भाजपच्या प्रचारात कॉंग्रेस नेते पी चिदंबरम यांच्या सुनेचा फोटो...

भाजपच्या प्रचारात कॉंग्रेस नेते पी चिदंबरम यांच्या सुनेचा फोटो? काय आहे सर्व प्रकरण?

Update: 2021-03-31 12:23 GMT
देशात सध्या ५ राज्यात विधानसभा निवडणूका होत आहेत. या प्रत्येक राज्यात प्रचार जोरात सुरू आहे. तमिळनाडूमध्ये भाजप आणि एआईएडीएमके यांचं गठबंधन करून निवडणुकीला सामोरं जात आहेत. तर कॉंग्रेस ने डीएमके सोबत हात मिळवला आहे. या निवडणुकीच्या धबडक्यात भाजपचं एक ट्वीट चांगलंच चर्चेत आहे.

28 मार्चला भाजपच्या सोशल मीडिया टीमने ट्विटरवर एक पाच मिनीटांचा व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओत एक महिला शास्त्रीय नृत्य करताना दिसते.

आता तुम्ही म्हणाल त्यात काय मग एवढं? मात्र, ती नृत्य करणारी महिला इतर कुणी नसुन कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांची सून डॉक्टर श्रीनिधि चिदंबरम आहे. आता एवढं सगळं झाल्यावर बवाल तर होणारच ना… पी चिदंबरम यांची सून भाजपचा प्रचार करत आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

काय आहे प्रकरण?

भाजपने त्यांच्या 'BJP Tamilnadu' या अधिकृत ट्वीटर हॅंडलवर राज्याची संस्कृती आणि सभ्यता दर्शविण्यासाठी 28 मार्च रोजी एक व्हिडिओ पोस्ट केला होता. त्याचं टायटल होतं 'कमल को खिलने दो, तमिलनाडू को बढने दो' या व्हिडीओत एक महिला शास्त्रीय नृत्य करताना दिसते.

कोण आहे 'ती' महिला?

शास्त्रीय नृत्य करणारी ती महिला इतर कुणी नसुन कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांचे चिरंजीव कार्ति चिदंबरम यांची पत्नी डॉक्टर श्रीनिधि चिदंबरम या आहेत.

..आणि भाजपची चूक समोर आली

भाजपचे हे ट्वीट टाइम्स नाऊच्या पत्रकार शिल्पा नायर यांनी पाहिलं. त्यांनी या ट्वीटचा स्क्रिन शॉट ट्वीट करत भाजपची ही चूक समोर आणली. शिल्पा यांच्या ट्वीटवर श्रीनिधी चिदंबरम यांनीही "हे हास्यास्पद आहे. भाजपने प्रचारासाठी माझा फोटो वापरलाय." अशी कमेंट केली आहे.

गाणं देखील विशेष..

'सिमोझी' हे हे खूप लोकप्रिय तामिळ गीत आहे. ते प्रसिध्द संगीतकार ए. आर. रहमान यांनी संगीतबध्द केलंय. विशेष म्हणजे याचे बोल तमिळनाडूचे तत्कालीन मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांनी २०१२ च्या जागतिक तामिळ परिषदेच्या वेळी लिहिले आहेत.

दरम्यान, आपली चूक लक्षात आल्यावर भाजपने लगेचच हे ट्वीट डिलीट केलं आहे.

 हे ट्वीट भाजपने डिलीट केलं असलं तरी कॉंग्रेसने यावरुन भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.



आम्हाला हे माहिती आहे की तुम्हाला सहमती शब्द समजायला कठीण आहे. मात्र, आपण मिसेस श्रीनिधी कार्ति चिदंबरम यांचा फोटो विना परवानगी कसे वापरू शकता? तुम्हीं जे केलं आहे. त्यावरुन तुम्ही खोटा प्रचार करत असल्याचं सिद्ध झालं आहे.



Tags:    

Similar News