उखाड लिया' चा अन्वयार्थ...

Update: 2020-09-19 04:39 GMT

चुकीचं ट्वीट केल्याबद्दल आणि वरिष्ठ पत्रकार कमलेश सुतार यांना धमकी दिल्याबद्दल ट्रोल झालेल्या कंगना राणावत यांना आपलं ट्वीट डिलीट करावं लागलं. शिवसेनेने यातून धडा शिकायला हवा. कधी कधी ताकद जे काम करू शकत नाही ते काम बुद्धी करते. शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ असं म्हटलं जातं ते काही उगीच नाही.

कधी कधी आपल्याला खूप प्रतिसाद मिळतोय, जग आपल्याच सोबत आहे असा भ्रम निर्माण होतो आणि माणसं त्यात वाहून जातात. सोशल मिडीयावर मिळणारा प्रतिसाद हा क्षणभंगुर असतो. नंतर कोणीही विचारत नाही, त्यामुळे या फसव्या प्रतिसादाच्या प्रेमात न पडता कंगना राणावत ने संयम राखला पाहिजे. गडबडी आणि हडबडी मध्ये जोशात येऊन चुका होतात. एखादी चूक खूप महागातही पडू शकते.

तुम्ही शिवसेनेला मतदान केले किंवा नाही, याही पेक्षा एका पत्रकाराला ट्रोल म्हणून जेल मध्ये टाकायची भाषा बोलून कमलेश सुतार यांचा अपमान ही केलेला आहे. या अपमानाबद्दल अब्रुनुकसानीचा दावा सुतार यांनी दाखल केला. तर तुम्हाला ही कोर्टाची पायरी चढायला लागू शकते. तुमच्या बोलण्यात जर सत्य असेल तर मांडण्यात संयम ही असायला हवा. आक्रस्ताळेपणाने तुमचा मुद्दा कमजोर होऊ शकतो. संयम ही कमजोरी नाही, तर ताकद आहे. सत्याग्रहावर विश्वास ठेवा.

बॉलीवूड गटारगंगा आहे, असं तुमचं म्हणणं असेल तर त्या गटारगंगेचे तुम्हीही लाभार्थी आहात. त्यातील सुधारणांसाठी तुम्ही आवाज उठवत असाल तर तुमचं कौतुकच आहे, पण साफसफाई करत असताना घर आणखी घाण होणार नाही याचीही काळजी घेतली पाहिजे.

जाता जाता शिवसेनेसाठी प्रेमाचे दोन शब्द, उखाड लिया अशा कॅची हेडलाइन लिहून किंवा जेसीबी की खुदाई चा लाइव्ह शो दाखवून काही उखाड़ता येत नाही, त्यासाठी थोड़ी अक्कल वापरावी लागते. शिवसेनेने ती वापरली पाहिजे.

Similar News