Fact Check : कोरेगाव भीमा प्रकरणात माजी न्यायाधीश पीबी सावंत यांनी शरद पवारांचे आभार मानले का?

Update: 2019-12-24 05:39 GMT

कोरेगाव भीमा प्रकरण सध्या न्यायप्रविष्ठ आहे. मात्र, कोरेगाव भीमा प्रकरणामध्ये अनेक सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींची नावं गोवली गेली असल्याचा आरोप सातत्यानं केला जात आहे. कोरेगाव भीमा येथील हिंसाचारानंतर अर्बन नक्षल असल्याच्या आरोपाखाली सुधा भारद्वाज यांच्यापासून ते शोमा सेन यांच्यापर्यंत अनेक नामवंत बुद्धिवंत, काही वकील व दलित हक्कांसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी पकडले होते. आनंद तेलतुंबडे व गौतम नवलाखांसारख्या बुद्धिवंतांचाही ताबा घेण्यासाठी सध्या पोलिस न्यायालयात गेलेले आहेत.

मात्र, या प्रकरणात आता अनेक नवनवीन खुलासे समोर येत आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी यामध्ये स्वत: लक्ष घातले आहे. 'या प्रकरणात पुणे पोलिसांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर करत अनेक साहित्यिकांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल केले आहेत. चुकीचे गुन्हे दाखल करणाऱ्या संबंधित पोलिस अधिकाऱ्याकडून तपास काढून घ्या, अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळं वळण येण्याची शक्यता आहे. दरम्यान शरद पवार यांच्या या वक्तव्यानंतर माजी न्यायाधीश पी. बी सावंत यांनी शरद पवार यांचे पत्र लिहून आभार मानल्याचं पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

काय आहे पत्र?

प्रति,

मा. शरद पवार,

अध्यक्ष, राष्ट्रवादी कोंग्रेस पक्ष,

मुंबई, महाराष्ट्र

पुणे येथील पत्रकार परिषदे मध्ये आपण केलेल्या मागणी बद्दल वाचून आनंद झाला. प्रामुख्याने तुम्ही पुरोगामी विचारसरणीच्या व्यक्तिसोबत गेल्या सरकारने केलेल्या अत्याचाराला वाचा फोडून, त्यात एसआयटी ची मागणी केलीत ती पुर्णपणे न्यायसंगत आहे, हे मला या माध्यमातून आपणास कळवायचे आहे. एल्गार परिषदे सारख्या उत्कृष्ट विचार मंथनाला त्याच्या ऊचीत उद्देशा पर्यन्त न जाऊ देण्याच्या बदहेतूने हे सर्व कारस्थान केले असल्याचे मला वाटते.

ज्यांना या प्रकरणात गोवले आहेत त्यापैकी एक सुधीर ढवळे सोडले, तर बाकी कुणाचाही एल्गार परिषदे च्या आयोजनात काही एक संबंध नाही. आणि सुधीर ढवळे ह्यांना सत्र तसेच उच्च न्यायालयाने या पूर्वी सन्मानाने निर्दोष मुक्त केलेले आहे. सदर परिषद मी व न्या. कोळसे पाटील तथा २५० हून अधिक संघटनांच्या सहयोगाने आयोजित केली होती, हे शतशः खरे आहे. त्यात पोलिस आरोप करत आहेत तश्यातले कुणीच सहभागी नव्हते हे मी अधोरेखित करू इच्छितो.

आ. जितेंद्र आव्हाड यांनी नागपुर अधिवेशनात केलेले भाषणही मी बघितले. माझा कुठलाही जवाब न घेता, एक खोटा जवाब पुणे पोलिसांनी आरोप पत्रामध्ये दाखल केलाय हे सत्य त्यांनी विधानसभेच्या माध्यमातून उभ्या महाराष्ट्रासमोर मांडण्याचं जे धाडसी काम केलय, त्यासाठी ते कौतुकास पात्र आहेत. येणार्‍या काळात बहुजनांचा भरभक्कम आवाज बनून ते महाराष्ट्रात एक मोठे निर्भीड नेतृत्व उभं करतील अशी मला अशा आहे. आपण व आपले सहकारी करत असलेले प्रयत्न हे शाहू, फुले, आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्राचा नावलौकिक पुनःश्च मिळवून देईल, असा विश्वास मी इथे व्यक्त करतो.

कळावे,

आ. ता. २३.१२.२०१९ जस्टीस पी. बी सावंत

ठि: पुणे माजी न्यायाधीश, सर्वोच्च न्यायालय, भारत

दरम्यान या पत्रा संदर्भात आम्ही पीबी सावंत यांच्याशी चर्चा केली. तेव्हा सावंत यांनी आपण अशा प्रकारचं कोणतंही पत्र लिहिलं नसल्याचं सांगितलं. त्यामुळं माजी न्यायमुर्ती पीबी सावंत यांचं हे पत्र खोटं असल्याचं मॅक्समहाराष्ट्रच्या फॅक्ट चेकमध्ये समोर आलं आहे.

Similar News