Fact Check: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नीता अंबानींना वाकून नमस्कार केला का?

Update: 2021-06-10 10:39 GMT

सध्या सोशल मीडियावर उद्योगपती मुकेश अंबानी यांची पत्नी नीता अंबानी आणि पंतप्रधान मोदी यांचा एक फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये पंतप्रधान मोदी रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी यांना खाली वाकून हात जोडतांना दिसत आहेत.

खरंतर हा फोटो २०१८ चा असून या फोटोला फोटोशॉप मधून एडिट केल्याचं समजतंय. मात्र, खऱ्या फोटोमध्ये असलेली महिला ही नीता अंबानी नसून एक सामाजिक कार्यकर्ता आहे.

ट्विटरवर अनेकांनी हा फोटो शेअर केला आहे. V NEWS नावाच्या एका ट्विटर हॅन्डलने देखील हा फोटो ट्विट करत म्हंटलय - गुलामों के झुके हुए सिर मालिकों के घर का पता बता देते हैं.

दरम्यान प्रसार भारतीचे माजी सीईओ जवाहर सरकार यांनी सुद्धा हा फोटो ट्विट केला होता, जो त्यांनी नंतर डीलीट केला आहे. त्यांनी ट्विट केल्यांनतर जवळपास एका तासातच त्यांनी हे ट्विट डीलीट केलं. तोपर्यंत या ट्विटला ५०० पेक्षा जास्त लोकांनी शेअर केलं होतं. जवाहर यांनी नंतर हा फोटो नकली असल्याचं मान्य केलं.

काय आहे सत्य?

या फोटोमधील नीता अंबानी यांचा चेहरा हा रिलायन्स इंडस्ट्रीजकडून २०१४ ला फेसबुक वर पोस्ट केलेल्या फोटोमधून घेण्यात आला आहे. मात्र मूळ फोटो हा वन इंडिया हिंदी कडून २०१८ साली प्रसिद्ध केला होता. त्यांच्या रिपोर्टनुसार, फोटोमधील महिला या सामाजिक कार्यकर्त्या दीपिका मंडल आहेत. ज्या दिल्लीमधील बिगर सरकारी संस्था दिव्य ज्योती सांस्कृतिक संघटनेच्या प्रमुख आहेत.

या अगोदरही अनेकदा मोदींचा फोटो फोटोशॉप करून शेअर केला गेला आहे. ज्यामध्ये उद्योगपती गौतम अदानी यांची पत्नी प्रीती अदानी यांचा चेहरा दीपिका मंडल यांच्या चेहऱ्यासोबत बदलला (एडिट केला) होता. डिसेंबर २०२० मध्ये अनेक लोकांनी तो फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. किसान काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुरेंद्र सोलंकी यांनी सुद्धा तो शेअर केला होता.

निष्कर्ष

एकूणच, पीएम मोदी आणि दीपिका मंडल यांच्या एका फोटोमध्ये, असलेली महिला ही नीता अंबानी असल्याचा दावा खोटा आहे.

Tags:    

Similar News