शरद पवार की अजित पवार, राष्ट्रवादी कुणाची? निवडणूक आयोगापुढे आज सुनावणी

Update: 2023-10-06 05:25 GMT

अजित पवार गटाने सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राष्ट्रवादीत शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट तयार झाले. मात्र राष्ट्रवादीत फूट पडली नसल्याचे मत शरद पवार यांनी व्यक्त केले होते. तर अजित पवार गटाने निवडणूक आयोगात धाव घेतली होती. त्यामुळे या प्रकरणी निवडणूक आयोगात आज सुनावणी होणार आहे.

एकीकडे अजित पवार यांनी राष्ट्रवादी आमचीच असल्याचा दावा केला आहे. तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीत फूट पडली नाही आणि राष्ट्रवादी शरद पवार यांच्याच गटाची असल्याचा दावा केला जात आहे. त्यावर निवडणूक आयोग आज सुनावणी घेणार आहे. मात्र त्यापुर्वीच शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विस्तारीत कार्यकारिणीची बैठक घेऊन रणनिती आखली आहे.

यावेळी शरद पवार यांनी मीच राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष असल्याचे म्हटले आहे. तसेच मला अध्यक्ष बनवण्यासाठी याच लोकांनी प्रस्ताव मांडल्याचेही शरद पवार यांनी म्हटले आहे. त्याबरोबरच विस्तारीत कार्यकारिणीच्या बैठकीत शरद पवार यांच्या अध्यक्षपदाच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब करणारा ठराव संमत करण्यात आला. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या सुनावणीपुर्वीच शरद पवार यांनी खेळलेली ही मोठी खेळी असल्याचे म्हटले जात आहे.

आतापर्यंत नेमकं काय घडलं?

30 जूनला अजित पवार यांचे पक्षाध्यक्ष पदावर दावा सांगणारे पत्र निवडणूक आयोगाला देण्यात आले.

2 जुलै- अजित पवार यांनी सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला.

5 जुलै- पक्षाध्यक्ष म्हणून बहुमताने अजित पवार यांची निवड करण्यात आल्याचा ठराव आणि आमदारांची शपथपत्रं निवडणूक आयोगाला सादर

शरद पवार यांच्या गटाची सुनावणी आधी घ्यावी, यासंदर्भात जयंत पाटील यांच्याकडून कॅवेट दाखल

14 सप्टेंबर – राष्ट्रवादीत दोन गट पडल्याचे निश्चित. त्यानंतर तीन आठवड्यात कागदपत्रं सादर करण्याचे आदेश

6 ऑक्टोबर- राष्ट्रवादी कुणाची? या याचिकेवर निवडणूक आयोगासमोर दुपारी 3 वाजता सुनावणी

चिन्ह गोठवण्याची शक्यता?

दोन्ही गटाने राष्ट्रवादीवर दावा केल्याने निवडणूक आयोग चिन्ह आणि पक्षाचे नाव गोठवण्याची शक्यता कायदे तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

Tags:    

Similar News