स्थलांतरित मजूर: "रिझर्व्ह आर्मी”

Update: 2020-09-29 04:12 GMT

स्थलांतरित मजूर प्रायः दोन प्रकारचे असतात. जन्मदेशातून परदेशात गेलेले आणि आपल्याच देशात जन्मगावाहून दुसऱ्या ठिकाणी गेलेले. गेली अनेक दशके आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत स्थलांतरित मजुरांची संख्या वाढत राहिली. ती सर्व जगात मिळून अनुक्रमे २७ कोटी आणि ७६ कोटी आहे. कॉर्पोरेट भांडवलशाहीच्या आर्थिक आणि सामाजिक/राजकीय अजेंड्यामध्ये त्यांचा खुबीने वापर केला जातो.

आर्थिक अजेंडा :

कॉर्पोरेट भांडवलशाहीचा नफा मानवी श्रम किती स्वस्तात उपलब्ध होणार यावर ठरत असतो. स्थानिक श्रमिक वाकवायला कठीण असतात; त्यांची सामाजिक/राजकीय मुळे असतात; त्यांचे कुटूंब, छोटे का होईना? घर त्यांच्या जगण्याच्या खर्चाला सब्सिडाइज करत असते.

स्थलांतरित मजूर आर्थिक, सामाजिक, भावनिक दुबळे / व्हर्नॅरेबल असतात. नोकरी गमवायची भीती असल्याने शिस्तीत राहतात. ट्रेड युनियन सभासद होत नाहीत. कमी वेळात जास्त पैसे कमवण्यासाठी १२-१२ तास काम करायला तयार असतात. स्थलांतरितांमुळे त्या त्या भूभागातील वेतन पातळी सतत कोर्पोरेट्सना कमी ठेवता येते आणि नफ्याची पातळी जास्त…

सामाजिक / राजकीय अजेंडा

कॉर्पोरेट भांडलशाही धार्जिण्या आर्थिक धोरणांमुळे बेरोजगारी, आर्थिक विषमता वाढून असंतोष धुमसत राहतो; तो दुसरीकडे वळवणे गरजेचे असते. स्थानिकांच्या मनात स्थलांतरितांबद्दल सतत एकप्रकारचा शत्रुभाव असतो.

स्थलांतरित आल्यामुळे आपल्या नोकऱ्या कमी झाल्या, स्वयंरोजगारातील धंद्यात वाटेकरी आले, हे कमी पैशात राहायचे. असल्यामुळे गलिच्छ राहतात.

त्यांच्यामुळे झोपडपट्या वाढल्या, काही वर्षांनी हे आपल्या बायको मुलांना आणतात, आमच्या आरोग्यक्षेत्रावर ताण आला, आमच्या शाळांवर ताण आला, रेल्वे, बस यातील गर्दी प्रचंड वाढली. अशा “आरोपांची” भली मोठी यादी असते. कोट्यावधी सामान्य नागरिकांचे जवळपास सर्वच प्रश्नांची मुळे आर्थिक धोरणांत असतात; पण आर्थिक धोरणांमुळे तयार झालेला असंतोष स्थानिक विरुद्ध स्थलांतरित अशा वादात रूपांतरित करणे सोपे जाते.

 

Similar News