Digital दुनियेचे दोन चेहरे : Social Mediaचा आभास आणि Googleचे वास्तव

अल्गोरिदम तुम्हाला स्क्रीनला कसा खिळवून ठेवतो ? तंत्रज्ञानाच्या जाळ्यातून बाहेर पडण्यासाठी 'साक्षर' होणे किती आणि का गरजेचे? केवळ टेक्नॉलॉजी वापरता येणे म्हणजे Digital साक्षरता का? यासंदर्भात लेखक अमोल साळे यांचा लेख नक्की वाचा..

Update: 2025-11-20 07:02 GMT

आज आपण एकविसाव्या शतकात जगत आहोत, ज्याला 'माहितीचे युग' किंवा 'इन्फॉर्मेशन एज' म्हटले जाते. आपल्या दिवसाची सुरुवात मोबाईलच्या स्क्रीनकडे पाहून होते आणि शेवटही तिथेच होतो. Facebook, Google, Amazon, इंस्टाग्राम फेसबुक, गूगल, अमेझॉन, इन्स्टाग्राम या आता केवळ वेबसाईट किंवा ॲप्स राहिल्या नसून त्या आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनल्या आहेत. या महाकाय यंत्रणा आहेत आणि त्यांच्या व्यवसायाचे गणित साधे आहे - 'डेटा' Data. 

आपल्याला वरकरणी या सेवा मोफत वाटतात. आपण विचार करतो की, गुगल मॅप वापरायला पैसे पडत नाहीत किंवा फेसबुकवर अकाउंट उघडायला फी लागत नाही. पण इंटरनेटच्या जगात एक प्रसिद्ध म्हण आहे - "जर तुम्हाला उत्पादनासाठी पैसे मोजावे लागत नसतील, तर तुम्ही स्वतःच उत्पादन आहात (If you are not paying for the product, you are the product)." या कंपन्यांच्या व्यवसायात जगभरातील लोकांचा डेटा गोळा करणे हाच मुख्य उद्देश आहे.

आपण काय विकतोय?

या वेबसाईटची रचनाच मुळात अशा पद्धतीने केली आहे की, जगभरातून लोक आनंदाने, उत्साहाने आणि स्वतःहून आपला डेटा या यंत्रणांबरोबर शेअर करत असतात. आपण कोठे जातो (लोकेशन), आपण काय खातो, आपले राजकीय विचार काय आहेत, आपल्याला कोणता आजार झाला आहे, आपण कोणाच्या प्रेमात आहोत, इथपासून ते आपल्या बँक खात्याच्या स्थितीपर्यंत... आपली ओळख (Identity), आपल्या खरेदीच्या आवडीनिवडी, सामाजिक मते, आरोग्य विषयक डेटा आणि अत्यंत खासगी माहिती गोळा करणे हेच या अल्गोरिदमचे काम आहे.

आपल्याला स्वतःलाही कल्पना नसेल इतकी प्रचंड माहिती आपल्याविषयी या वेबसाईट दररोज साठवत आहेत. यालाच 'बिग डेटा' (Big Data) म्हटले जाते. पण गम्मत अशी आहे की, हा डेटा गोळा करण्याच्या दोन पद्धती आहेत आणि त्यातून मानवी स्वभावाचे दोन अत्यंत विरोधी पैलू समोर येतात.

 गुगल: आधुनिक काळातील 'कन्फेशन बॉक्स' Google

खरे तर माहिती गोळा करण्यात आणि माणसाचे सत्य ओळखण्यात सगळ्यात आघाडीवर आहे ते गुगल. चर्चमध्ये जसा 'कन्फेशन बॉक्स' असतो, जिथे माणूस देवासमोर आपल्या पापांची कबुली देतो, तसे आजचे गुगल हे आधुनिक कन्फेशन बॉक्स बनले आहे.

जेव्हा तुम्हाला काहीतरी सिरीयसली शोधायचे असते, तेव्हा सगळ्यात प्रथम आपण गुगल करतो. आपल्याला काहीतरी रोग झाला आहे, असे जेव्हा कुणाला वाटते, तेव्हा तो डॉक्टरकडे जाण्याआधी गुगलला जाऊन आपली लक्षणे विचारतो. "छातीत दुखत असेल तर काय करावे?" किंवा "डिप्रेशनची लक्षणे काय असतात?" हे प्रश्न लोक डॉक्टरांना विचारण्याआधी गुगलला विचारतात. लोक गुगलकडे सर्वात ऍक्युरेट (अचूक) माहिती देत असतात. कारण तिथे कोणालाही इम्प्रेस करायचे नसते, तिथे कोणी तुम्हाला जज (Judge) करणार नसते. तिथे तुम्ही एकटे असता आणि तुमची भीती किंवा जिज्ञासा खरी असते.

सोशल मीडिया: एक सजवलेली दुनिया SocialMedia

याउलट दुसरीकडे सोशल मीडियाचे जग आहे. फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप स्टेट्स यावर शेअर केल्या जाणाऱ्या गोष्टी या 'तथ्य' नसून ते एक 'प्रदर्शन' असते. समाजमनाचे एक वैशिष्ट्य आहे, माणसाला सतत आपली चांगली बाजू जगाला दाखवायची असते.

फेसबुक-इंस्टाग्रामवर जेव्हा कुणीतरी आपले आनंदी, हसरे, पार्टी करतानाचे किंवा फिरायला गेल्याचे फोटो टाकते, तेव्हा ते आपल्या आयुष्याचा एक छोटा आणि अत्यंत निवडक भाग जगाला दाखवत असतात. त्याला 'हायलाईट रील' म्हणता येईल. इतर वेळी जेव्हा ते दुःखी असतात, जेव्हा घरात भांडणे झालेली असतात, किंवा जेव्हा आर्थिक चणचण असते, तेव्हाचा रडवेला चेहरा ते फेसबुकवर टाकत नाहीत. एखाद्याचे पोट बिघडले तर तो फेसबुकवर जाऊन सेल्फी टाकत नाही, पण त्यासाठी उपाय काय आहेत, हे गुगल सर्चवर जाऊन नक्कीच शोधतो.

'बिग डेटा'ने उघड केलेले सत्य: नवरा कसा आहे? BigData

'सेठ स्टीफन्स-डेविडोवित्झ' (Seth Stephens-Davidowitz) या डेटा सायंटिस्टने 'एव्हरीबडी लाइज' (Everybody Lies) या आपल्या पुस्तकात एक अत्यंत रंजक संशोधन मांडले आहे, जे या विषयावर प्रकाश टाकते.

जेव्हा त्यांनी फेसबुकवर "माझा नवरा ...... आहे" (My husband is...) अशा आशयाच्या लाखो पोस्टचा डेटा तपासला, तेव्हा सगळ्यात जास्त पाच वाक्ये अशाप्रकारे पूर्ण होत होती:

माझा नवरा: ग्रेट आहे.

माझा नवरा: माझा बेस्ट फ्रेंड आहे.

माझा नवरा: बेस्ट आहे.

माझा नवरा: अमेझिंग आहे.

माझा नवरा: क्युट आहे.

थोडक्यात काय, तर सोशल मीडियावर प्रत्येक स्त्रीचा नवरा हा जगातील सर्वोत्तम पती आहे असे चित्र उभे राहिले.

पण, जेव्हा हाच डेटा 'गुगल सर्च'च्या हिस्ट्रीमधून तपासला गेला, जिथे कोणी पाहत नाही, तेव्हा धक्कादायक वास्तव समोर आले. तिथे हे वाक्य खालील पाच प्रकारे सर्वात जास्त वेळा पूर्ण होत होते:

माझा नवरा: (jerk) मूर्ख आहे.

माझा नवरा: (annoying) त्रासदायक आहे.

माझा नवरा: (gay) समलिंगी आहे.

माझा नवरा: (mean) क्षुद्रवुत्तीचा आहे.

माझा नवरा: (amazing) भारी आहे.

हा विरोधाभास का?

गुगल व फेसबुकवर एकाच आशयाचे वाक्य इतके वेगळे का? याचे उत्तर मानवी मानसशास्त्रात आहे. फेसबुकवर जे टाकले जाते ते आपले मित्र, नातेवाईक, सहकारी पाहतात. तिथे आपली 'प्रतिष्ठा' महत्त्वाची असते. "माझे आयुष्य किती सुखी आहे" हे सिद्ध करण्याची तिथे शर्यत असते. त्यामुळे फक्त चांगल्या गोष्टी टाकायच्या आणि वाईट गोष्टी झाकायच्या, हे ओघाने आलेच. हे चूक आहे असेही म्हणता येणार नाही, ही मानवी प्रवृत्तीच आहे.

उलटपक्षी, गुगलवर जे टाकले जाते ते इतरांना दिसत नाही. तिथे 'प्रायव्हसी' आहे असा आभास निर्माण होतो. त्यामुळे तिथे लोक आपले मुखवटे उतरवतात आणि मनातली खदखद, भीती, शंका मोकळेपणाने मांडतात. गुगलला आपले सत्य माहित असते, तर फेसबुकला आपली स्वप्ने (किंवा आपण कसे दिसू इच्छितो ते रूप) माहित असते.

अर्थात, गुगल आणि फेसबुक या दोन्ही कंपन्यांना या डेटाच्या खरे-खोटेपणाविषयी पूर्ण कल्पना आहे. ते या दोन्ही प्रकारच्या माहितीचा वापर करून तुम्हाला 'टार्गेटेड जाहिराती' दाखवतात. तुम्ही आनंदी असाल तर 'हॉलिडे पॅकेज'ची जाहिरात येते आणि दुःखी असाल तर 'मानसोपचार तज्ज्ञांची' किंवा 'वकिलांची' जाहिरात येते.

तुलनेचा आजार आणि मानसिक परिणाम

या माहितीच्या खेळाचा आणि दुहेरी वागण्याचा सर्वात मोठा दुष्परिणाम आजच्या पिढीच्या MentalHealth मानसिक आरोग्यावर होत आहे. यालाच मानसशास्त्रात आता 'सोशल मीडिया एन्झायटी' किंवा 'फोमो' (FOMO - Fear Of Missing Out) म्हटले जाते.

सतत फेसबुक, इंस्टाग्राम यांना स्क्रोल करणाऱ्या व्यक्तींमध्ये, विशेषतः टीनेजर्स आणि तरुणांमध्ये मानसिक विकृती निर्माण होत आहेत. जेव्हा एखादी सामान्य व्यक्ती दिवसभर ऑफिसमध्ये काम करून किंवा घरातल्या कटकटी सहन करून थकलेली असते आणि ती विरंगुळा म्हणून इंस्टाग्राम उघडते, तेव्हा तिला काय दिसते?

मित्र-मैत्रिणी मालदीवच्या बीचवर आहेत.

कोणाचे तरी लग्न झाले आहे आणि ते खूप रोमँटिक दिसत आहेत.

कोणीतरी नवीन गाडी घेतली आहे.

हे सतत पाहिल्यानंतर मानवी मेंदूत नकळत एक तुलना सुरू होते. "सगळं जग खूप आनंदात आहे, त्यांच्या नात्यात खूप प्रेम आहे, ते मस्त आयुष्य जगताहेत आणि आपलंच आयुष्य खराब, कंटाळवाणं आणि समस्यांनी भरलेलं आहे," अशी भावना बळावते.

वास्तविक, त्या फोटोत हसणाऱ्या जोडप्याचे फोटो काढण्यापूर्वी कडाक्याचे भांडण झाले असेल, हे आपल्याला माहित नसते. त्या बीचवरच्या फोटोला फिल्टर लावून ते सुंदर केलेले असते, हे आपण विसरतो. पण या सततच्या तुलनेमुळे लोकांमध्ये न्यूनगंड (Inferiority Complex) तयार होतो. स्वतःचे शरीर, स्वतःचा रंग, स्वतःची आर्थिक परिस्थिती याबद्दल लोक साशंक होतात. नैराश्य (Depression) येण्यामागे हे एक प्रमुख कारण बनत चालले आहे.

निष्कर्ष: उपाय काय?

या तंत्रज्ञानाच्या जाळ्यातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला 'साक्षर' होणे गरजेचे आहे. केवळ टेक्नॉलॉजी वापरता येणे म्हणजे साक्षरता नव्हे, तर ती टेक्नॉलॉजी आपला वापर कसा करत आहे, हे समजणे म्हणजे खरी डिजिटल साक्षरता.

सोशल मीडियावर दिसणारे जग हे 'एडिटेड' (Edited) आहे आणि आपले जग हे 'रॉ' (Raw) आहे, याची जाणीव सतत ठेवणे आवश्यक आहे. इतरांच्या 'बेस्ट' क्षणांशी आपल्या 'वर्स्ट' (Worst) क्षणांची तुलना करणे थांबवले पाहिजे.

गुगल असो वा फेसबुक, या Algorithm अल्गोरिदमचा उद्देश तुम्हाला स्क्रीनला खिळवून ठेवणे हा आहे. आपली सुख-दुःख, आपली गुपिते या डेटा कंपनीच्या सर्व्हरवर साठवली जात आहेत, याचे भान ठेवूनच त्यांचा वापर केला पाहिजे. शेवटी, खरा आनंद हा स्क्रीनच्या पिक्सेलमध्ये नसून, तो स्क्रीन बंद केल्यानंतर आपल्या आजूबाजूला असलेल्या खऱ्या माणसांच्या सहवासात आहे, हे समजून घेणे काळाची गरज आहे.


अमोल साळे

लेखक आर्थिक-सामाजिक विषयांचे अभ्यासक आहेत.

Similar News