शाळेजवळच्या पानटपऱ्यांवर कारवाई कधी ?

शैक्षणिक परिसरात तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ्यांच्या विक्रीला बंदी आहे. मात्र, तरीही सर्रासपणे या कायद्याचं उल्लंघन केलं जातंय. त्यातूनच ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांच्यावर नुकताच जीवघेणा हल्ला झाला. त्यानंतर पुन्हा एकदा शिक्षण संस्थांच्या परिसरातील पानटपऱ्यांचा मुद्दा चर्चेत आलाय. कायद्याने वागा लोकचळवळीनं कायद्यानुसार अशा बेकायदेशीर पानटपऱ्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी केलीय. पोलीस उपायुक्त सुधाकर पठारे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत पानटपऱ्यांविरोधात कारवाईची ग्वाही दिली आहे.

Update: 2023-10-12 13:48 GMT

कायद्याने वागा लोकचळवळीचे अध्यक्ष राज असरोंडकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पोलिस उपायुक्त सुधाकर पठारे यांची भेट घेऊन शाळा परिसरातील पानटपऱ्यांविरोधात  कारवाईची मागणी करणारं निवेदन दिलं. शिष्टमंडळात प्रफुल केदारे, प्रकाश भोसले, शैलेंद्र रुपेकर, नितीन साळवे, गणेश परदेशी, प्रवीण फुंदे, राहुल पाटील, बाळू शेलार, संदीप चाचर, घनश्याम ढाकणे, सादिक शेख यांचा समावेश होता.

अलिकडेच अहमदनगरमध्ये सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कायद्याने वागा लोकचळवळीने हे पाऊल उचलल्याचं राज असरोंडकर यांनी सांगितलं.

हेरंब कुलकर्णी (Heramb Kulkarni)यांनी ते मुख्याध्यापक असलेल्या शाळा परिसरातील पानटपरी वि रोधात तक्रार केली होती. त्याचा राग धरून कुलकर्णी यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. तो हल्ला म्हणजे त्यांना जीवे मारण्याचीच सुपारी होती, असं पोलीस तपासात उघड झालेलं आहे.

ही गंभीर घटना असून कायदे मोडणारे इतके माजले असतील तर त्यांना कायद्याचा बडगा दाखवून गरजेचं आहे अशी प्रतिक्रिया राज असरोंडकर यांनी दिली आहे.

Full View

खरं म्हणजे नियम कायद्यांची अंमलबजावणी करणं शासकीय यंत्रणांचं कर्तव्य असतं ; परंतु ते आपलं कर्तव्य बजावत नाहीत, त्यामुळे नागरिकांना तक्रारीसाठी पुढे यावं लागतं. तक्रारी केल्यानंतरही शासकीय यंत्रणा आपले हात वर करीत तक्रारदारामुळे कारवाई करावी लागत असल्याचा पवित्र घेतात. या घातकी प्रवृत्तीतूनच तक्रारदार नागरिकांच्या जीवाला जोखीम निर्माण होते, असं असरोंडकर यांनी चर्चेदरम्यान पोलिस उपायुक्तांच्या निदर्शनाला आणलं. त्यावर सकारात्मक प्रतिसाद देत सुधाकर पठारे यांनी पानटपऱ्यांवरून शाळकरी मुलांना व्यसनात ओढण्याचा गैरप्रकार मोडून काढला जाईल, असं सांगितलं. 

सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर निर्बंध आणणारा कायदा आपल्याकडे अस्तित्वात आहे. त्यातील कलम ६ नुसार अल्पवयीन मुलांना तंबाखूजन्य पदार्थ विकता येत नाहीत तसंच शैक्षणिक संस्थांच्या १०० यार्ड वर्तुळाकार क्षेत्रात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीस मज्जाव आहे. या तरतुदींचा आधार घेऊन कारवाई होईल, अशी ग्वाही पोलीस उपायुक्त सुधाकर पठारे यांनी शिष्टमंडळाला दिली.

यासोबतच गांजासेवन तसंच वाढत्या गुन्हेगारीला कारण ठरत असलेली परिस्थिती असरोंडकर यांनी पोलीस उपायुक्तासमोर ठेवली व निवेदनाच्या माध्यमातून काही उपाययोजनाही सुचवल्या.‌ कायद्याने वागा लोकचळवळीच्या तक्रारीनंतर तत्कालीन उपायुक्त पोलिस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी परिमंडळ स्तरावर एक परिपत्रक जारी करून गांजेड्यांविरोधात मोठी मोहीम राबवली होती.  त्या परिपत्रकाच्या अनुषंगाने सर्व पोलीस ठाण्यांना पुनर्सुचना देण्यात येतील, असंही पोलीस उपायुक्त सुधाकर पठारे यांनी म्हटलंय. कायद्याने वागा लोकचळवळीने सुचवलेल्या उपाययोजना कृतीकारवाई शक्य आहे आणि आम्ही ती करू, असं आश्वासन पठारे यांनी दिलंय.

पोलिस उपायुक्तांनी संपूर्ण निवेदन काळजीपूर्वक वाचलं. मांडणीचं कौतुकही केलं. वेळ देऊन सविस्तर चर्चा केली. लोकसहभागाची अपेक्षाही व्यक्त केली. एकंदरीत त्यांचा प्रतिसाद सकारात्मक होता व त्यामुळे लवकरच पानटपऱ्यांविरोधात धडक मोहिम सुरू होईल, अशी अपेक्षा राज असरोंडकर यांनी व्यक्त केलीय.

Similar News