राहत होत्या. 5 ला रात्री 8 वाजताच्या सुमारास तिन आरोपींनी त्यांना घराबाहेर बोलावलं. त्यांच्यासोबत झालेल्या वादावादीनंतर आरोपींनी गौरी यांच्यावर गोळ्या झाडून पोबारा केला. मारेकऱ्यांनी गौरी लंकेश यांच्यावर 50 मीटर अंतरावरुन सात गोळ्या झाडल्या. त्यापैकी दोन गोळ्या त्यांच्या छातीवर, तर एक त्यांच्या कपाळावर लागली होती.

 

Similar News