उद्धव ठाकरे यांना हात धरुन मुख्यमंत्री केले, पवारांच्या विधानावर फडणवीस यांची टीका

Update: 2021-10-16 15:51 GMT

उद्धव ठाकरे यांना आपण सक्तीने मुख्यमंत्री होण्यास भाग पाडले, अशी माहिती शरद पवार यांनी दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आता मुख्यमंत्र्यांवर ट्विटच्या माध्यमातून टीका केली आहे. महाविकास आघाडी सरकार स्थापन करताना मुख्यमंत्री कोण होणार यावर चर्चा होती. पण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होण्यासाठी तयार नव्हते. पण आपण त्यांचा हात धरुन ते मुख्यमंत्री होतील अशी घोषणा केली, अशी माहिती शरद पवार यांनी पिंपरी चिंचवडमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात आपलाही सहभाग आहे, असे पवारांनी सांगितले. सगळ्या आमदारांच्या बैठकीत नेतृत्व कुणी करायचं, यावर दोन-तीन नावं पुढे आली होती, उद्धव ठाकरे मात्र तयार नव्हते. आपण शेवटी त्यांना विचारलं काय करायचं, कुणाला मुख्यमंत्री करायचं आणि मग मीच उद्धव ठाकरेंचा वर केला आणि सांगितलं हेच मुख्यमंत्री होतील. त्यांना मुख्यमंत्री व्हायचे नव्हते पण मीच त्यांना मुख्यमंत्री व्हायला सांगितले, अशी माहिती शरद पवार यांनी दिली. दसरा मेळाव्याच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी आपण बाळासाहेब ठाकरे यांना शब्द दिला होता, त्यासाठी आपण मुख्यमंत्री झालो, असे सांगितले होते, त्यावर देवेंद्र फडणवीस यांनीही टीका केली होती. या टीकेच्या संदर्भात शरद पवारांनी वरील माहिती दिली.

पण पवारांच्या या गौप्यस्फोटांनतर देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे. " द्वापारयुगात सुईच्या टोकाएवढी जमीन द्यायला नकार दिल्यामुळे महाभारत घडले आणि कलियुगात मात्र तयार नसलेल्यांना हात धरून राज्यकारभाराला लावले, असे सांगणे म्हणजे किती हा भाबडेपणा? साहेब ! जो बूँद से गयी वो हौद से नहीं आती !"

असा टोला फडणवीस यांनी ट्विट करुन लगावला आहे.

Tags:    

Similar News