मेधा पाटकरांचा गुन्हा काय?

लोकप्रतिनिधींचा कोट्यवधींचा घोडेबाजार’ चालतो, अशी बातमी चहाबरोबर निर्विकारपणे वाचणारे मध्यमवर्गीय मेधा पाटकरांची मात्र कसून चौकशी होताना पाहून खूष होतात.चळवळ आणि संघर्ष काय असतो हे जवळून अनुभवणारे चित्रपट दिग्दर्शक सुनिल सुकथनकर यांनी उपस्थित केलेले काही प्रश्न...

Update: 2022-07-19 04:02 GMT

नर्मदा नवनिर्माण अभियान या संस्थेचा मी एक विश्वस्त आहे. होय, याच संस्थेवर 'मुलाबाळांसाठी पैसे मागून ते 'राष्ट्रविरोधी' कार्यासाठी वापरल्याचा' आरोप करून FIR नोंदवली गेली आहे! नर्मदा बचाओ आंदोलन गेली ३७ वर्षं अविरत चालवणाऱ्या मेधा पाटकर आणि विश्वस्त मंडळाच्या सर्वांवर हा आरोप केलाय! (मी विश्वस्त होण्यापूर्वीच्या सर्वांवर, पण आज त्यात माझंही नाव असू शकलं असतं.)

संस्थेचे पै-पै चा हिशोब ठेवत केलेले ताळेबंद मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आहेत. ते सालोसाल धर्मादाय आयुक्तांकडे सुपूर्द केले जातात.

मी महाविद्यालयात असताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कार्यरत होती. अनेक जवळचे मित्र, आवडते प्राध्यापक त्यात होते. याच अभाविपच्या बडवानी ( मध्य प्रदेश) इथल्या एका 'जागरूक' सभासदानं ही FIR केली आहे. माझ्या या मित्रांशी यावर मी आज बोलू तरी शकेन का?

कडेकपारीत धरणामुळे बुडवल्या गेलेल्या दुर्गम बेटांवर या ' जीवनशाळा' चालतात. तिथे बोटीतून, तंगडेतोड करत मी गेलोय. तिथली निरागस मुलं पाहून स्वतःच्या जीवनशैलीविषयी अंतर्मुख होत परत आलोय. आपल्या एकेका अपत्यासाठी तीन-तीन लाख रुपये फी भरणारे माझे नातेवाईक, मित्र आहेत. जीवनशाळेच्या या हजारभर मुलांना एक नाष्टा, दोन वेळचं जेवणं आणि शिक्षण अनेक वर्ष देत रहायला लागणाऱ्या किमान खर्चाची कल्पना या 'विद्यार्थी' परिषदेच्या तक्रारकर्त्याला नसेल? आणि या पोरांच्या तोंडचा घास पळवून केलेलं 'राष्ट्रविरोधी' कार्य कोणतं? तर धरणग्रस्तांचं न्याय्य पुनर्वसन व्हावं म्हणून चाललेली धडपड…!

मागे एकदा यावर FB वर लिहिलं तर ' सार्वजनिक कार्यात असणाऱ्यानं सदैव तपासणीला तयार रहायलाच हवं, त्यावर गळे कसले काढता' असा दम काहींनी भरला. मला आलेल्या सात्विक संतापाची संभावना माझी ' अंगभूत गुंडप्रवृत्ती' म्हणून केली! असो.

तरीही आज समाजमाध्यमावर व्यक्त व्हावंसं वाटतंय.

ही FIR निःसंशय खोडसाळ आहे. संस्थेची बदनामी व्हावी. मोजकेच देणगीदार बिचकावेत आणि सर्व कार्यकर्त्यांचा बहुमोल वेळ कोर्टकचेऱ्यात अडकून पडावा एवढाच हेतू मला दिसतोय. 'लोकप्रतिनिधींचा कोट्यवधींचा घोडेबाजार' चालतो, अशी बातमी चहाबरोबर निर्विकारपणे वाचणारे मध्यमवर्गीय मेधा पाटकरांची मात्र कसून चौकशी होताना पाहून खूष होतात. कारण आपलं सुखलोलुप किडुकमिडुक- भ्रष्ट जीवन हे भ्रष्ट लोकप्रतिनिधी समर्थनीय करतात. मेधाताईंसारखे लोक पाहून आपल्या मनात अपराधीभाव जागा होतो! म्हणून त्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपात काही काळ तरी गुंतवलं तर मजा येते !!

ही वैरभावातून लादलेली खोडसाळ FIR रद्द व्हावी, अशी मागणी देशभरांतल्या १४०० च्या वर महत्वाच्या व्यक्तींनी केली आहे. ते 'महत्त्वाचे' नसून ' राष्ट्रद्रोही'च आहेत, हे माझ्या अनेक FB- मित्रांना आधीच माहित आहे.

माझ्या निवेदनांतून समर्थन मागण्याचा मला कंटाळा येतोय. निषेधाचा आणि कुचेष्टेचा सूर कोण लावणार हेही माहितीय. मनोमन पटूनही गप्प कोण रहाणार हेही माहितीय ! How predictable!!!

खरी गंमत पुढेच आहे. इतकं सगळं असून लोकशाहीवर, अहिंसक आंदोलनावर आणि संवादावर असणारी माझी निष्ठा काही कमी होत नाहिये. होणारही नाही.

ही FIR करणाऱ्यांपासून ते यावर वाद घालणाऱ्यांना एकच विनंती- फक्त एकदा जीवनशाळा आणि मेधाताईंचं काम प्रत्यक्ष पाहून या… मग भेटू.. बोलू…! तेही शक्य नसेल तर ' लकीर के इस तरफ' आणि ' जीवनशाळा' हे माहितीपट पाहू शकता…!

लकीर के इस तरफ लिंक

जीवनशाळा लघुपट लिंक

Tags:    

Similar News