आठरा पगड जातीत शरद पवार यांनी विष कालवलं, राज ठाकरेंचा शरद पवार यांच्यावर पुन्हा निशाणा

राज ठाकरे यांची अनेक दिवसांपासून चर्चेत असलेली सभा पार पडली. या सभेत राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

Update: 2022-05-02 03:08 GMT

राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात भोंग्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे ते अचानक चर्चेत आले होते. तर या भोंग्यांच्या मुद्द्यावरून राज्यात राजकारण तापले आहे. त्यामुळे राज ठाकरे औरंगाबादच्या सभेत काय बोलणार याकडे राज्याचे लक्ष लागले होते. मात्र राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी आणि शरद पवार यांच्यावर टीकास्र सोडले.

राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळावा आणि ठाणे येथील सभेत केलेल्या आऱोपाचा पुनरुच्चार केला. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर राज्यात जातीपातीचे राजकारण वाढले असल्याची टीका केली. यावेळी राज ठाकरे म्हणाले की, 1999 आधी राज्यात जात होती. मात्र त्यानंतर शरद पवार यांनी जाती-जातीत दुहीची बीजं पेरली. आठरा पगड जातीत विष कालवलं. तसंच जेम्स लेनसारखा माणूस राष्ट्रवादीनेच उभा केल्याचा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केला.

राज ठाकरे म्हणाले की, शरद पवार यांची जुनी भाषणं काढून पाहिले तर त्यामध्ये त्यांनी कधीही छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतले नाही. मात्र मी टीका केल्यानंतर शरद पवार छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेत असल्याचा दावा राज ठाकरे यांनी केला.

शरद पवार यांनी राज ठाकरे यांना प्रबोधनकार ठाकरे यांची पुस्तकं वाचण्याचा सल्ला दिला होता. त्यावर राज ठाकरे यांनी उत्तर देतांना मी माझ्या आजोबांची पुस्तकं वाचली आहेत. त्याचे राज ठाकरे यांनी काही संदर्भ दिले. त्याचे तुम्ही वाचन करा, असा टोला शरद पवार यांना लगावला. तसेच राज ठाकरे म्हणाले की, शरद पवार यांनी लेखकांच्या जातीनुसार इतिहासाचे गुणगाण गायले. तर बाबासाहेब पुरंदरे यांना शरद पवार यांनी त्रास दिल्याची टीका राज ठाकरे यांनी केली.

जेम्स लेनने इतिहासाची मोडतोड केल्याचा आरोप केला जातो. मग तुम्ही केंद्रात सत्तेत होता. तेव्हा तुम्ही जेम्स लेनला फरफटत का आणले नाही? असा सवाल राज ठाकरे यांनी केला. तसंच शरद पवार यांना हिंदू शब्दाची Allergy आहे, असा आरोप राज ठाकरे यांनी केला.

Tags:    

Similar News