ABP-C Voter Survey: गोव्यात भाजप पुन्हा बाजी मारणार, मणिपूरमध्ये भाजप कॉंग्रेसमध्ये जोरदार टक्कर

ABP-C Voter Survey: गोव्यात भाजप पुन्हा बाजी मारणार, मणिपूरमध्ये भाजप कॉंग्रेसमध्ये जोरदार टक्कर

Update: 2021-11-13 12:24 GMT

पुढील 5 महिन्यांत देशातील उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या 5 राज्यात निवडणूका होणार आहेत. राजकीय पक्षांनी आत्तापासूनच या निवडणुकांच्या दृष्टीने तयार केली आहे. दरम्यान या 5 राज्यातील निवडणुकांच्या अगोदर एबीपी-सी व्होटर सर्वेक्षणातून लोकांच्या मनस्थितीची झलक आपल्याला पाहायला मिळते.

गोव्यात विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीकोनातून भाजप आणि प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस यांच्यात थेट लढत होत आहे. मात्र, ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉंग्रेस आणि आम आदमी पार्टीने देखील गोव्यात एन्ट्री केल्याने राजकीय लढाई अधिक रंजक झाली आहे.

एबीपी-सी व्होटरच्या सर्वेक्षणानुसार 40 जागांच्या गोवा विधानसभेत भाजपला 19 ते 23 जागा मिळू शकतात, तर इतरांना 8 ते 12 जागा, आम आदमी पक्षाला 3 ते 7 तर काँग्रेसला फक्त 2 जागा मिळू शकतील असा अंदाज सी व्होटर ने वर्तवला आहे.

गोवा फॉरवर्ड पार्टी, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस या इतर पक्षांना फारसं यश मिळताना दिसत नाही.

दरम्यान, 2017 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 13 जागा जिंकल्या होत्या, तर काँग्रेसने 17 जागांवर विजय मिळवून गोव्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला होता. मात्र, भाजपने तडजोड करत सरकार स्थापन केलं.

मात्र, यावेळी एबीपी-सी मतदार सर्वेक्षणात काँग्रेसचा पराभव झाल्याच दिसून आलं आहे. मात्र निवडणुकीचा निकाल काय लागतो हे पाहणं गरजेचं ठरणार आहे. सर्वेक्षणानुसार, भाजपला 37.5% मते मिळू शकतात, तर 'आप'ला 23.6% आणि कॉंग्रेसला 18.6% मते मिळू शकतात.

मार्च 2017 मध्ये झालेल्या गोवा विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने जोरदार लढत दिली होती. मात्र, एकही जागा जिंकू शकला नव्हता.

मणिपूर

मणिपूरमध्ये भाजपला पुन्हा एकदा विजय मिळताना दिसत आहे. 60 जागांच्या मणिपूर विधानसभेत भाजपला 25 ते 29, काँग्रेसला 20 ते 24, नागा पीपल्स फ्रंट (NPF) 4 ते 8 आणि इतरांना 3 ते 7 जागा मिळू शकतात. दरम्यान, भाजपला 38.7 टक्के तर काँग्रेसला 35.1 टक्के मते मिळू शकतात. काँग्रेस मणिपूरमध्ये चांगली कामगिरी करताना दिसत आहे. 2017 च्या निवडणुकीत यूपीएने 28 तर एनडीएने 21 जागा जिंकल्या होत्या.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी नुकतंच मणिपूरचा दौरा केला होता. येथे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्याविरोधात आमदारांमध्ये नाराजी असल्याच्या वृत्तामुळे पक्ष निश्चितच चिंतेत आहे. तरीही पक्षाने आपल्या नेत्यांना सर्व मतभेद विसरून निवडणुकीच्या तयारीला लागण्यास सांगितले आहे.

Tags:    

Similar News