उठा उठा दिवाळी आली, गरीबांना हिणवण्याची वेळ आली

Update: 2023-11-10 14:23 GMT

रस्त्यावर मातीचा दिवा विकत बसलेली गरीब म्हातारी. त्या दिव्याला गिऱ्हाईक यावं म्हणूनएकदा डावीकडे आणि मग उजवीकडे मान वळवून बघते. समोर दिसतं एक मध्यमवर्गीय जोडपं आणि त्यांचा गुटगुटीत गोंडस मुलगा. ते दिवाळीची खरेदी करून येत असतात. त्या गोंडस मुलाला त्या दिवे विकणाऱ्या म्हातारीची कणव येते. तो पुढे गेलेला मागे परततो. दिवे विकणाऱ्या म्हातारीचा फोटो काढतो. सोशल मीडियावर ‘अशा’ लोकांची दिवाळी साजरी व्हायला हवी म्हणून मेसेज व्हायरल करतो. पाहता पाहता म्हातारीचे सर्व दिवे विकले जातात. आता यांच्या म्हणण्यानुसार त्या म्हातारीची दिवाळी मोठी होणार असते मग ती मोकळी टोपली घेऊन जात असताना त्या गोंडस गुटगुटीत पोराचे आभार मानते. या जाहिरातीमागून हळूच कुठल्यातरी प्रॉडक्ट ची जाहिरात पुश केली जाते.

दिवाळी आली की अशा जाहिरातींना उत येतो. आपल्या मोलकरणी च्या उपाशी मुलांना मिठाई पाठवणे, कपडे देणे. वॉचमन ला मिठाई देणे असे अनेक दारिद्र्य निर्मूलनाचे उपक्रम दिवाळीच्या महिन्यात सुरू होतात. समाजसेवेची ही आग असणारे हे सर्व गरिबांचे पालनकर्ते वर्षातील प्रत्येक दिवस श्रमिक, कामगार यांचे शोषण करतात. त्या वेळी त्यांची ही कणव कुठे गेलेली असते ? त्या वेळी त्यांना गरिबांना मदत करुन लोकप्रियता मिळणार नसते. कष्ट करून खाणारा कुणीच व्यक्ती कुणाकडे अशा उपकाराची अपेक्षा ठेवत नाही. ऐन दिवाळीच्या सणाला गरीब कुटुंबांना हिनवण्याचे काम अशा जाहिरातीतून केले जाते. या जाहिरातदार कंपन्या त्यांच्या कंपनीत काम करणाऱ्या कामगारांचा योग्य आर्थिक मोबदला देताना कायद्यातील तरतुदीचा विचार करतात का ? त्यांचे हक्क देतेवेळी या हंगामी समाजसेवकांना याची आठवण होत नसेल का ?

ग्रामीण भागात गावाखेड्यात राहणारा मूर्तिकार असो किंवा कुंभार असो तो त्याची कला त्या मुर्त्यांमध्ये ओतत असतो. ती सुबकता त्या कलेत असते. ग्रामीण कला कुसरीला शहरात मोठी मागणी असते. असे असताना उपकार म्हणून ह्या वस्तू खरेदी केल्या जात आहेत असे भासवले जाते.

यामध्ये कामगार कलाकार यांना कमी लेखणारा मेसेज प्रत्यक्षपणे अथवा अप्रत्यक्षपणे पेरला जात आहे. गरीबांची काळजी असेल तर गटाराकडेला आपला दर्जेदार माल विकत बसलेल्या शेतकऱ्याला बर्गेनिंग न करता चांगली किंमत द्यायची तसदी जरा घ्या. इतर वेळी बाजारात उन्हात भाजी विकत बसलेल्या वयस्कर लोकांकडून कवडीमोल दराने माल खरेदी करायचा आणि मातीचे दिवे मिठाई वाटली म्हणून स्वतःची पाठ थोपटून घ्यायची हा दुटप्पीपणा मध्यमवर्गीय समाजाने सोडला पाहिजे.

Full View

Tags:    

Similar News