Fact Check : गुजरातमध्ये भाजप सरकारची विकासकामं म्हणून चीनचा व्हिडिओ शेअर
पाण्यात शेकडो सोलर पॅनल्स असलेल्या प्रकल्पाची एक व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर गुजरातच्या प्रगतीचं दृश्य म्हणून व्हायरल करण्यात आलीय. कित्येक नेटिझन्सने यासाठी गुजरातमधील भाजप सरकारचं कौतुक केलंय.
X युजर ‘இந்துத்துவம்’ (@VVR_Krish) या अकाऊंटवरुन २३ जुलै २०२५ रोजी तमिळ भाषेतून कॅप्शन लिहित ‘गुजरात मॉडेल’ असं कौतुक करत गुजरातमधील भाजप सरकारचं कौतुक केलं. या पोस्टला जवळपास ३.५ लाख लोकांनी बघितलं आणि २०० पेक्षा अधिक जणांनी त्याला रिट्विटही केलंय.
Instagram युजर ‘@sundar jani’ याने देखील १९ जून २०२५ रोजी हाच व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यात हा व्हिडिओ गुजरातमधील भूज इथल्या एका सोलर पॉवर प्रकल्पाचा असल्याचा दावा कऱण्यात आला होता.
फॅक्ट चेक
या व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य जाणून घेण्यासाठी ऑल्ट न्यूजनं व्हिडिओतल्या काही फ्रेम्स ला गुगल रिवर्स इमेज मध्ये टाकून तपासणी केली. यात त्यांना १६ जूनची एक इंस्टाग्राम पोस्ट दिसली त्यात ही व्हायरल क्लिप होती. ही पोस्ट ‘@shenghai_views’ या पेजची होती. त्या पोस्टमधील कॅप्शनमध्ये “सोलर पॅनल समुद्रातून मिळते, तांदुळाची शेती डोंगरावर होतेय – चीनची नवी शेती आणि ऊर्जा, समाधान खेळ बदलतोय ”
यातून हेच सिद्ध होतं की, सोलर प्रकल्पाची व्हायरल होणारी व्हिडिओ क्लिप प्रत्यक्षात चीनमधील प्रकल्पाची आहे.
चीनमधील चायना यूथ डेली या माध्यमाची ७ जुलै रोजीची एक इंस्टाग्राम पोस्ट ऑल्ट न्यूजच्या हाती लागली. त्यात हीच व्हायरल क्लिप होत आणि तिच्या कॅप्शनमध्ये चीनचा उल्लेख करण्यात आला होता.
याशिवाय चीनच्या कुठल्या अधिकृत स्त्रोतातून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला होता का ? याचीही पडताळणी करण्यात आली. त्यात चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग यांची ३ जुलै २०२५ रोजीची एक फेसबूक पोस्ट दिसली. त्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये “, शहराच्या ग्रीड पासून ते समुद्रातील तळापर्यंत, चीन एका हरित भविष्याला ऊर्जा देण्यासाठी सूर्याचा उपयोग करतोय” असं लिहिण्यात आलं होतं.
गुजरातमध्ये फ्लोटिंग सोलर प्रकल्पासंदर्भात काही बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत का ? याचीही ऑल्ट न्यूजनं पडताळणी केली. त्यात टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रसिद्ध झालेली एक बातमी दिसली. या बातमीत नर्मदा नदीत प्लोटिंग सोलर पॅनल लावण्यासंदर्भात माहिती देण्यात आली होती. या प्रकल्पाचे काही व्हिडिओ तपासण्यात आल्यावर CNBC बाजार या युट्युब चॅनेलवर सप्टेंबर २०२४ मध्ये अपलोड करण्यात आलेला एक व्हिडिओ दिसला. हा व्हिडिओ व्हायरल होणाऱ्या व्हिडिओशी कुठल्याही प्रकारे साम्य नसलेला होता.
गुजरातच्या प्लोटिंग सोलर पॅनलच्या व्हिडिओची व्हायरल क्लिप सोबत तुलना केल्यानंतर स्पष्टपणे दिसतंय की, गुजरातमधील सौर ऊर्जा प्रकल्प हा एका छोट्या नाल्याच्या वर आहे तर चीनमधील सौर उर्जा प्रकल्प हा विस्तारलेल्या पाण्यात असून तो भव्य आहे.