#CSMTFobCollapse :  मुंबईचा बॉस प्रचारात, मुंबईकर रूग्णालयात 

Update: 2019-03-15 18:18 GMT

मुंबईतल्या मराठी माणसासाठी, मुंबईकरांसाठी निवडणुकांमध्ये बेंबीच्या देठापासून बोलणाऱे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचं बेगडी प्रेम पुन्हा एकदा सिद्ध झालंय. २६ जुलैचा प्रलयकारी पाऊस असो, मुंबईतल्या रस्त्यांवरील खड्डे असो, एलफिन्स्टन पूल चेंगराचेंगरी असो कि २६/११ चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला असो. उद्धव ठाकरे कधी घटनास्थळाला भेट दिल्याचं फारस ऐकिवात नाही. तोच अनुभव हिमालय पूल दुर्घटनेच्याबाबतीतही आला आहे. दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना किंवा जखमींना सत्ताधारी म्हणून भेट देण्यासाठी उद्धव यांना वेळच मिळाला नाही की त्यांची इच्छाच नव्हती, हे अजून कळालेलं नाही.

मुंबई सीएसएमटी शेजारचा हिमालय पूल दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यु झाल्याच्या घटनेला चोवीस तास उलटून गेले तरी उद्धव ठाकरे घटनास्थळ तर सोडाच पण जखमी किंवा मृतांच्या कुटुंबियांना भेटायला देखील गेले नाहीत. तर ते व्यस्त होते युतीच्या पहिल्या प्रचारसभेत. भाजप-शिवसेना युतीच्या पहिल्या प्रचारसभेसाठी उद्धव ठाकरेंना अमरावतीमध्ये प्रचारसभेला जायला वेळ होता. तिथं तब्बल ३० मिनिटे भाषणं ठोकलं मात्र, त्या भाषणात पूल दुर्घटनेवर अवाक्षरही उद्धव यांनी काढलं ही. ज्या मुंबईकरांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी मुंबई महापालिकेची जबाबदारी शिवसेनेवर दिली त्याच मनपाच्या ताब्यातील पूल दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना आणि जखमींना भेट देण्याची जबाबदारी तर सोडा साधं सौजन्यही दाखवलं नाही.

शिवसेनेच्या कुठल्याही बड्या नेत्यानं किंवा युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी जखमींना भेट दिलेली नाही. त्यामुळं मुंबईचं पालकत्व ज्यांच्यावर सोपावलंय त्या शिवसेनेवर कारवाई करण्याचं धाडस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाखवतील काय, असा प्रश्न नेटिझन्स विचारू लागले आहेत. एवढचं कशाला काही महिन्यांपूर्वी अहमदनगरमध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या हत्या करण्यात आल्या, त्यावेळीही ठाकरे कुटुंबातील कुठलाही सदस्य त्या मृत पदाधिकाऱ्यांच्या कुटुंबियांकडे फिरकला नाही. अशा परिस्थितीत जर उद्धव यांना कार्यकर्ते आणि लोकांसाठी वेळ नसेल तर उद्धव हे या दोन घटकांव्यतिरिक्त अशा कुठल्या कामांमध्ये व्यस्त असतात, असा प्रश्नही नेटिझन्स उपस्थित करू लागले आहेत. मुंबईचा बॉस म्हणून उल्लेख होणारे उद्धव ठाकरे प्रचारात व्यस्त आहेत. तर मुंबईकर दुर्घटनांमध्ये मृत्युमुखी पडत आहेत, तर काहीजण रूग्णालयात जीवन-मरणाची लढाई लढत आहेत.

Similar News