खरे `कर्मवीर'!

आज सर्वत्र स्वयंघोषित `कार्यसम्राटां'चा सुकाळ झालेला असताना गेल्या शतकाच्या पूर्वार्धात शिक्षणाची गंगा रयतेपर्यंत पोहोचवण्यासाठी अथक प्रयत्न करणाऱ्या कर्मवीर भाऊराव पाटील यांचा आज स्मृतिदिन! त्यांच्या अद्वितीय कार्याला श्रद्धांजली ! वाहिली आहे ज्येष्ठ संपादक भारतकुमार राऊत यांनी.

Update: 2021-05-09 04:09 GMT

कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज या गावी 22 सप्टेंबर 1887 रोजी जन्मलेल्या भाऊराव पायगोंडा पाटील यांनी आपली उभी हयात केवळ शिक्षणाच्या प्रसारासाठीच व्यतीत केली. बहुजन समाज सुशिक्षीत व्हावा आणि अस्पृश्यतेचा कलंक समाजातून पुसला जावा, यासाठी भाऊराव सतत प्रयत्नशील राहिले. हे कार्य करताना त्यांना जसा जनतेकडून पाठिंबा व प्रोत्साहन मिळाले, तसेच समाजातील काही घटकांनी त्यांच्या मार्गात अडथळेही आणले. पण कशाचीही पर्वा न करता भाऊरावांनी आपले कार्य अथकपणे चालूच ठेवले.

कोल्हापुरात राजाराम हायस्कूलमध्ये शिकत असतानाच राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा व कार्याचा प्रभाव भाऊरावांवर पडला व त्यांनी आपले जीवन समाज उद्धारासाठी वाहून घेतले. पुढे ते साताऱ्यात येऊन उपजीविकेसाठी शिकवण्या घेऊ लागले, तेव्हाच भाऊसाहेब कुदळे व नानासाहेब येडेकर यांच्या सहकार्याने त्यांनी दुधगाव शिक्षण मंडळ सुरू केले व संस्थेतर्फे सर्व जाती-धर्माच्या विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह स्थापन केले.

रयत शिक्षण संस्थेच्या स्थापनेची बीजे त्यांच्या मनात इथेच रुजली. काही काळ ओगल्यांचा काच कारखाना व किर्लोस्करवाडी इथे काम केल्यावर भाऊरावांनी साताऱ्यात 4 ऑक्टोबर 1919 रोजी रयत शिक्षण संस्थेची मुहुर्तमेढ रोवली. महात्मा जोतिबा फुले यांनी शिक्षण प्रसाराचे जे कार्य अंगिकारले होते, तेच भाऊरावांनी पुढे चालवले. जोतिबा फुलेंच्या सत्यशोधक चळवळीशीही ते जोडले गेले होते.

रयत शिक्षण संस्था ही महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक जीवनातली मोठी क्रांती ठरली. आजही रयत शिक्षण संस्था ही राज्यातील सर्वात मोठी शिक्षणसंस्था मानली जाते. देशाच्या व महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात वावरणारे अनेक जण याच शिक्षण संस्थेतून बाहेर पडले आहेत. याचे कारण शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गात शिक्षणाविषयी जागरुकता निर्माण करण्याबरोबरच गरीब मुलांना मोफत शिक्षण, जातिधर्मांत परस्पर प्रेम संबंध निर्माण करणे, अनिष्ठ रुढींना फाटा देणे, संघशक्ती निर्माण करणे, काटकसर, स्वावलंबन, सुशीलपणा यांचे महत्त्व पटवणे, हीच रयत शिक्षण संस्थेच्या कार्याची मुख्य सूत्रे राहिली.

साताऱ्यात 1927 मध्ये त्यांनी गरीब, गरजू, व होतकरू मुलांसाठी मोफत वसतीगृह - श्री छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊस - उभारले. त्याचे उद्धाटन महात्मा गांधींनी केले. महात्माजींनी या संस्थेस त्यांच्या हरिजन सेवक फंडातून वार्षिक 500 रुपयांची मदतही सुरू केली. या कामासाठी निधी उभारण्याकरता भाऊरावांना त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांचे मंगळसूत्र व दागिनेही विकावे लागले होते. पुढे भाऊरावांचे कार्य वाढतच गेले. अनेक जिल्ह्यांत संस्थेच्या शाळा, वसतीगृहे व महाविद्यालये सुरू झाली. हजारो विद्यार्थी त्यात शिकून मोठे होऊ लागले.

त्यांच्या कार्याची पावती म्हणून जनतेनेच त्यांना `कर्मवीर' हा किताब बहाल केला. शिवाय पुणे विद्यापीठाने `डी.लिट्'ची सन्माननीय पदवी देऊन त्यांचा गौरव केला. भारत सरकारने त्यांना 1959मध्ये `पद्मभूषण' हा किताब दिला. असे भाऊराव 1959मध्ये आजच्या दिवशी आपल्याला सोडून गेले. ते गेले पण त्यांची रयत शिक्षण संस्था व त्यात शिकलेले लाखो विद्यार्थी यांच्या रुपाने त्यांच्या कार्याच्या स्मृती चिरंतन झाल्या आहेत.

Similar News