यूलिप्स (ULIPs) योजना: गुंतवणूक की गैर-विक्री
बॅंकांचा ग्राहकांना बॅंकिंग सेवा पुरवण्यापेक्षा अनावश्यक फायनान्स प्रोडक्ट्स माथी मारण्यात जास्त इंटरेस्ट असतो. त्यापैकी एक यूलिप… ULIP म्हणजे काय ? त्यात गुंतवणूक करावी की नाही? ULIP आणि म्युच्युअल फंड + टर्म इन्शुरन्स यात काय फरक ? या गैर विक्रीकडे सरकार आणि नियामक संस्थेचं दुर्लक्ष ? काय आहे युलिप चे फायदे-तोटे सविस्तर जाणून घ्या आर्थिक-सामाजिक विषयांचे अभ्यासक अमोल साळे यांच्याकडून
भारतीय अर्थविश्वात गैर-विक्री (Miss-selling) म्हणजे लोकांच्या माथी चुकीचे प्रॉडक्ट मारणे हे फार कॉमन झाले आहे. यावर सरकार आणि नियामक संस्था फार प्रयत्न करताना दिसत नाहीत.
एखादी व्यक्ती बँकेत गेली की तिथल्या कर्मचाऱ्यांचा बँकिंग सेवा पुरवण्यापेक्षा विविध अनावश्यक फायनान्स प्रोडक्ट्स लोकांच्या माथी मारण्यात जास्त इंटरेस्ट असतो. यूलिप (Unit Linked Insurance Plan) हे त्यापैकीच एक प्रॉडक्ट आणि इथेच ग्राहकांची सर्वाधिक फसवणूक होते.
धोका आणि फसवे विक्रीचे स्वरूप
अनेकदा, बँकांमध्ये मुदत ठेव (FD) करण्यासाठी गेलेल्या वृद्धांना किंवा सामान्य ग्राहकांना, बँकर (Banker) एफडी ऐवजी विमा योजनांमध्ये (Insurance Plans) गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करतात. हे सांगताना त्यांना अनेकदा फसवलं जातं की ही केवळ ‘एक-वेळ’ची गुंतवणूक आहे आणि त्यांना नेहमी ‘गॅरंटीड इंटरेस्ट इनकम’ मिळत राहील. तसेच, गरज पडल्यास पैसे कधीही काढता येतील, असे आश्वासन सुद्धा दिले जाते.
परंतु, प्रत्यक्षात जेव्हा ग्राहक पैसे काढायला जातात, तेव्हा त्यांना कळते की या योजनेत ५ किंवा १० वर्षांचा लॉक-इन (Lock-in) कालावधी आहे. इतकेच नाही तर, त्यांना ‘वन-टाइम प्रीमियम’ ऐवजी दरवर्षी मोठी रक्कम भरावी लागेल, अन्यथा आतापर्यंत जमा केलेले पैसे विसरून जावे लागतील, असे सांगितले जाते. अशा फसव्या विक्रीमुळे एजंट्स त्यांचे लक्ष्य (Targets) पूर्ण करतात आणि कमिशन कमावतात, पण ज्या ग्राहकासोबत हा फसवणूक होते, त्याचे आयुष्य उद्ध्वस्त होते.
माझ्या एका मित्राला ULIP विकताना बँकेने घरपोच सेवा दिल्या. अगदी त्याच्या शेतातल्या घरात त्यांचा कर्मचारी पाठवून सगळे सोपस्कार पूर्ण केले. त्याला जेव्हा आपण तोट्यात गेलो आहोत आणि ही पॉलिसी बंद केली पाहिजे हे लक्षात आले, तेव्हा त्याच लोकांनी त्याला उत्तर देणे, कॉल घेणे बंद केले. पॉलिसी सरेंडर करण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी ६० किलोमीटर दूर जावे लागेल असे सांगितले.
म्युच्युअल फंड म्हणजे नक्की काय?
स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी सामान्य लोकांसाठी म्युच्युअल फंड हे सर्वात सोपे आणि स्वस्त प्रॉडक्ट उपलब्ध आहे. म्युच्युअल फंड म्हणजे अनेक गुंतवणूकदारांकडून निधी गोळा करून तो व्यावसायिक फंड व्यवस्थापकांद्वारे विविध कंपन्यांचे शेअर्स, कर्ज साधने किंवा सोन्यात गुंतवला जातो. या गुंतवणुकीचे व्यवस्थापन तज्ज्ञ करतात, ज्यामुळे सामान्य गुंतवणूकदारांना वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओमध्ये लहान रकमेतूनही गुंतवणूक करता येते. म्युच्युअल फंड्सचे नियंत्रण 'सेबी' (SEBI) या नियामक संस्थेकडून केले जाते.
यूलिप म्हणजे काय? (What is ULIP?)
यूलिपचे पूर्ण स्वरूप ‘युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन’ असे आहे. ही जीवन विमा (Life Insurance) आणि गुंतवणूक (Investment) यांचे मिश्रण असलेली योजना आहे.
हे प्रॉडक्ट खरंतर धड गुंतवणूक सुद्धा करत नाही आणि इन्शुरन्स ही नीट देत नाही. विशेष म्हणजे ULIP चे रिटर्न्स सांगितले जातात त्यापेक्षा खूप कमी असतात. सांगितलेले हे संभाव्य रिटर्न्स सगळ्या फीस वगळून दाखवले जातात, म्हणजे १२ टक्के रिटर्न दिसत असले तरी त्यात विविध शुल्के वजा केल्यास इफेक्टिव रिटर्न पाच ते सहा टक्क्यांपेक्षा जास्त नसतात.
यूलिपमध्ये अनेक hidden charges (उदा. प्रीमियम अलॉटमेंट चार्ज, मॉर्टॅलिटी चार्ज, डिस्कन्टिन्यूएशन चार्ज) असतात जे बऱ्याचदा कस्टमरला सांगितले जात नाहीत. यूलिप विकणाऱ्या एजंट्सचा गैर-विक्रीचा मुख्य आधार हा असतो की, यूलिप म्हणजे 'म्युच्युअल फंड + इन्शुरन्स' चे सर्वोत्तम संयोजन आहे, तर म्युच्युअल फंडात केवळ गुंतवणूक असते. हे पूर्णपणे दिशाभूल करणारे आहे.
NAV रिटर्न्सची फसवणूक: जिथे ULIP आणि MF मध्ये मोठा फरक आहे
म्युच्युअल फंडाचे रिटर्न्स हे त्यातील चार्जेस (एक्सपेंस रेशो) गृहीत धरून सांगितले जातात. म्युच्युअल फंडमध्ये NAV (Net Asset Value) ची गणना करताना सर्व खर्च वजा केले जातात.
मात्र, यूलिपच्या बाबतीत, NAV रिटर्न्स प्रकाशित करताना फंड मॅनेजमेंट फी वजा होते, पण मॉर्टॅलिटी चार्ज वजा होत नाही. हा चार्ज तुमच्या युनिट्समधून नंतर कापला जातो. यामुळे कंपनी जाहिरात करते त्या NAV रिटर्न्सपेक्षा तुमचे वैयक्तिक रिटर्न नेहमी कमी दिसतात. यूलिप आणि म्युच्युअल फंड यांच्यातील हा महत्त्वाचा फरक एजंट्स मुद्दाम लपवतात.
(यूलिप घेण्याऐवजी शुद्ध (Pure) टर्म इन्शुरन्स घेऊन उरलेली रक्कम म्युच्युअल फंडात गुंतवणे हा संपत्तिनिर्मितीचा सर्वोत्तम मार्ग आहे.)
ULIP (यूलिप) आणि म्युच्युअल फंड + टर्म इन्शुरन्सची तुलना
वैशिष्ट्ये | म्युच्युअल फंड (MF) + टर्म इन्शुरन्स (TI) | यूलिप (ULIP) |
प्रॉडक्टचे स्वरूप | दोन स्वतंत्र आणि सर्वोत्तम साधने (Pure Investment + Pure Protection). | एकाच प्रॉडक्टमध्ये विमा आणि गुंतवणुकीचे मिश्रण (Combined Product). |
विमा कवच (Sum Assured) | अतिउच्च कवच (उदा. ₹20,000 वार्षिक प्रीमियममध्ये ₹2 कोटी पर्यंत). | मर्यादित कवच (उदा. ₹2 लाख वार्षिक प्रीमियममध्ये केवळ ₹10 लाख पर्यंत). |
खर्चाचे स्वरूप | अत्यंत कमी आणि पारदर्शक. MF मध्ये फक्त एक्सपेंस रेशो (Expense Ratio) आणि TI मध्ये फक्त प्रीमियम. | अनेक छुपे शुल्क (उदा. मॉर्टॅलिटी चार्ज, प्रीमियम अलॉटमेंट चार्ज, ॲडमिन चार्ज). |
गुंतवणुकीचे फायदे | अत्यंत कमी आणि पारदर्शक. MF मध्ये फक्त एक्सपेंस रेशो (Expense Ratio) आणि TI मध्ये फक्त प्रीमियम. | प्रीमियमचा मोठा भाग विम्याचे शुल्क व इतर शुल्कांमध्ये जातो, त्यामुळे गुंतवणूक कमी होते. |
मृत्यू लाभ (Death Benefit) | कुटुंबाला टर्म इन्शुरन्सची संपूर्ण रक्कम + फंडातील जमा झालेली संपूर्ण गुंतवणूक रक्कम दोन्ही मिळतात. | कुटुंबाला विमा कवच किंवा फंड व्हॅल्यू यापैकी जे जास्त असेल तेच मिळते, दोन्ही मिळत नाहीत. |
कर लाभ (Tax Benefit) | MF (ELSS) आणि TI प्रीमियमवर 80C अंतर्गत वजावट. TI चा मृत्यू लाभ 10(10D) अंतर्गत करमुक्त. | प्रीमियमवर 80C अंतर्गत वजावट आणि मॅच्युरिटी लाभ काही मर्यादांपर्यंत 10(10D) अंतर्गत करमुक्त. |
धोका व्यवस्थापन (Risk Mgmt) | उच्च आणि कमी धोका असणारे भाग स्वतंत्रपणे हाताळले जातात. | एकाच प्रॉडक्टमध्ये गुंतागुंत निर्माण होते. |
तरलता (Liquidity) | अत्यंत जास्त. MF मधून (ELSS वगळता) कधीही पैसे काढता येतात. | कमी. ५ वर्षांचा अनिवार्य लॉक-इन कालावधी असतो. त्यापूर्वी काढल्यास दंड लागतो. |
जीवन विम्याचे आवश्यक कवच आणि यूलिपचे अपयश
पर्सनल फायनान्सचा सर्वात पहिला आणि महत्त्वाचा नियम हा आहे की, गुंतवणूक उद्या करा, पण जीवन विमा आज आणि आत्ताच घ्या. जीवन विमा कवच इतके मोठे असावे की, तुमच्या मृत्यूनंतर तुमच्या कुटुंबाचे जीवनमान अजिबात विस्कळीत होऊ नये. हे आदर्श कवच तुमच्या सध्याच्या वार्षिक उत्पन्नाच्या १५ ते २० पट असावे.
यूलिप्स या मूलभूत गरजेच्या तुलनेत खूपच कमी विमा कवच देतात. उदाहरणार्थ, ₹२ लाख वार्षिक प्रीमियम असलेल्या यूलिपमध्ये तुम्हाला फक्त ₹९.८ लाखांचे कवच मिळते. याउलट, टर्म इन्शुरन्समध्ये केवळ ₹२०,००० ते ₹३०,००० वार्षिक प्रीमियम भरून (वय २८-३३ वर्षांदरम्यान) तुम्हाला ₹२ कोटींचे कवच मिळते. जो व्यक्ती वर्षाला लाखो रुपये प्रीमियम भरण्याची क्षमता ठेवतो, त्याला इतके कमी विमा कवच कशासाठी?
प्रीमियमचा बोजा: SIP नाही
यूलिप प्रीमियमला SIP (Systematic Investment Plan) मानणे ही मोठी चूक आहे. जर तुम्ही ३० व्या वर्षी यूलिप घेतले आणि दरवर्षी ₹१-२ लाख प्रीमियम भरण्याचे वचन दिले, तर सात-आठ वर्षांनंतर जर आर्थिक परिस्थिती बिघडली, तर हा मोठा प्रीमियम भरणे जिकिरीचे ठरते. जर तुम्ही प्रीमियम भरला नाही, तर केवळ काही दिवसांच्या ग्रेस पिरियडनंतर तुमचा जीवन विमा ‘लॅप्स’ (Lapse) होतो.
याव्यतिरिक्त, कमी होत जाणारे विमा कवच यूलिपमध्ये तुमचे गुंतवणूक मूल्य जसजसे वाढते, तसतसे तुमचा मॉर्टॅलिटी चार्ज कमी होत जातो. ज्या वर्षी तुमची गुंतवणूक रक्कम विमा कवचापेक्षा जास्त होते, त्या वर्षी मॉर्टॅलिटी चार्ज शून्य होतो. याचा अर्थ त्या दिवसापासून तुमच्याकडे कोणतेही जीवन विमा कवच राहिलेले नसते.
मृत्यू लाभ योजना (Death Benefit): सर्वात मोठा घोटाळा
यूलिपच्या नियम आणि अटींमध्ये स्पष्टपणे नमूद केलेले असते की, मृत्यू झाल्यास पुढीलपैकी सर्वाधिक असलेली (Highest of Three) रक्कम दिली जाईल: बेसिक सम ॲश्युअर्ड, फंड व्हॅल्यू किंवा एकूण भरलेल्या प्रीमियमच्या १०५% रक्कम.
याचा अर्थ असा की, पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास, त्याच्या कुटुंबाला विमा कवच आणि आजपर्यंतची गुंतवणूक व नफा दोन्ही मिळत नाहीत.
* शक्यता १ (गुंतवणूक कमी): जर मृत्यू लवकर झाला आणि गुंतवणुकीची रक्कम विमा कवचापेक्षा कमी राहिली, तर कंपनी फक्त विमा कवच देईल, पण त्याचे जमा झालेले गुंतवणूक मूल्य देणार नाही.
* शक्यता २ (गुंतवणूक जास्त): जर गुंतवणूक मूल्य विमा कवचापेक्षा वाढले, तर मृत्यू झाल्यास कुटुंबाला फक्त वाढलेले गुंतवणूक मूल्य मिळेल आणि विमा कवच (Sum Assured) मिळणार नाही.
गैर-विक्री टाळण्यासाठी काही सोपे नियम:
या चुका टाळण्यासाठी पर्सनल फायनान्स मध्ये काही सोपे नियम आहेत:
१. गुंतवणूक आणि इन्शुरन्स एकत्र करू नका. कुठलेही प्रॉडक्ट ज्यात हे दोन्ही एकत्र आहेत त्याला टाळा.
२. इन्शुरन्स साठी टर्म इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स पुरेसे आहेत.
३. स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी सामान्य लोकांसाठी म्युचुअल फंड हे स्वस्त प्रॉडक्ट उपलब्ध आहे. यूलिपमधून धड गुंतवणूक ही होत नाही आणि इन्शुरन्स सुद्धा होत नाही.
कॅपिटल गॅरंटी योजना (Capital Guarantee Plans)
या योजना भारतीयांचे लक्ष वेधून घेण्यासाठी 'गॅरंटी' शब्दाचा वापर करतात. यात सांगितले जाते की, पॉलिसीची मुदत संपल्यावर जर तुमचे गुंतवणूक पोर्टफोलिओ तोट्यात असेल, तरी गुंतवलेली मूळ मुद्दल परत मिळेल. हे एक दिशाभूल करणारे नियम आहे, कारण दीर्घकाळात या हमीचा काही उपयोग होत नाही. उलट, २० वर्षांनंतर परत मिळालेल्या मूळ मुद्दलेचे मूल्य महागाईमुळे कमी झालेले असते.
निष्कर्ष
विमा आणि गुंतवणूक कधीही एकत्र मिसळू नका. तुम्हाला आवश्यक असलेला टर्म इन्शुरन्स घ्या आणि उरलेले पैसे म्युचुअल फंड, पीपीएफ, एफडी किंवा एनपीएस मध्ये तुमच्या गरजेनुसार, तुमच्या इच्छेनुसार, कोणत्याही दबावाशिवाय गुंतवा.
जर तुम्हाला यूलिप विकत घेऊन १५ दिवस झालेले नसतील, तर ‘फ्री लुक पिरियड’ (Free Look Period) वापरून ती लगेच रद्द करा.
अमोल साळे
लेखक आर्थिक-सामाजिक विषयांचे अभ्यासक आहेत.
amoalsale@gmail.com