धनंजय मुंडेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची फिरकी...

Update: 2018-07-19 12:40 GMT

आज विधान परिषदेत निवृत्त सदस्यांना निरोप देण्यात आला. सोबतच सभागृहात पुन्हा निवडून आल्याबद्दल महादेव जानकर, संजय दत्त, जयदेवराव गायकवाड, अमरसिंह पंडित, नरेंद्र पाटील यांचे अभिनंदन केले.

यावेळी सुनील तटकरेंची प्रशंसा करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, सुनील तटकरे हे अभ्यासू, चांगले वक्ते, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्राची आवड असलेले तसेच नियोजनबद्ध काम करणारे नेते आहेत, कोणत्याही विषयावर चिठ्ठी न घेता सभागृहात बोलणारे नेते आहेत. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचा त्यांना दांडगा अनुभव आहे. अर्थखात्यासह विविध खात्याचे मंत्री असताना त्यांनी आपले काम चोख पार पाडले. राज्यातील सर्व तीर्थक्षेत्रांना त्यांनी न्याय दिला. मतदारसंघातील प्रश्नांना त्यांनी नेहमी महत्त्व दिले. ते या सभागृहात नसताना त्यांची उणीव आम्हाला जाणवेल. तटकरे हे देशातील कोणत्याही सभागृहात गेले तरी अशाच प्रकारची उत्कृष्ट कामगिरी करतील, अशी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आशा वर्तवली.

विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही यावेळी सुनील तटकरे यांची विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहातील कामकाजाची प्रशंसा केली. यावेळी ते म्हणाले, त्यांची उणीव सभागृहात कधीही भरून निघणार नाही. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील फिरकी घेतली. ते म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे हे देशाच्या सर्वोच्च सभागृहात निवडून यावे, अशी परमेश्वराकडे प्रार्थना केली व दुसरीकडे त्यांनी २०१९ च्या निवडणुकीत तटकरेंच्या विरोधातील त्यांच्या पक्षाचा उमेदवार निवडून यावा, यासाठीही परमेश्वराला साकडे घातले आहे. त्यामुळे यामध्ये मुख्यमंत्र्यांनी तटकरेंबाबत चक्क परमेश्वरालाच गोंधळात टाकले आहे, अशा शब्दात विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांवर टिका केली.

Similar News