गुलामगिरी - अमेरिकन आणि भारतीय:सुनिल सांगळे

काही विषय कधीच कालबाह्य होत नाहीत. गुलामगिरी हा विषय असाच आहे. त्या विषयावरची दोन वर्षांपूर्वीची ही पोस्ट! सध्याच्या काळातील अत्यंत लोकप्रिय लेखक या विषयावर जेंव्हा लिहितो तेंव्हा ते वाचनीय असतेच. ह्याच गुलामगिरीच्या पद्धतीचे वर्णन करतांना हरारींना भारतीय समाजाची आठवण येते हे ही विशेष सांगताहेत सुनिल ‌सांगळे..

Update: 2022-03-29 02:19 GMT

Yuval Noha Harari लिखित Sapiens - A Brief History of Mankind हे दहा लाखांवर प्रती विकल्या गेलेले पुस्तक नुकतेच वाचण्यात आले. पृथ्वी निर्माण होण्यापासून ते आतापर्यंतचा हा थोडक्यात इतिहास आहे आणि होमो सॅपियन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपल्या मानव जातीच्या प्रगतीचा आणि अधोगतीचा हा लेखाजोखा आहे, तसेच आपले भविष्य कसे असू शकेल याचीही त्यात कल्पना केलेली आहे. यातील There is No Justice in History या प्रकरणात मानवी समाजात विविध अन्याय्य व्यवस्था कशा निर्माण झाल्या, त्यांना टेकू देण्यासाठी धार्मिक वा वांशिक तत्वज्ञान कसे तयार केले गेले आणि त्याद्वारे या व्यवस्था कशा नैसर्गिक आहेत, वा प्रत्यक्ष ईश्वरानेच कशा तयार केल्या आहेत हे समाजाच्या गळी कसे उतरविण्यात आले ते सांगितले आहे. या प्रकरणात अमेरिकेत गुलामगिरी कशी अस्तित्वात आली आणि तिला पाठबळ देण्यासाठी विविध धार्मिक वा वांशिक तत्वज्ञानाचा आधार कसा घेतला गेला हे सांगितले आहे. तो वाचतांना अर्थातच आपल्या समाजातील काही गोष्टींची अपरिहार्यपणे आठवण झाली. तुम्हाला होते का पहा!

अमेरिकेत जेंव्हा सोळाव्या ते अठराव्या शतकाच्या कालावधीत युरोपिअन लोकांनी वसाहती केल्या, तेंव्हा त्यांना शेती आणि खाणकाम यासाठी मोठ्या प्रमाणात मजुरांची गरज होती. त्या काळात आफ्रिका खंडात गुलामांचा व्यापार तेजीत होता आणि त्यामुळे त्यांनी तिथून फार मोठ्या प्रमाणात गुलाम खरेदी करून ते अमेरिकेत आणले. आफ्रिकेचेच गुलाम आणण्याचे एक कारण हे ही होते की तेंव्हा त्या खाणी वा शेती असलेल्या भागात मलेरिया आणि पिवळा आजार हे मोठ्या प्रमाणात होत. आफ्रिकेत हे आजार आधीच असल्याने, या गुलामांच्या शरीरात त्या रोगांविरुद्ध लढण्याची क्षमता विकसित झाली होती. या उलट अमेरिकन खंडातील युरोपिअन मजुरात ही क्षमता नव्हती. म्हणजे शारीरिक क्षमता अधिक विकसित असल्याचा परिणाम या मजुरांच्या बाबतीत उफराटा, म्हणजे गुलाम होण्यात झाला.

परंतु आपण आर्थिक कारणांसाठी दुसऱ्या लोकांना गुलाम म्हणून ठेवले आहे, असे म्हणणे युरोपिअन लोकांना जरा योग्य वाटत नव्हते. लेखकाच्याच शब्दात सांगायचे तर, भारतात आर्य लोकांना ज्याप्रमाणे विशिष्ट वंशाच्या लोकांना गुलाम करूनही, आपण धार्मिक, पवित्र आणि न्याय्य आहोत हे दाखवायचे होते, तीच इच्छा अमेरिकन लोकांचीही होती. त्यासाठी तेथील धार्मिक नेते आणि शास्त्रज्ञ यांची मदत घेण्यात आली. धार्मिक नेत्यांनी सांगायला सुरवात केली की नोहाने आपला मुलगा हॅम याला शाप दिला होता की तुझे वंशज हे गुलाम होतील, आणि आफ्रिकन लोक हे हॅमचे वंशज आहेत. जीवशास्त्रज्ञांनी सांगितले की कृष्णवर्णीय लोकांचा बुध्यांक हा गोऱ्या लोकांपेक्षा कमीच असतो आणि त्यांच्या अनैतिकता निसर्गतःच असते. डॉक्टर्स सांगायला लागले की हे कृष्णवर्णीय लोक घाणेरड्या जीवनशैलीने राहतात आणि त्यामुळे ते रोगराई पसरवितात. थोडक्यात कृष्णवर्णीय लोक अशुद्ध आहेत. या समजुती लोकमानसात एवढ्या घट्ट रुजून बसल्या की नंतर गुलामगिरी रद्द करण्याचे कायदे झाले, तरी देखील लोकांची कृष्णवर्णीय लोकांबद्दलची ही मते अजिबात बदलली नाहीत. याचे परिणाम काय झाले?

गुलामगिरी रद्द झाली तरी, विकासाच्या शर्यतीत दोन शतके मागे पडल्याने, कृष्णवर्णीय लोक शिक्षण वा आर्थिक बाबतीत गोऱ्यांशी स्पर्धा करू शकत नव्हते. पण प्रश्न फक्त आर्थिकही नव्हता. गोऱ्या लोकांतही तसे आर्थिकदृष्ट्या मागे पडलेले लोक होते. परंतु १८६५ पर्यंत लोकांत ही भावना पक्की झाली होती की कृष्णवर्णीय लोक हे कमी अकलेचे, आळशी, गुन्हेगारी प्रवृत्तीचे आणि अस्वच्छ असतात आणि त्यांच्यामुळे समाजात गुन्हे, बलात्कार होतात आणि रोगराई पसरते. त्यामुळे, १८९५ मध्ये जर एखादा कृष्णवर्णीय तरुण नोकरीच्या मुलाखतीला गेला, तर त्याला लायकी असूनही ते नोकरी मिळत नसे, व ती संधी गोऱ्या तरुणाला मिळे. लेखक म्हणतात की आपल्याला वाटेल की एखाद्या शतकानंतर या समजुती अनुभवाने नष्ट व्हायला पाहिजेत. पण तसे झाले नाही. उलट हे गैरसमज अधिक घट्ट रुजले. उदाहरणार्थ, नोकऱ्या कमी मिळाल्याने वरिष्ठ पदांवर गोरे लोकच दिसत, आणि मग म्हणणे सुरु झाले की "बघा, गुलामगिरी नष्ट होऊन एवढी वर्षे झाली तरी हे लोक डॉक्टर, वकील, बँक अधिकारी, अशा वरच्या पदांवर जाऊच शकत नाहीत, कारण त्यांच्या ती लायकीच नाही. गोरे लोक शेवटी श्रेष्ठ असल्याने, हे होणारच!".

याचा परिणाम पुढे कृष्णवर्णीयांना मतदानाचा अधिकार न देणे, त्यांना गोऱ्या लोकांच्या शाळेत शिकायला बंदी घालणे, गोऱ्या लोकांच्या हॉटेलात जायला बंदी घालणे, इत्यादी गोष्टीत झाला. कारण गोरे लोक मानायला लागले की एकत्र हॉटेलात जेवले तर आपल्याला रोग होतील, एकत्र शिकले तर आपली मुले बिघडतील, ते लोक अज्ञानी आणि अनैतिक असल्याने, त्यांना मतदानाचा अधिकार का द्यावा? इत्यादी. कृष्णवर्णीय लोकात अनेक रोग असतात आणि त्यांच्यात शिक्षणाचे प्रमाण कमी असते, असे सांगणारे अनेक "शास्त्रीय प्रबंध" लिहिले गेले, पण हे लक्षात घेतले गेले नाही की मुळात ह्या गोष्टी त्यांच्यावर अन्याय झाल्याचा परिपाक होत्या. विसाव्या शतकाच्या मध्यात तर क्लेनॉन किंग नावाच्या कृष्णवर्णीय विद्यार्थ्यास, त्याने मिशिगन विद्यापीठात प्रवेशासाठी अर्ज केला म्हणून वेड्यांच्या इस्पितळात पाठविले गेले, आणि असा अर्ज करणारा मुलगा वेडाच असला पाहिजे, असे म्हणून न्यायमूर्तींनी निकालही दिला.

एखाद्या कृष्णवर्णीय माणसाने गोऱ्या स्त्रीशी विवाह करणे ही गोष्ट गोऱ्या लोकांना सर्वात जास्त अपमानास्पद वाटत होती आणि असा अपराध करणारी इसमाला ताबडतोड ठेचून मारण्याच्या शिक्षा देणे सुरु झाले, आणि यात कु क्लक्स क्लॅन ही अतिरेकी संघटना आघाडीवर होती. यावर लेखकाचे भाष्य आहे की असल्या शुद्धतेच्या बाबतीत भारतातील ब्राह्मणांनी देखील या संघटनेकडून धडे घ्यावे एवढी ही संघटना जहाल होती. एवढेच नव्हे तर सौंदर्याचे निकष देखील गोरा रंग, भुरे आणि सरळ केस, सरळ नाक असेच ठरविले गेले होते, आणि यात कृष्णवर्णीय कोठेच बसत नव्हते आणि ते कुरूप ठरविले गेले.

लेखक या सगळ्यावर भाष्य करतो की हे दुष्टचक्र पुढेही शेकडो वा हजारो वर्षे चालूच राहील आणि इतिहास काळात निव्वळ धार्मिक कल्पनांनी उभे केलेले हे काल्पनिक भेदभाव पुढे अधिक जास्त भयावह होण्याची शक्यता आहे. जे गरीब आणि शोषित आहेत, त्यांच्यावर अन्याय होतंच राहील, आणि हे शोषक आहेत ते शोषण करीतच राहतील.

या सगळ्या अमेरिकन कथेत, भारतीय संदर्भ कोठे जोडता येतील, ते प्रत्येकाने आपापले ठरवायचे आहे.

Tags:    

Similar News