पंतप्रधान मोदींनी व्हाट्सप युनिव्हर्सिटीचे कुलगुरू बनू नये - ॲड. यशोमती ठाकूर

Update: 2022-02-08 14:44 GMT

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेवर बोलताना काँग्रेसवर टीका केली आहे. देशातील बेरोजगारी, धार्मिक द्वेष, महागाई यावर बोलण्यापेक्षा त्यांनी काँग्रेसला टार्गेट केले. तसेच पुन्हा एकदा पंडीत नेहरुंवर टीका करताना काही आरोपही केले आहेत. पण त्यांच्या या टीकेला राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी उत्तर दिले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या पद्धतीने गेल्या दोन दिवसात वक्तव्य केली आहेत ती अत्यंत चुकीची आणि असमर्थनीय आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. पंतप्रधान पदावरील व्यक्तीने अशा पद्धतीने खालच्या पातळीवर जाऊन हिन दर्जाचे राजकारण करू नये. पंतप्रधान पदाची असलेली प्रतिष्ठा कायम राखावी आणि अशोभनीय वर्तन करू नये अशी टीका यशोमती ठाकूर यांनी केली आहे.

"गोवा मुक्तिसंग्राममध्ये कोण लढलं आणि नेमके काय झाले याचा सर्व इतिहास उपलब्ध आहे तो इतिहास मोदींनी एकदा तपासून पाहावा आणि मगच बोलावे. कारण पंतप्रधान मोदींना केवळ संघाच्या शाखेत शिकवला जातो तितकाच इतिहास माहिती आहे. एखाद्या व्यक्तीची अथवा राज्याची प्रतिमा मलिन करण्यासाठी चुकीचा इतिहास रचून व्हाटसॲप युनिवर्सिटीचे कुलगुरू बनू नये, असा टोलाही त्यांनी लगावला आहेय. काँग्रेसने केलेल्या विकासाचे श्रेय काँग्रेसला न देता केवळ दूषणे देणे मोदी एवढेच काम मोदी करत आहेत, असेही ठाकूर यांनी म्हटले आहे. देशाचा जो काही विकास झाला तो गेल्या सात वर्षात आणि त्यापूर्वी 70 वर्षात काही झाले नाही असे भासवण्याचा केविलवाणा प्रयत्न मोदी करत आहेत. कारण त्यांना आता जनतेसमोर जायला कोणतेही मुद्दे उरलेले नाहीत. सत्ता हातातून जाईल, या भीतीने ते काहीही बरळत आहेत, अशी परखड टीका यशोमती ठाकूर यांनी केली आहे.

देशावर आलेल्या कोरोनाचे संकट काँग्रेसमुळे आलं आणि भाजपमुळे ते गेलं, असे हास्यास्पद विधान पंतप्रधानांसारख्या व्यक्तीने करू नयेत, हे त्यांच्या पदाला शोभणारे नाही, असेही यशोमती ठाकूर यांनी म्हटले आहे. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांना कधीही स्वतःची प्रतिमा उंचावण्यासाठी असली नौटंकी करावी लागली नाहीत, पंडीत नेहरू हे आंतरराष्ट्रीय नेते होते. त्यामुळे त्यांना आपल्या इमेजची चिंता किंवा इमेज बनवण्यासाठी आतासारखी नौटंकी कधी करावी लागली नाही, असा टोलाही ठाकूर यांनी लगावला आहे.

Similar News