थकीत ऊस बिलासाठी शेतकरी आक्रमक, भाजप खासदार संजय पाटील यांना थेट इशारा

Update: 2021-07-20 11:20 GMT

सांगली - जिल्ह्यातील नागेवाडी,तासगाव कारखान्याच्या थकीत बिलासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने खासदार संजय पाटील यांच्या तासगाव येथील संपर्क कार्यालयावर धडक दिली. तसेच अनेक शेतकऱ्यांसह इथे ठिय्या आंदोलन केले. गेल्या दोन वर्षापासून नागेवाडी व तासगाव कारखान्याचे बिल न मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी संजय पाटील यांच्या संपर्क कार्यालयावर मोर्चा काढत आंदोलन केले. यावेळी आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांने "बिल द्या नाही तर, तुमच्या कार्यालयावरून उडी मारू." असा थेट इशारा खासदार संजय पाटील यांना दिला. या आंदोलकांची भेट खासदार पाटील यांनी घेतली. यावेळी शेतकरी चांगलेच आक्रमक झाले होते.


खासदार संजय पाटील यांनी शेतकऱ्यांना 30 दिवसांची मुदत मागितली. मात्र शेतकऱ्यांनी ही मुदतवाढ देण्यास ठाम नकार दिला. आमचं बिल मिळाल्याशिवाय आम्ही कार्यालय समोरून उठणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व खासदार संजय काका यांच्यात शाब्दिक वादही झाला. यावेळी खासदारांना शेतकऱ्यांनी घेरावही घातला होता.

यापूर्वी खासदारांनी दोनवेळा शेतकऱ्यांकडून बिलासाठी मुदत मागून घेतली होती. त्यामुळे आता शेतकरी चांगलेच आक्रमक झाल्याचे चित्र दिसत होत. बिल घेतल्याशिवाय जाणार नाही "बिल आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे." असे म्हणत शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

तासगाव कारखाना जुन्या पद्धतीचा असल्याने आमचे मोठे नुकसान झाले आहे. पंतप्रधान इथेनॉल प्रकल्पामध्ये आता आम्ही अर्ज केलेला आहे. त्यामुळे इथून पुढच्या काळात तासगाव कारखाना हा अडचणीत येणार नाही. किंवा तोट्यात येणार नाही, असे संजय पाटील यांनी सांगितले. आता जे नुकसान झाले आहे ते आम्ही बँकेमार्फत किंवा संस्थेमार्फत ज्यादा व्याजदराने कर्ज उचलून शेतकऱ्यांची बिल देणार अशी ग्वाही खासदार संजय पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. झालेल्या दिरंगाईबद्दल संजय पाटील यांनी जाहीर दिलगिरी व्यक्त केली व येत्या महिन्याभरात शेतकऱ्यांचे पैसे देणार असल्याचे आश्वासन पाटील यांनी यावेळी दिले.

Full View

Tags:    

Similar News