जगात श्रीमंत लोक अधिक श्रीमंत कसे होतायेत ?

Update: 2025-11-12 02:42 GMT

८,५०,००,००,००,००,०००….. रुपये

हा आकडा आहे टेस्ला कंपनीचे प्रवर्तक Elon Musk एलोन मस्क यांच्या पुढच्या काही वर्षातील पॅकेजचा!

या आकड्यासमोर तुम्ही पुढच्या दहा वर्षात जी काही रुपयांची अंदाजे कमाई करू शकाल असे तुम्हाला वाटते तो आकडा लिहा ! या दोन भिन्न गोष्टी नाही आहेत. जगातील श्रीमंती आणि दारिद्र्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. बहुसंख्य वंचितावस्थेत असणे ही मूठभरांच्या ओकारी येणाऱ्या श्रीमंतीसाठी पूर्वअट आहे. म्हणून मस्क यांचे पॅकेज आपण डिस्कस केले पाहिजे. टेस्ला या विद्युत वाहन कंपनीचे प्रवर्तक आणि मॅनेजिंग डायरेक्टर एलोन मस्क यांना पुढच्या काही वर्षात मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून काम करण्यासाठी एक ट्रिलियन डॉलर्सचे पॅकेज काल कंपनीच्या भागधारकांच्या सभेत मंजूर केले गेले.

जागतिक कॉर्पोरेट इतिहासात हा आकडा एक ऐतिहासिक उच्चांक आहे. एक ट्रिलियन डॉलर्स म्हणजे ८५ लाख कोटी डॉलर्स. रुपयात वर दिलेला आकडा

भारताची जीडीपी साडेतीन ट्रिलियन डॉलर्स आहे. म्हणजे भारतातील सर्व नागरिक तीन किंवा चार महिने काम करून जे उत्पन्न काढतात तेवढे! सीइओची वार्षिक पॅकेजेस असतात तसे हे नाही. ते मस्क यांच्या मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून केलेल्या परफॉर्मन्सशी त्याची सांगड घातली गेली आहे. उदा. टेस्ला ब्रँडचा मार्केट शेयर वाढवणे, टेस्ला कंपनीचे बाजारमूल्य वाढवणे इत्यादी. त्यातून मस्क यांना कंपनीचे स्टॉक ऑप्शन्स मिळत जातील आणि त्यांची कंपनीतील मालकी वाढत जाईल. आता मस्क यांचे नेटवर्थ ४६० बिलियन डॉलर्स आहे ते वाढून सहापट म्हणजे २४०० बिलियन डॉलर्स होऊ शकते.

जगातील फक्त सात देशांची जीडीपी या २४०० बिलियन डॉलर्स पेक्षा जास्त आहे. कंपन्यांचे बाजारमूल्य कंपन्यांच्या नफा कमावण्याच्या क्षमतेशी निगडित असते. कंपनीच्या सीइओच्या पॅकेजेसमधील मोठा अंश त्या कंपनीच्या विक्रीतून मिळणाऱ्या पैशातून जात असतो. दुसऱ्या शब्दात त्या कंपनीने बनवलेला वस्तुमाल विकत घेणारे ग्राहक त्याची किंमत मोजत असतात. प्रवर्तक/ सी इ ओ यांना पॅकेजचा भाग म्हणून मिळालेले शेअर्सचा चढता भाव देखील कंपनी नफा कमावत असते म्हणून चढा असतो. आणि कंपनीचा नफा ग्राहकांच्या खरेदीतून येत असतो.

एलोन मस्क यांचे हे पॅकेज नाट्यपूर्ण असेल. मस्क यांचे पॅकेज हे या पोस्टसाठी निमित्तमात्र आहे. कारण जगभर प्रत्येक देशात कॉर्पोरेट, बँकिंग, वित्त क्षेत्रातील व्यवस्थापक वर्गाची पॅकेजेस कामगार वर्गाच्या वेतनापेक्षा शेकडो, हजार, लाख पट आहेत. त्यावर बोलले पाहिजे. जागतिक कॉर्पोरेट, वित्त क्षेत्रात नक्की काय चालते, जगात श्रीमंत लोक अधिक श्रीमंत होतात ते कसे, हेच श्रीमंत लोक त्यांना हवे ते उमेदवार आणि राष्ट्राध्यक्ष निवडून आणण्यासाठी खर्च केलेले पैसे कोठून मिळवतात…..याची अंतरदृष्टी मिळवण्यासाठी अशा बातम्या उपयोगी असतात

नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ग्लोबल इनइक्वलिटी रिपोर्ट प्रमाणे जगातील १ टक्का लोकांकडे ४२ टक्के संपत्ती गोळा झाली आहे आणि बॉटम ऑफ पिरॅमिड मधील ५० टक्के लोकांची संपत्ती फक्त १ टक्का भरते. शेकडो कोटी किंवा मिलियन / बिलियन्स डॉलर्सचे पॅकेज घेणारे हे कंपन्यांचे प्रवर्तक, सी इ ओ काय हवेतून उदी काढल्यासारखे रुपये आणि डॉलर्स काढतात ? का २४ तास व्यायामशाळेत व्यायाम करतात? हा प्रश्न डोक्यात येणे म्हणजे राजकीय आर्थिक शिक्षित होणे.

माणसे शारीरिक किंवा बौद्धिक श्रम करतात. त्यांना मिळालेल्या मोबदल्यात तफावत असणार हे देखील हे तत्व बरोबर आहे. काहीच गैर नाही. पण तफावत किती असावी, दहा, शंभर , हजार , लाख , दहालाख, एक कोटी, दहा कोटी पट ? हे काही निसर्ग विज्ञान ठरवत नाही तर राजकीय अर्थव्यवस्था ठरवते. खरं सांगायचे तर राजकीय सत्ता ठरवते. चांगली माणसे कमी नव्हती. अजूनही नाहीत. नैतिक अहंगंडातू सत्ताकारणकारण बद्दल घृणा बाळगणे खूप महागात पडले आहे.

संजीव चांदोरकर, अर्थतज्ज्ञ

(सर्व आकडेवारी व माहिती बिझीनेस लाइन नोव्हेंबर ८, पान क्रमांक एक)

Similar News