600 रुपयांच्या फी साठी नांदेडमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या

Update: 2017-03-19 10:06 GMT

नांदेड जिल्ह्यातल्या जवळा फाटक या गावातील यशवंत भिसे (वय 38) या दलित शेतकऱ्यानं आत्महत्या केली आहे. यशवंत यांचा मुलगा किशोर भिसे हा यंदा बारावीच्या वर्गात शिकत होता. पण, त्याच्या परिक्षेची 600 रुपये फी भरण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे मुलगा परिक्षेला बसू शकला नाही. किशोरला दहावीत 70 टक्के मार्क मिळाले होते. हुशार मुलाला आपण शिकवू शकत नाही याचं शल्य मनात धरून यशवंत यांनी शुक्रवारी आत्महत्या केली आहे.

यशवंत भिसे यांच्याकडे अर्धा एकर शेती आहे. त्यात त्यांनी सोयाबीन आणि कापूस घेतला. पण, भाव अत्यंत कमी असल्यानं त्यांच्या हातात फार कमी उत्पन्न आलं. त्यातच भिसे यांच्यावर एचडीएफसी बँकेचं 20 हजारांचं आणि सावकाराचं 10 हजार रुपयांचं कर्ज होतं. शेती करत करत ते गावात मोल मजुरी सुद्धा करत होते.

या घटनेला 2 दिवस उलटले आहेत. पण, सरकारनं अजूनही दखल घेतलेली नाही. त्या उलट तलाठ्याला संपर्क साधला तर सध्या खूप कामं आहेत नंतर बघू, असं उत्तर तलाठ्यानं दिलं असल्याचं गावाचे सरपंच श्यामराव भिसे यांनी सांगितलंय.

याआधी पाससाठी पैसे नाहीत म्हणून अहमदपूर तालुक्यतल्या स्वाती पिटले या मुलीने आत्महत्या केली होती. तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रभर गदारोळ झाला होता. त्यानंतर पदवीपर्यंत मुलींसाठी मोफत पास योजना कार्यान्वित करण्यात आली होती. शासकीय धोरणानुसार मागासवर्गीय विद्यार्थ्यांना परीक्षा फी नसते. पण तरीही शासन या विद्यार्थ्यांकडून परीक्षा फी भरून घेते आणि निकालासोबत भरलेली परीक्षा फी परत करत असते.

Similar News