असीम सरोदेंनी लोकसभा निवडणूकीबाबत घेतला मोठा निर्णय

Update: 2019-03-14 12:54 GMT

मानवी हक्कांसाठी कायम संघर्ष करणारे तरूण, अभ्यासू विधिज्ञ असीम सरोदे यांनी लोकसभा निवडणूक लढवावी, अशी मागणी अनेकांनी केली होती. त्यावर असीम यांनीच सविस्तर खुलासा केला आहे. सध्या असीम सरोदे हे जेनेव्हा, स्वित्झर्लंड येथे एका आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी झालेले आहेत. तिथून त्यांनी लोकसभा निवडणुक लढवण्याबाबतची भूमिका स्पष्ट केलीय.

लोकसभा निवडणूक मी पुण्यातून आप पक्षातर्फे लढावी अशी आपचे मुकुंद किर्दत यांची सूचना मला खूप आकर्षक वाटली. मुकुंद किर्दत एक अत्यंत लोकशाहीवादी निष्ठावान विचारवंत आहेत असे त्यांच्याशी झालेल्या प्रत्येक चर्चेच्या वेळी जाणविले. त्या दिवशी मला मनापासून छान वाटले. आपण निवडून येणार की नाही याचा विचार न करता 'एक चांगला पर्याय' मतदारांसमोर ठेवावा हे लोकशाहीसाठी महत्वाचे असेल असे मत माझे मित्र डॉ विश्वमभर चौधरी यांनी व्यक्त केले. विचार करायला लावणारी अनेक मते अनेकांनी फेसबुक वर व्यक्त केली. मी उभे राहावेच असा उत्साह येईल अशी परिस्थिती पटविण्यासाठी काही जणांनी इतर पक्षांतर्फे कोण, कोण उभे राहणार आणि त्यांची पार्श्वभूमी सांगून अशा वेळी पुणेकर नागरिक नक्कीच चांगुलपणाला, कर्तुत्वाला मत देतील कारण ते बुद्धिवादी आहेत असेही सांगण्यात आले. मी निवडणूक लढविली तर खुद्द भाजप आणि कॉग्रेस मधील काही नेते व नाराज कार्यकर्ते 'आतून' माझ्यासाठी काम करतील असाही होरा काहींनी मांडला.

मी 'आप' पक्षाचे आभार मानतो की त्यांनी माझ्या नावाचा विचार केला. सातत्यपूर्ण, राजकीय पक्षनिरपेक्ष, रचनात्मक काम केलेल्या माझ्या सारख्या इतरही काहींची दखल त्यांना घ्यावी वाटली हा मोठा आशेचा किरण आहे.

मला माझ्या ताकदीचा अंदाज आहे परंतु माझ्यातील कमालीची रिस्क घेण्याची प्रवृत्ती जागी झाली होती. आपली शक्ती खूप वाढवू शकतो असा भ्रम निवडणुका जवळ आल्या की भल्याभल्यांना होतो. माझ्यात निवडून येण्याची पात्रता व नेतृत्वगुण आहेत असे मला वाटते. मी संसद नावाच्या 'कायदेमंडळात' एक चांगला सदस्य होऊ शकतो हे मला मनापासून वाटते (आणि मला माझ्याबद्दल जे वाटते ते सगळ्यांना वाटावे असे नाही). पण अशी "पात्रता" आणि निवडून येण्याची "क्षमता" दोन वेगळ्या गोष्टी आहेत याची जाणीव मला आहे. 'इलेक्टिव्ह मेरिट' गुंडशक्ती आणि धनशक्ती भोवती फिरतेय हा लोकशाहीचा अपमान आहे पण त्यामुळे कुणाचे 'देशप्रेम' जागृत का होत नाही असा प्रश्नही मला पडतो. पैसा हा फार मोठा परिणाम करणारा फॅक्टर आहे हा दुर्दवी अडथळा पार करून आणि पैसाच सगळे काही नसतो हे ठसविण्याची संधी म्हणून निवडणूक लढवायची आणि 'शहीद' व्हायचे (हरायचे/पडायचे) असा विचार सुद्धा माझ्या मनात येऊन गेला.

मला 'आप' तर्फे विचारणा करण्यात आली तेव्हा मी त्यांना त्यामुळेच लगेच नकार देऊ शकलो नाही आणि त्यांनी सुद्धा लगेच निर्णय सांगा असे काही म्हटलेले नव्हते. दरम्यान मी लगेच दिनांक 3 मार्च पासून जेनेव्हा (स्वित्झर्लंड) येथे संयुक्त राष्ट्र संघटनेच्या मीटिंगसाठी आलो आहे. इथे आल्यावर मला जाणविले की, मी खूप वेगळे काम आंतरराष्ट्रीय पातळीवर करू शकतो. इथे माझे मुद्दे जगातील लोक ऐकून घेतांना बघितले आणि मला वाटले आपण संसदेत गेलो तर खूप परिणामकारक काम करू शकतो. 'आप'ने मला पुण्यातून लोकसभेसाठी निवडणुकीचा फड लढवावा यासाठी योग्य मानले यासाठी मी त्यांचे आभार मानतो. परंतु प्रत्यक्ष निवडणूक लढविण्याच्या मार्गाने राजकारणात यावे असे मला आता तरी वाटत नाही. लोकांसाठीच व्यापक राजकारण सुरूच राहील व त्यासाठी राजकीय पक्षाची गरज नसली तरीही चालते.

पुण्यातील संभाव्य उमेदवारांची जी नावे दिल्लीला पाठवण्यात आली आहेत त्यामध्ये अनेक चांगले पर्याय आहेत. मतदारांनी या निवडणुकीत धनाढ्य, जातीवादी- धर्मांध ताकदीना निवडून देऊ नये असे प्रकर्षाने वाटते.

सध्या राजकारणाच्या बाहेर राहून रचनात्मक-कायदेविषयक, सामाजिक-राजकीय कार्यच करीत राहावे असे ठरविले आहे. जे लोकशाहीच्या तत्वांचा आदर करणार नाहीत, त्यांच्यावर टीका, त्यांच्या कामाचे विश्लेषण तसेच प्रशासनाचे मुल्यांकन आणि प्रसंगी न्यायालयीन सक्रियता आणून त्यांच्यामध्ये कायदेशीरता आणण्याचा प्रयत्न करीत राहणार आहे. मुळात तटस्थ भूमिका घेणे हे माझे शक्तीस्थळ मला निवडणूक लढविण्यासाठी हरवून बसायचे नाही असे आता वाटते. अनेक लोक माझ्या कामावर प्रेम करतात याची जाणीव या निमित्ताने पुन्हा झाली. समाजाचे हे प्रेम एक जबाबदारी असते याची नम्र जाणीव ठेवून मी पुण्यातून लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक नाही असे जाहीर करीत आहे.

ऍड असीम सुहास सरोदे

[button data-color="" data-size="" type="square" target="" link=""]जेनेव्हा, स्वित्झर्लंड येथून[/button]

Similar News