Sonam Wangchuk : सम्यक संवादाचे मार्ग खुले ठेवण्याची आवश्यकता
MaxBlog आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरविण्यात आलेल्या सोनम वांगचुक यांना देशद्रोही म्हणून २ महिन्यांपासून जोधपूर तुरुंगात ठेवलंय... त्यांना तुरुंगात ठेवून काय साध्य करू पाहतेय सरकार? सोनम वांगचुक यांचा जीवनप्रवास सांगताहेत लेखक प्रदीप आवटे
३० ऑक्टोबर २०२५, आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या Time Magazine टाईम मॅगेझिनने जागतिक पातळीवरील सर्वाधिक प्रभावशाली शंभर क्लायमेट चेंज Climate Change नेत्यांची यादी जाहीर केली. आनंदाची गोष्ट म्हणजे यात आपल्या सोनम वांगचुक यांचा समावेश आहे. पर्यावरण, शिक्षण , संस्कृती (Environment, Education, Culture) यासंदर्भात अत्यंत मूलभूत आणि कल्पक काम करणाऱ्या सोनम वांगचुक यांना आजवर मिळालेल्या अनेक पुरस्कारात, मान्यतेमध्ये अजून एक भर. २०१८ साली त्यांना आशियाचा नोबेल समजला जाणारा मॅगसेसे पुरस्कारही Magsaysay Award मिळाला आहे.
पण आज कुठं आहे हा माणूस ? जोधपूरच्या तुरुंगात गजाआड ! का आणि कशासाठी ? यासाठी त्यांची जीवन कहाणी समजून घेतली पाहिजे.
१ सप्टेंबर १९६६ मध्ये Ladakh लडाख मधील Leh लेहपासून ७० किमी दूर असणाऱ्या एका पर्वतीय खेडेगावात Sonam Wangchuk सोनम वांगचूक यांचा जन्म झाला. गावात ना शाळा ना काही. वयाची ९ वर्षे होईपर्यंत त्यांची आईच त्यांना घरी शिकवत होती. लिहायला, वाचायला ते आईकडून शिकले. सेरींग वांगमो या त्यांच्या आईने या पोराला शिक्षणाचे प्राथमिक धडे दिले. बालपणी अत्यंत हूड असा हा पोरगा. दिवसभर आईला शेतात मदत करणे, नदीत डुंबणे, झाडावर, उंच पहाडांवर चढणे, शेळया- मेंढयामागे फिरणे आणि अधूनमधून आईकडून शिक्षणाचे अनौपचारिक धडे गिरवणे, असं अगदी आनंदादायी, बिनभिंतीच्या शाळेतील शिक्षण बालपणी सोनम यांच्या वाटयाला आले. त्यांचे वडील राजकारणात होते. तेव्हा लडाख हा Jammu Kashmir जम्मू काश्मीर राज्याचा भाग होता.
१९७५ साली वडील सोनम वांग्याल राज्य सरकारात मंत्री झाले आणि हे कुटुंब लडाखमधून श्रीनगरला गेले. तिथं पहिल्यांदा सोनमचा प्रवेश औपचारिक शाळेत झाला पण भलताच अनुभव आला. तिथं शिक्षणाचे माध्यम उर्दू आणि काश्मिरी या भाषा आणि सोनमला तर फक्त त्याची लडाखी भाषा यायची. त्यामुळे दिवसभर शाळेत शिक्षक काय शिकवत आहेत ते त्याला कळायचेच नाही. तो घुम्यासारखा बसून राहायचा, शिक्षकांना वाटायचे हा पोरगा नुसता ठोंब्या आहे, याला अकलेचा भाग नाही. अखेर यातून सोनमने स्वतःच मार्ग काढला. तो चक्क एकटाच दिल्लीला पळून गेला आणि तेथील केंद्रीय विद्यालयाच्या मुख्याध्यापकासमोर स्वतःची कहाणी मांडली. त्याने आपले हायस्कूल शिक्षण दिल्लीत पूर्ण केले. नंतर Mechanical Engineering मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या education शिक्षणासाठी त्याला नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, श्रीनगर येथे प्रवेश मिळाला. इथूनच त्यांनी B. Tec बी टेक ही पदवी घेतली मात्र इथं ही त्यांना बंड करावे लागले.
अभियांत्रिकीची कोणती शाखा घ्यायची याबद्दल त्यांचे आणि वडलांचे तीव्र मतभेद होते त्यामुळे आपले शिक्षण त्यांना स्वतः कमवत ‘कमवा आणि शिका’ या रितीने पूर्ण करावे लागले. १९८७ साली ते पदवीधर झाले.
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते लडाखला परतले. सुरुवातीच्या काळात त्यांनी शिक्षण व्यवस्थेकडे आपला मोर्चा वळवला. कारण शिक्षण व्यवस्था किती निकामी आहे, हे त्यांनी स्वतः अनुभवले होते. आपला भाऊ आणि पाच मित्र यांना सोबत घेऊन त्यांनी १९८८ मध्ये स्टुडंटस एज्युकेशनल ऍंड कल्चरल मुव्हमेंट ऑफ लडाख ( सेकमॉल) स्थापन केली. ही एका अर्थाने नापासांची शाळा होती. जी मुले नेहमीच्या शाळेतून नापास झाली आहेत त्यांनाच इथे प्रवेश मिळे. त्याकाळी बोर्ड परीक्षा नापास होणाऱ्या मुलांचे प्रमाण सुमारे ९५ टक्के होते कारण भाषेच्या प्रश्नामुळे मोठी गोची या मुलांची होत होती.
Secmol सेकमॉल ही शाळा म्हणजे हे अगदी वेगळे, सृजनशील, कल्पक जग. ही शाळा मुलेच चालवतात, इथं मुलं शेती करतात, बकऱ्या सांभाळतात आणि शिकतात देखील. ही संपूर्ण शाळा सौर ऊर्जेवर चालते. विद्युत गरजेपासून ते अन्न तयार करणे, पाणी तापवणे या सगळयांसाठी solar सौर उर्जा वापरली जाते. अल्पावधीतच ही School शाळा लोकप्रिय झाली. Fail नापासाचा शिक्का बसलेल्या मुलांना नवा देखणा पर्यायी मार्ग या शाळेने दिला. याची दखल घेऊन जम्मू काश्मीर राज्याने १९९६ साली सोनम वांगचुक यांना या शैक्षणिक कामाबद्दल राज्यपाल पदक देऊन गौरविले. शाळेला वेगळी वाट दाखवणारे सोनम वांगचुक नंतर राज्याचे शैक्षणिक सल्लागार झाले, राज्याच्या अनेक शैक्षणिक समित्यांचा भाग झाले.
Lateral thinking लॅटरल थिंकिंग हा सोनम वांगचुक यांचा स्थायीभाव. आपल्यासमोर असलेल्या नेहमीच्या प्रश्नांना कल्पक उत्तरे शोधणे, हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा भाग. यातूनच त्यांनी लडाख सारख्या भागात हिवाळयात पाणी साठविण्यासाठी Ice Stupa आईस स्तूप तयार केले. हिमालयाच्या कडाक्याच्या थंडीत Indian soldiers भारतीय सैनिकांना ऊब मिळावी म्हणून सोलर टेंट तयार केले. अशा अनेक बाबींसाठी त्यांना खूप सारे आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले. युनेस्कोने त्यांचे कौतुक केले.
या सगळया कामासोबत सोनम वांगचुक शाश्वत विकासासाठी क्लायमेट चेंज विषयात विशेष रस घेत होते आणि ते स्वाभाविकही होते कारण पर्यावरणीय दृष्ट्या लडाख, हिमालय हा अत्यंत संवेदनशील भाग आहे. म्हणूनच त्यांनी २०१३ मध्ये युरोपातील ग्रीन पार्टीच्या धर्तीवर न्यू लडाख मुव्हमेंट सुरु केली. तीन ‘ ई’ वर या चळवळीचा भर होता. एज्युकेशन, एनव्हायरामेंट आणि economy इकॉनॉमी. राजकीय – सामाजिक कार्याचे बाळकडू त्यांना वडलांकडूनच मिळाले होते. ऐंशीच्या दशकात त्यांच्या वडलांनी लडाखवासियांना स्थानिक अदिवासी समुदाय म्हणून मान्यता मिळावी, यासाठी उपोषण केले होते तेव्हा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी स्वतः लडाखला आल्या होत्या आणि या मागणी संदर्भात भारत सरकार Indian Government सकारात्मक पावले उचलेल, असे आश्वासन देत आपल्या हाताने सरबत देत सोनम वांग्याल यांचे उपोषण सोडवले होते. वडलांच्या या कार्याचा वारसा पुढे चालवत सोनम वांगचुक सुरुवातीपासूनच राजकीय सामाजिक बाबतीत देखील अग्रेसर राहिले आहेत.
लडाख प्रशासकीय दृष्टया जम्मू काश्मीर पासून वेगळा असावा, अशी इथल्या लोकांची पहिल्यापासून मागणी. ऑगस्ट २०१९ मध्ये Section 370 कलम ३७० रद्द झाल्यानंतर लडाख वेगळा केंद्रशासित प्रदेश म्हणून अस्तित्वात आला. सोनम वांगचुक यांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करुन पंतप्रधान मोदी PM Modi यांचे आभार मानले. चीन गलवान खो-यात घुसखोरी करतो आहे हे पाहिल्यानंतर २०२० मध्ये सोनम वांगचुक यांनी चीनी मालावर बहिष्कार टाक़ण्याचे आवाहन स्थानिकांना केले.
२०२३ मध्ये हिमालयातील पर्यावरणाचे रक्षणाच्या मुद्द्यांवर त्यांनी खारदुंगला या सर्वात उंच मार्गावर क्लायमेट उपोषण केले. आपल्या काही संवैधानिक मागण्यांसाठी तसेच खाण उद्योगातील लॉबीविरुद्ध २०२४ मध्ये त्यांनी आमरण उपोषण केले. हिमालयातील पशुपालकांचे हाल सांगण्यासाठी पश्मिना मार्च काढला. लडाखला सहावी अनुसूची लागू करावी जेणेकरुन इथल्या पर्यावरण रक्षणाचा, प्रशासकीय निर्णयाचा अधिकार स्थानिक लोकांना मिळेल, या भागाला राज्याचा दर्जा द्यावा, तरुणांच्या रोजगार भरतीसाठी स्थानिक लोकसेवा आयोग स्थापन करावा, लडाखचे संसदेतील प्रतिनिधित्व वाढवावे, अशा मागण्यांसाठी मागील दोन वर्षांपासून सोनम वांगचुक शांततेच्या मार्गाने आंदोलन करत होते.
लडाख ते दिल्ली अशी पदयात्रा देखील त्यांनी सप्टेंबर २०२४ मध्ये काढली. पण या मागण्यांसंदर्भात काहीच सकारात्मक घडले नाही. यातून सोनम वांगचुक यांच्यासोबत आंदोलनात असलेल्या काही तरुणांच्या मनात वैफल्य निर्माण झाले. त्यांनी सोनम वांगचुक यांचा गांधीवादी मार्ग सोडून २४ सप्टेंबर २०२५ रोजी लडाखमध्ये जाळपोळ केली. यात सुरक्षा दलाने केलेल्या गोळीबारात चार तरुण मारले गेले. त्यानंतर दोन दिवसांनी हिंसा भडकावल्याचा आरोप ठेवत सरकारने NSA राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली सोनम वांगचुक यांना अटक केली. एका दिवसात एका नॅशनल हिरोला झिरो करण्यासाठी सरकारी संस्था कामाला लागल्या. त्यांच्या स्वयंसेवी संस्थेने आर्थिक भ्रष्टाचार केल्याचे, सोनम वांगचुक यांचे पाकिस्तानचे संबंध असल्याचे आरोप करण्यात आले. वास्तविक पाहता युनो आणि डॉन माध्यम समूहाने आयोजित केलेल्या एका क्लायमेट परिषदेसाठी सोनम वांगचुक पाकिस्तानात गेले होते. तिथे केलेल्या भाषणात त्यांनी क्लायमेट चेंज संदर्भात पंतप्रधान मोदी करत असलेल्या कामाचे कौतुक केले होते तरीही ही त्यांची पाकिस्तान भेट त्यांचे पाक कनेक्शन म्हणून सांगितली गेली.
मागील दोन महिन्यापासून ते जोधपूर येथील तुरुंगात बंदिस्त आहेत. २००९ मध्ये आलेल्या ‘थ्री इडियटस’ या फिल्मने घराघरात पोहचलेला, आपल्या तरुण पिढीसाठी रोल मॉडेल झालेला हा फुनसुख वांगडू आज गजाआड आहे. सत्तेला शांतताप्रिय मार्गाने प्रश्न विचारण्याची किंमत ते चुकवत आहेत.
भारतासारखा खंडप्राय देश चालवणे सोपे नाही. सरकार कोणतेही असो. काही वेळा निर्णयात काही त्रुटी राहणारच. अशावेळी कुणी त्या त्रुटी दाखवून दिल्या म्हणजे ती व्यक्ती सरकारची विरोधक असते, असे नव्हे तर व्यापक देशहितासाठी काही महत्वपूर्ण सल्ले ती देत असते. समाजातील सर्व घटकांच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करणे प्रत्येक वेळी शक्य होते, असे नाही. पण आपले कान सताड उघडे हवेत. टीका देखील सकारात्मक पद्धतीने घ्यायला हवी. सोनम वांगचुक सारख्या अभ्यासू, कल्पक, सर्जक आणि मानवतेच्या हितासाठी काम करणाऱ्या विद्वानाचा आदर सरकारसह आपण सर्वांनी करायला हवा.
कोणीही सूचवलेल्या मार्गाबद्दल, उपायांबद्दल काही मतभेद असू शकतात पण सम्यक संवादाचे मार्ग सतत खुले असणे, ही कोणत्याही समाजातील खुल्या विचारांची आणि लोकशाहीची खूण असते. जो माणूस या देशातील तरुणांचा मार्गदर्शक आणि रोल मॉडेल आहे त्याला गजाआड टाकून आपण काय सिद्ध करत आहोत ? ज्याला जगातील पहिल्या शंभर क्लायमेट नेत्यांमध्ये आंतरराष्ट्रीय व्यासपीठे गौरवित आहेत त्याला तुरुंगात डांबून आपण काय साध्य करत आहोत? आपल्या राजकीय, सामाजिक पर्यावरणातील हे घातक प्रदूषण आपण तातडीने दूर करायला हवे. हा देश, हा समाज शांतता, सौहार्द, निरामय आरोग्य यांनी संपन्न व्हावा म्हणून प्रयत्न करणाऱ्या प्रत्येकाशी संवाद व्हायला हवा. हा संवादच आपल्याला उद्याच्या भारताची नवी उजळ वाट दाखवेल.
-प्रदीप आवटे
(लेखक)