ED समोर चौकशीसाठी अनिल देशमुख गैरहजर, वकिलांमार्फत मागितली दुसरी तारीख

Update: 2021-06-26 07:42 GMT

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपूरमधील घरांवर ईडीने शुक्रवारी छापे टाकल्यानंतर देशमुख यांनी शनिवारी चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. ईडीच्या ऑफिसमध्ये अनिल देशमुख यांना चौकशीसाठी हजर रहायचे होते. पण अनिल देशमुख या चौकशीला गैरहजर राहिले आहेत. चौकशीसाठी दुसरी तारीख देण्यात यावी अशी मागणी त्यांनी आपल्या वकिलांमार्फत केली आहे. मनी लॉन्डरिंग प्रकरणी देशमुख यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर ईडीने या महिनाभरात दोनवेळा कारवाई केली आहे.

अनिल देशमुखांच्या अत्यंत जवळच्या सहकाऱ्यांना अटक

दरम्यान ईडीने शुक्रवारच्या छाप्यांनंतर अनिल देशमुख यांचे PA आणि PS यांना अटक केली आहे. शुक्रवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. देशमुख यांचे PA कुंदन शिंदे आणि PS संजीव पलांडे यांनी अटक करण्यात आली आहे. PMLA कायद्यांतर्गत या दोघांना अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी सकाळी ईडीने देशमुख यांच्या नागपूर आणि मुंबईतील घरांवर छापे घातले. दिवसभर ईडीची कारवाई सुरू होती. त्यानंचर रात्री कुंदन शिंदे आणि पलांडे यांना घेऊन ईडीचे अधिकारी बलार्ड पियर इस्टेट ऑफिसमध्ये घेऊन गेले. त्या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. सचिन वाझे यांनी देशमुख यांनी 100 कोटींच्या वसुलीचे आदेश दिल्याचा आऱोप परमबीर सिंग यांनी आपल्या पत्रातून केला होता. त्यानंतर अनिल देशमुख यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

Tags:    

Similar News