पवारांची उंची गाठायला फडणवीसांना अजून वेळ आहे – प्रफुल पटेल

Update: 2019-03-13 13:43 GMT

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभा निवडणुक न लढवण्याचा निर्णय़ घेतल्यानंतर त्यांच्यावर भाजपच्या नेत्यांनी टीका केली. पवारांनी हवा पाहूनच निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यावर प्रफुल पटेल यांनी मुख्यमंत्र्यांनी पवारांना सल्ला देऊ नये, असं म्हटलंय.

शरद पवारांवर किमान मुख्यमंत्री फडणवीसांनी हलक्या भाषेत टीका करू नये, अशी त्यांना सूचना असल्याचं प्रफुल पटेल यांनी सांगितलं. पवारांची उंची गाठायला मुख्यमंत्री फडणवीस यांना अजून बराच वेळ आहे, त्यामुळं त्यांनी पवारांना सल्ले देण्याच्या भानगडीत जाऊ नये, असा सल्लाच पटेल यांनी दिलाय.

प्रफुल पटेल

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभा निवडणुक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर राष्ट्रवादीचे दिग्गज नेते प्रफुल पटेल यांनी स्वतःच्या उमेदवारीविषयी सध्यातरी निर्णय झाला नसल्याचं सांगितलंय. शेवटी, पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य असेल, असंही पटेल यांनी सांगत उमेदवारीबाबतच सस्पेंस कायम ठेवला आहे.

नाना पटोले यांनी भाजपसोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर भंडारा-गोंदिया या लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. तिथं राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर कुकडे हे निवडून आले होते. आघाडीमध्ये ही जागा राष्ट्रवादीच्या कोट्यात आहे. त्यामुळं २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे प्रफुल पटेल हे इथून निवडणूक लढवतील असा कयास लावला जात होता. मात्र, त्याबाबत स्पष्टपणे बोलण्यास पटेल यांनी नकार दिला आहे.

Similar News