FACT CHECK : शिवभोजनासाठी आधारकार्डची गरज आहे का?

Update: 2020-01-22 13:38 GMT

26 जानेवारी ला महाराष्ट्र सरकार गरीब आणि गरजू व्यक्तींसाठी ‘शिवभोजन’ ही योजना सुरु करत आहे. मात्र, या योजनेसाठी विविध कागदपत्रांची आवश्यकता आहे. अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. I Support Devendra या ट्विटर अकाउंटने टीव्ही 9 मराठीची एक बातमी ट्विट केली असून शिवभोजन थाळीचा लाभ घेता येईल..काय थट्टा लावली आहे.. जेवणासाठीसुद्धा आधार कार्डची सक्ती.. हिच ती वेळ!! करून दाखवले!! #शिवभोजनथाळी

#महाविकासआघाडी #mahabighadaghadi असं ट्विट केलं असून या ट्विटमध्ये शिवभोजन थाळीसाठी आधार कार्डाची आवश्यकता असल्याचं म्हटलं आहे.

तर दुसरीकडं भाजप आमदार राम कदम यांनी देखील ‘शिवभोजन’ थाळी सर्वसामान्यांना मिळावी या संदर्भात ट्विट केलं आहे.

बिनशर्त, सरसकट अशा शब्दाचे आश्वासन द्यायचे आणि करायचं उलट. ठाकरे सरकारचा हाच खरा चेहरा आहे. यांची कर्जमाफी जितकी फसवी आहे तितकीच त्यांची शिवभोजन योजना. भुकेल्याला अन्न देताना अटी घालणाऱ्या ठाकरे सरकारने गरिबांची चेष्टा सुरू केलीय. ती चेष्टा तात्काळ थांबली पाहिजे. अशी मागणी त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे.

तर राम के गिते या नेटीझन्सने शिवभोजन थाळी साठी आधारकार्ड झेरॉक्स आणि एक फोटो द्यावा लागणार आहे आता एक पासपोर्ट फोटो पंधरा रुपयाला आहे आणि झेरॉक्स २ रुपये इथेच १७ रुपये होत आहेत आणि जेवण १० रुपये ७ रुपये तोटा..!! असं ट्विट केलं आहे.

मात्र, या संदर्भात आज माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया जाणून घेतली.

‘शिवभोजन’ योजनेसाठी आधारकार्डची सक्ती करण्यात आलेली नाही. शिवभोजन केंद्रावर प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य देऊन शिवभोजन योजनेचा लाभ देण्यात येईल, अशी माहिती भुजबळ यांनी दिली आहे.

या योजनेंतर्गत सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर राज्यात प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी व महानगरपालिका क्षेत्रात किमान 1 भोजनालय सुरु करण्यात येणार आहे. हे भोजनालय वर्दळीच्या ठिकाणी असेल. ही भोजनालये दुपारी 12.00 ते 2.00 या कालावधीत कार्यरत राहतील. या भोजनालयात दुपारी 12.00 ते 2.00 या कालावधीत या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी राखीव जागा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित भोजनालय चालकाची आहे.

काय आहे ‘ही’ योजना

या योजने अंतर्गत मुंबई शहराला दिवसाला 1950 थाळ्या दिल्या जाणार आहेत. तर ठाण्याला 1350, उस्मानाबादला 250, औरंगाबाद जिल्ह्यात 500 पुण्यात 1000 थाळ्या तर पिंपरी चिंचवड मध्ये 500 शिवभोजन थाळ्या दिल्या जाणार आहेत.

भोजनालय चालविण्यासाठी या मालकाकडे स्वत:ची पर्याप्त जागा असावी. भोजनालयात एका वेळी किमान 25 व्यक्तींची जेवणासाठी बसण्याची व्यवस्था असेल. एका भोजनालयात किमान 75 आणि कमाल 150 थाळी भोजन उपलब्ध होणार आहे. या भोजनालयात बाहेरचे जेवण घेऊन येण्यास व भोजनालयातील जेवण बाहेर घेऊन जाण्यास मनाई आहे. शासकीय कर्मचा-यांना तसेच ज्या ठिकाणी ही योजना राबविण्यात येईल तेथील आस्थापनेवरील कर्मचा-यांना या भोजनालयात सवलतीच्या दराने जेवणास सक्त मनाई असल्याचेही भुजबळ यांनी सांगितले.

Similar News