काँग्रेसचा विचार लोकांपर्यंत का पोहोचत नाही?

Update: 2021-10-26 10:20 GMT

काँग्रेसच्या अंतरिम पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी पक्षाचा विचार सर्वव्यापी असूनही लोकांपर्यंत पोहोचत नाही याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. सोनिया गांधी यांनी आपली चिंता इंग्रजी पत्रकाद्वारे पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे, इथंपासून या चिंतेची सुरूवात होते. गेल्या कित्येक वर्षांपासून काँग्रेसला सूर गवसत नाहीय. लोकांपर्यंत पोहोचण्याचे मुद्दे-प्रश्न-समस्या हाती लागून ही काँग्रेस मिळालेल्या संधीचं सोनं करू शकलेली नाही. याची अनेक कारणं आहेत त्यातील शिस्त आणि एकी हे दोन महत्वाचे मुद्दे आहेत हे स्वतः सोनिया गांधी यांनी मान्य केलेले आहे, त्यातला तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे काँग्रेसची भाषा सामान्य माणसाची राहिलेली नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पदभार स्विकारण्याच्या आधीपासूनच हिंदी तसंच जिथे जिथे शक्य आहे तिथल्या स्थानिक भाषांच्या वापर केला. मोदी चांगले प्रचारक आणि संवादक आहेत त्यामुळे त्यांची भाषणं लोकांपर्यंत पोहोचतात, त्यांच्या भाषणात असत्य जरी असलं तरी ही लोकांना ते सहजसोप्या भाषेत सांगीतलं गेल्यामुळे खरं वाटतं. याचमुळे ढग आलेलं रडार असो किंवा विज्ञानातले अनेक दिव्य प्रयोग, मोदींचं रॉ इंटेलिजन्स खपून जातं. मोदी हे देशातील सामान्य बुद्धीमत्तेच्या जनतेचं प्रतिनिधीत्व करतात. ज्यांना पाकिस्तान पर बम डालना चाहीए और चीन को लाल आँख दिखानी चाहीए इथपासून मोदीजीने अमरिका को पेला अशा टाइपच्या भाषेची आणि सहज विश्लेषणाची सवय आहे. मोदी इथल्या इंटेलेक्चुअल क्सास चं दर्पण नाहीयत. त्यांची लोकप्रियता आणि विविध एजन्सी वापरायची हातोटी बघून इंटेलेक्च्युअल क्लास त्यांच्या भजनी लागलाय. याला तडका म्हणून धर्म आहेत. अशा वातावरणात मोदींचं गारूड तोडायचं असेल तर काँग्रेसला आपल्या मांडणीत अमूलाग्र बदल घडवावा लागेल, भाषा बदलावी लागेल, प्रचाराची पद्धत बदलावी लागेल, विशेष म्हणजे सोनिया गांधी म्हणतात तसं कार्यकर्त्यांचं प्रशिक्षण घ्यावं लागेल.

मध्यंतरी मी काँग्रेस कार्यकर्ता प्रशिक्षणाचे काही व्हिडीयो पाहिले. त्यांच्या स्टेजवर प्रशिक्षणांसोबत स्थानिक मानापमानाचं प्रदर्शन घडवणारी २०-३० लोकांची गर्दी सहज असते. स्टेज च्या खाली तुरळक कार्यकर्ते. प्रशिक्षक भाषणं देतात आणि जातात. कार्यकर्त्यांना नेमकं काय करायचंय हे माहित नसतं, त्यात माहित असलं तरी आमदाराचा मुलगा किंवा मुलगी पंचायत समिती, झेड पी बनणार, एपीएमसी जिंकणार, पुन्हा आमदारकी किंवा खासदारकी ला उभं राहणार हे पक्कं माहित असल्याने कार्यकर्त्यांना सतरंज्यांमध्ये फार इंटरेस्ट दिसत नाही. त्यातले हुशार कार्यकर्ते हाँजीहाँजी करून कंत्राटं पदरात पाडून घेतात, बाकीचे आयुष्यभर पक्षात सडतात. पक्षाने सामान्य कार्यकर्त्यांसाठी प्रगतीचं आरक्षण न ठेवल्याने सामान्य कार्यकर्त्यांसाठी प्रोत्साहन नसलेला पक्ष अशी काँग्रेसची स्थिती आहे. इतर राज्यांमध्ये तर काँग्रेस म्हणजे बडा घर पोकळ वासा अशीच स्थिती आहे. परवा लालू प्रसाद यादव यांनी मुलाखतीत स्पष्टच सांगीतलं की, काँग्रेसला हारण्यासाठी तिकीटं द्यायची का? राहुल गांधी यांनी संघपरिवाराच्या आणि नरेंद्र मोदींच्या विरोधात उघडलेल्या आघाडीमुळे राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसचं नाव चर्चेत जरूर असतं. मात्र निवडणुकांच्या रणनीती मध्ये राहुल गांधी आणि प्रियांका गांधी दोघं ही यशस्वी ठरताना दिसत नाहीयत.

पक्षाची वाईट अवस्था झालेली असूनही पक्षाचे नेते आपली प्रतिष्ठा सोडायला तयार नाहीत. नवीन कार्यकर्त्यांना प्रोत्साहन द्यायला तयार नाहीत. अनेकांचं वागणंही सरंजामदारांसारखं आहे. गटबाजीमुळे काँग्रेस पोखरून गेली आहे. निष्क्रिय पदाधिकाऱ्यांच्या वर्षानुवर्षे थेट दिल्लीतून नियुक्त्या-नेमणुका होत असतात. 'दिल्ली दरबार', हायकमांड या ओळखीच्या बाहेर पक्ष यायला तयार नाही. पक्षाचे अनेक महत्वाचे नेते लोकांशी इंग्रजीतून 'संवाद' साधतात. लोकांना समजू नये अशी व्यवस्था जर काँग्रेसने केली असेल तर आता लोकांना काँग्रेसची भूमिका समजत नाही म्हणून रडून काय उपयोग आहे.

महत्वाच्या विषयांवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी दोन-चार ओळींचं ट्वीट टाकून गायब होतात. त्यांच्या ट्वीटचा उपयोग देशात एकही जनआंदोलन उभं करायला झालाय का? राहुल गांधी महागाई-ईंधन दरवाढीवर रस्त्यावर उतरत नाहीत, आणि काँग्रेस चालवणं ही गांधी परिवाराची जबाबदारी असल्याने देशभर काँग्रेसही रस्त्यावर उतरत नाही. काँग्रेसची सर्व आंदोलनंही इस्त्रीची घडी मोडणार नाही अशा स्वरूपाची असतात. एकूणच काँग्रेसच्या निर्णय प्रक्रीयेत महिलांना अत्यंत दुय्यम स्थान आहे, जातीय गणित बिघडलेले आहे. लोकशाही तर या पक्षात अभावानेच दिसते. अशा परिस्थितीत काँग्रेसला पुन्हा-पुन्हा उभारी देण्याचा प्रयत्न करणं म्हणजे व्यर्थ सुकलेल्या चिपाडापासून रस काढण्याचा प्रकार आहे.

सध्या देशात निर्माण झालेली परिस्थिती अभूतपूर्व आहे. देशात घडत असलेल्या सर्वच घटना या सरकारच्या विरोधात जाणाऱ्या आहेत. महागाई, बेरोजगारी, कोविड परिस्थिती, अर्थव्यवस्था, आरोग्य व्यवस्था, ईंधनाचे दर इ इ पासून लोकांचं धोक्यात आलेलं उत्पन्न-बचत इतके ज्वलंत प्रश्न असूनही काँग्रेस उभारी घेऊ शकली नाही. लोकांची मने जिंकू शकली नाही. काँग्रेस सातत्याने याचा दोष माध्यमांना-ईव्हीएम ना देते, पण समजा उद्या माध्यमे ही काँग्रेसच्या बाजूने झाली तरी काँग्रेस माध्यमांना काय विचार देणार आहे, काय नॅरेटीव्ही देणार आहे. एकूणच सगळा गोंधळ आहे.

सोनिया गांधी यांनी एकी आणि शिस्त दाखवण्याचा संदेश काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांना दिला आहे. काँग्रेसमध्ये सध्या या दोन्ही गोष्टी गायब आहेत. काँग्रेसच्या सर्व नेत्यांना याची जाणीव आहे, मात्र काँग्रेसमध्ये जहागिरी किंवा सरदारकी एकदा मिळाली की ची जात नाही. अशी स्थिती असल्याने काँग्रेसचा दिल्ली दरबार निष्क्रीय झाला आहे.

Tags:    

Similar News