#लॉकडाऊन_यात्रा : तमाशाचे फड प्रेक्षकांच्या प्रतिक्षेत

राज्यात अनलॉक झाले असले तरी अजूनही तमाशा कलावंत फड सुरू होण्याच्या प्रतिक्षेत आहेत. पण त्यामुळे त्यांच्यापुढे जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांच्या दुरवस्थेची कहाणी सांगणारा शशिकांत सूर्यवंशी यांचा ग्राऊंड रिपोर्ट...

Update: 2021-01-15 13:01 GMT

राज्यात अनलॉक अंतर्गत अनेक उपक्रम सुरू करण्यात आले असले तरी अजूनही अनेक उपक्रमांना परवानगी नसल्याने त्यावर उपजिविका असलेल्या अनेकांचा जगण्यासाठी संघर्ष सुरू आहे. असाच संघर्ष सध्या तमाशा मंडळांना करावा लागत आहे. लोककलेचा वारसा जपणाऱ्या तमाशा मंडळांना कोरोनाचे ग्रहण लागले आहे. गेले काही महिन्यांपासून सातारा, सांगली, कोल्हापूर या तीन जिल्ह्यातील तमाशा कलाकारांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. अनलॉक झाले असले तरी गावोगावी होणाऱ्या जत्रा अजूनही बंद असल्याने तमाशा मंडळांना आपले फड उभारता येत नाहीयेत. या लॉकडाऊननंतरही तमाशा कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. मिळेल ते काम करत आजपर्यंत तमाशा कलावंत या कोरोनाचा महामारीचा मुकाबला करत आहे. तमाशाच्या कार्यक्रमांना शासनाने मान्यता दिली असली तरी यात्रांना परवानगी नसल्याने तमाशाचे कार्यक्रम करायचे कुठे असा सवाल कलावंत आणि त्यांच्या संघटना उपस्थित करतायत.


तमाशा कलावंतांच्या समस्या मांडण्यासाठी आणि त्या सोडवण्यावकरीता पाठपुरावा करण्यासाठी कराडचे हिंगमीरे यांनी पठ्ठे बापूराव तमाशा पंढरी या नावाने संघटना उभी केली आहे. या संस्थेचे सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यातील एकूण 35 तमाशाचे फड आहेत. त्यापैकी हंगामी तमाशे हे 30 आहेत तर बारमाही तमाशे हे 5 आहेत. यामध्ये मंगला बनसोडे त्याचबरोबर रघुवीर खेडेकर अशा अनेक तमाशा मंडळांचा सहभाग आहे. एकूण हंगामी तमाशा कलावंतांची संख्या ही 3000 च्या पटीत आहे तर यात 1000 महिला कलावंत काम करतात. पण लॉकडानमुळे ठप्प झालेल्या अर्थचक्रामुळे या सर्वांवर उपासमारीची कुऱ्हाड कोसळली आहे.

लॉकडाऊनच्या काळात अनेक सामाजिक आणि राजकीय संघटनांनी या कलावंतांना आर्थिक मदत केली. मात्र त्यानंतर अनलॉक झाले असले तरी फड अजूनही सुरू न झाल्याने परिस्थितीपुढे सर्वजण हतबल झाले आहेत. आता तर मिळणारी मदतही बंद झाली आहे. पण अनेक निवेदने आणि आंदोलने केल्यानंतर शासनाने मंडळांना तमाशे करण्यास परवानगी दिली आहे. पण सुपारी मिळेल या आशेवर बसलेल्या तमाशा कलावंतांच्या पदरी मात्र निराशा पडली आहे. यात्रंना परवानगी नसल्याने मात्र या कलावंतांच्या आशांवर पाणी फिरलं गेलंय. बँका कर्ज देत नाहीत. तारण ठेवण्यासाठी यांच्याकडे जमीन नाही तर एखाद्या सावकाराकडे कर्ज मागायला जावे तर सध्या यात्रा भरत नसल्याने तुम्ही कर्ज कसे फेडणार या असा सवाल विचारत तेही कर्ज देण्यास नकार देत असल्याचे हे कलावंत सांगतात. त्यामुळेच सरकारने कलाकारांना मदत करावी अशी मागणी ते करत आहेत.

Full View


- शशिकांत सूर्यवंशी

Tags:    

Similar News