झाँसीवाली! -भारतकुमार राऊत

Update: 2020-11-19 08:37 GMT

राष्ट्राच्या कल्याणार्थ
कल्याणिनी करी कल्लोळ
ती प्रिय भारत भाग्यार्थ
भागिरथि झाली लोल
आर्यांचे बहुनि हाल
हालवी मही दिग्गोल
मर्दानी झांशीवाली
परवशता पायाखाली
चिरडून निघे जयशाली
स्वातंत्र्याचा मनि ओढा
फेकला तटाहुनी घोडा


झाशीच्या किल्ल्याच्या तटावरून घोड़ा फेकून राणी लक्ष्मीबाई यांनी मर्दानी पराक्रम गाजवला. त्याचे वर्णन कविवर्य भा. रा. तांबे यांनी शब्दबद्ध केले. अशा या वीरांगनेचा आज जन्मदिन. ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देत 'मेरी झाँसी नहीं दुंगी' अशी गर्जना करत लढता लढता प्राण सोडलेल्या पण करोडो भारतीयांच्या स्मृतीपटलावर अमर झालेल्या झाशीच्या राणीला सलाम!

राणी लक्ष्मीबाईंचे मूळ नाव मणिकर्णिका तांबे. यांचे वडील मोरोपंत तांबे हे पुण्याच्या पेशव्यांच्या आश्रयाला होते. तांबे कुटुंब मूळचे सातारा जिल्ह्यातील होते. लक्ष्मीबाईंचा जन्म भागीरथी बाई यांच्या पोटी उत्तर प्रदेशातील काशी येथे १९ नोव्हेंबर १८२८ रोजी झाला.

त्यांचा विवाह झाशी संस्थानाचे राजे गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी झाला. तेंव्हा त्यांचे नाव बदलून लक्ष्मीबाई असे ठेवण्यात आले. लग्नानंतर झाशीच्या प्रजाजनांत राणीबद्दल विशेष प्रेम निर्माण झाले. दरबाराचे कामकाज राणीने पाहणे गंगाधररावांस पसंत नसल्याने मिळालेल्या वेळेचा उपयोग लक्ष्मीबाईंनी स्वत्त्व जपण्यासाठी केला. त्यांनी आपला रोजचा व्यायाम, कसरत, घोडेस्वारी, तलवारबाजी नियमित सुरू ठेवली.

गंगाधरराव नेवाळकर व लक्ष्मीबाई यांना मुलगा झाला परंतु तीन महिन्याचा असताना तो मृत्यू पावला. मुलाच्या रूपाने वारस मिळाल्याच्या आनंदात असणारे गंगाधररावही या गोष्टीने दुःखी झाले. त्यांनी वासुदेवराव नेवाळकर यांच्या मुलाला दत्तक घेऊन त्याचे दामोदर असे नाव ठेवले. १८५३ मध्ये गंगाधररावांचे निधन झाले. ईस्ट इंडिया कंपनीचे गव्हर्नर जनरल लाॅर्ड डलहौसी यांनी लक्ष्मीबाईंचे दत्तकविधान मान्य करण्यास नकार देऊन झाशी संस्थान खालसा करण्याची तयारी चालवली. लक्ष्मीबाईंना उत्तरेतील अधिकाऱ्यांकडे येण्याचे फर्मावण्यात आले.

लक्ष्मीबाईंनी आता चंडिकेचा अवतार घेतला. 'मेरी झाँसी नहीं दूँगी। किसी कींमतपर नहीं दूँगी।' अशी गर्जना करून त्यांनी आपल्या मोजक्या सैन्यासह युद्ध पुकारले. (हे वाक्य त्या हिंदीत बोलल्या की मराठीत, हा वृथा वाद काही स्वयंघोषित इतिहासकार आता उरकत आहेत पण १९व्या शतकात उत्तर प्रदेशातच स्थायिक झालेल्या तांबे व नेवाळकरांची भाषा मराठी ज्ञसेल की स्थानिक हिंदी, हा प्रश्न आहेच. असो. त्या वादात मला पडायचे नाही.)

ब्रिटिशांनी झाशीच्या किल्ल्याला वेढा घालून किल्ल्याची रसद तोडली, तेव्हा मोठ्या धैर्याने लक्ष्मीबाई आपल्या मुलाला पाठीशी घेऊन तटबंदीवरून घोड्यासह उडी मारून निसटल्या व ८० किलो मीटर्स दौड़ करत ग्वाल्हेरला पोहोचल्या.

तिथे फंदफितुरी झाली व लक्ष्मीबाईंवर कंपनी फौजांनी चाल केली. राणी स्वत: रणांगणात उतरल्या व शत्रूला कार्बन काढत ग्वाल्हेरच्या सीमेवर नदी तटावर पोहोचल्या. जखमी झालेल्या घोड्याला नदी पार करता येईना. अखेर शत्रू जवळून येऊन ठेपला. तुंबळ लढाई झाली. त्यात १८ जून १८५८ रोजी राणी लक्ष्मीबाई धारातीर्थी पडल्या. पराक्रमाची ज्वाला निमाली.

कवी भा रा तांबे यानी त्यांच्या आत्याच्या आत्माहुतीवर कविता रचली:

हे हिंद बांधवा थांब या स्थळी
अश्रू दोन ढाळी ।
ती पराक्रमाची ज्योत मालवे
इथे झाँसीवाली ।।

- भारतकुमार राऊत

Tags:    

Similar News