मंत्र्यांच्या मतदारसंघातील शेतकरीच मदतीपासून वंचीत; दिवाळीपूर्वी नुकसानभरपाई नाहीच

Update: 2021-11-04 14:14 GMT

राज्यात आज सर्वत्र दिवाळी आनंदात साजरी होत असताना शेतकऱ्यांसाठी मात्र ही दिवाळी कडू ठरली आहे. कारण महसूल विभागाच्या भोंगळ कारभारामूळे अनेक भागात शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसानभरपाई जमाच झाली नाही. विशेष म्हणजे कॅबिनेट मंत्र्यांच्या मतदारसंघात आणि जिल्ह्यात सुद्धा शेतकऱ्यांना मदतीपासून वंचीत राहावे लागले आहे.

औरंगाबाद, जालना, नांदेड आणि परभणी जिल्ह्यातील अनेक भागातील शेतकऱ्यांच्या खात्यावर आजही मदतीची रक्कम जमा झाली नाही. औरंगाबाद जिल्ह्यातील मंत्री संदीपान भुमरे यांच्या पैठण मतदारसंघात सुद्धा महसूल विभागाने काल संध्याकाळी याद्या बँकेकडे दिल्या तसेच रक्कम ऑनलाईन जमा न करता चेक दिल्याने शेतकऱ्यांना दिवाळी नंतर मदत मिळणार आहे.

तसेच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या जालना जिल्ह्याच्या अनेक भागातील शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत जमा झाली नाही. तर सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या नांदेड जिल्ह्याची सुद्धा हीच परिस्थिती असून, अनेक तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसानभरपाईची रक्कम जमा झाली नाही.त्यामुळे मंत्र्यांची दिवाळी जोमात आणि शेतकरी मात्र कोमात असं म्हणण्याची वेळ आली आहे.

मदतही पूर्ण मिळणार नाही....

शेतकऱ्यांची दिवाळी गोड व्हावी म्हणून दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी असे आदेश राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. मात्र अनेक ठिकाणी रक्कम जमा झालीच नाही पण, दिली जाणारी रक्कम सुद्धा 75 टक्केच पहिल्या टप्प्यात मिळणार आहे. त्यामुळे ठाकरे सरकारच्या या सर्व गोंधळामूळे शेतकऱ्यांमध्ये मोठी नाराजी आहे.

Tags:    

Similar News