साक्षात् ज्ञानाचाच कोश !

मराठीतील पहिले ज्ञानकोशकार डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांचा आज जन्मदिन. मराठी संस्कृतीने ज्ञानाची जी रत्ने जगाला दिली, त्यातलेच हे एक अमूल्य रत्न असल्याची शब्दांजली वाहिली आहे ज्येष्ठ संपादक भारतकुमार राऊत यांनी....

Update: 2021-02-02 04:05 GMT

१८८४मध्ये तेव्हाच्या मध्य भारतात त्यांचा जन्म झाला पण शालेय शिक्षण अमरावतीत व उच्च शिक्षण मुंबईच्या विल्सन कॅालेजात झाले. पुढे अमेरिकेतील कॅार्नील विद्यापीठाची डॅाक्टरेट त्यांनी मिळवली.

अमेरिकेतून परत येत असताना मे १९११ ते सप्टेंबर १९१२ या काळात ते इंग्लंडला होते. 'An Essay on Hinduism: It's Formation & Future' (१९११) हा ग्रंथ ते इंग्लंडमधे असतानाच प्रकाशित झाला.

इंग्लंडमधेच त्यांचा इंडिथा कोहन या जर्मन तरुणीशी परिचय झाला. पुढे १९२०मधे प्रचंड सामाजिक विरोधांचा तोंड देत डॅा केतकरांनी त्यांच्याशी विवाह केला व त्यांचं नाव शीलावती केतकर असे बदलले.

भारतात परतून ते कलकत्ता विद्यापीठांत अध्यापन करू लागले. पण एन्सायक्लोपिडिया ब्रिटानिकाच्या धर्तीवर मराठीत ज्ञानकोश असावा, ही इच्छा त्यांना अस्वस्थ करत राहिली. त्यामुळेच ते पुण्यात आले व ज्ञानकोश निर्मितीच्या कामाला लागले.


डॅा. केतकर त्यांच्या ज्ञानकोशांचे प्रमुख संपादक होते. ज्या काळात केतकरांनी ज्ञानकोशाच्या २३ खंडांचे काम केले तो काळ १९१६ ते १९२८ हा आहे. ह्या काळात खुद्द लोकमान्य टिळकांनी सुद्धा त्यांना 'हे काम फार मोठे आहे, एका माणसाचे हे काम नाही' अशा प्रकारचा सल्ला दिला होता. पण केतकरांचा निर्धार पक्का होता.

त्या निर्धाराला चिकटून सर्व संकटांवर मात करीत त्यांनी १२ वर्षांमध्ये हा ऐतिहासिक महत्त्वाचा मराठी प्रकल्प पूर्ण केला.

डॅा. केतकरांनी ज्ञानकोशाचे काम सुरू केले तेव्हा त्यांच्यापुढे पथदर्शक म्हणून 'एनसायक्लोपेडिया ब्रिटानिका' सारखा एखादा इंग्रजी ज्ञानकोशच तेवढा होता. गुजराथी, तेलुगू सारख्या काही भारतीय भाषांमध्ये ज्ञानकोश निर्मितीचे काम होत आहे अशी चिन्हे वा चर्चा तेव्हा होती, पण मराठी ज्ञानकोशाला पथदर्शक ठरू शकतील अशी त्यांची स्थिती नव्हती.

एवढ्या मोठ्या प्रकल्पासाठी आवश्यक असणारी पुरेशी आर्थिक ताकद वा साधनसामग्री आपल्याकडे नाही याची जाणीव त्यांना होती. तरीही एकांड्या शिलेदाराप्रमाणे पदरचे सारे पैसे टाकून कामाला सुरूवात केली व या कार्याला आकारही दिला.


डॅा केतकर वयाच्या केवळ ५३ व्या वर्षी पुण्याच्या ससून इस्पितळात १० एप्रिल १९३७ रोजी एखाद्या सामान्य रूग्णाप्रमाणे इहलोक सोडून गेले. त्यांच्या अंत्यविधीसाठी त्यांच्या पत्नीला १०० रूपये उसने मागण्याची वेळ आली अशी नोंद त्यांच्या चरित्रात आहे.

विसाव्या शतकाच्या पूर्वार्धाच्या काळात मराठी ज्ञानकोश निर्मितीसाठी त्यांनी केलेला त्याग हा अनन्यसाधारण आहे.

- भारतकुमार राऊत

Tags:    

Similar News